Next
..आणि मी निद्रेच्या आधीन झालो..
BOI
Saturday, April 21 | 09:45 AM
15 0 0
Share this story


खोल, शांत निद्रा ही खूप सुंदर असते. जणू एक प्रकारचा रोजचाच मृत्यू. फक्त माणूस उठतो, तो त्याच देहात ज्यात तो निद्रावस्थेत गेलेला असतो. शांत निद्रेतून उठल्यावर ताजंतवानं वाटतं; पण ही निद्रा शांत नव्हती. खूप अस्वस्थ करणारी होती... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा पंचविसावा भाग.. 
..............................................
अभिजित पानसेपाठीवरची बॅग आणि हातातली काठी सांभाळत मी तंबूवाल्यांशी बोलत होतो. मी एकटा असल्याने सगळेजण मला जरा थांबा, असं म्हणत होते आणि इकडे माझा दम निघत नव्हता. मला थांबणं अशक्य झालं होतं. छाती दुखत होती. श्वास अर्धवट घेतला जात होता. अशा अवस्थेत उभं राहणं शक्यच नव्हतं. पण आणखी तंबू बघायला अजून समोर जाण्यासाठीही त्राण नव्हता. तितक्यात एका यात्रेकरूने आवाज दिला. तो म्हणाला, ‘तुम्ही एकटे असाल, तर आमच्या तंबूत या. यांचे जेवढे पैसे होतात, तेवढेच त्यांना द्यायचं, असं ठरलंय.’ मी त्यांच्यासोबत त्यांच्या तंबूपर्यंत गेलो. आत पाच जण होते. मी जवळचीच जागा घेतली. 


बॅग कशी-बशी खाली ठेवली. खूप शक्ती खर्च करून, पायातले जोडे काढले. बॅगेतले लोकरीचे मोजे काढून ते घातले. शेषनागला रात्री भयंकर थंडी पडते, असं ऐकलं होतं. जागच्या जागीच खाली पाठीवर पडलो. शेजारच्या लोकांनी, कुठून आलात, एकटेच आलात का वगैरे प्रश्न विचारले; पण माझ्यात काहीही बोलण्याचा त्राण उरला नव्हता. डोळे उघडण्याचाही आता त्रास होऊ लागला होता. मी त्यांच्याशी थोडसं काहीतरी बोललो. त्यांना जेव्हा सांगितलं, की मी एकटा आलोय, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं. ते बाहेर काहीतरी खायला जाऊ असा आग्रह करत होते. मी मात्र सपशेल नकार दिला. माझी काहीही खाण्याची अवस्था नव्हती आणि इच्छाही. खूप मळमळत होतं. शिवाय पुन्हा बाहेर जाणं माझ्यासाठी अशक्य होतं. होती नव्हती तेवढी संपूर्ण शक्ती संपली होती.

ते लोक जाता जाता बोलले, तेवढंच वाक्य माझ्या कानावर पडलं, ‘अरे ये बंदा अकेला अमरनाथ को आया है..! इसे कहते है दम!! तुम्हारी यात्रा सचमूच सफल होगी... त्यानंतर मी त्या पर्वत-शिखरांनी चारही बाजूने वेढलेल्या त्या तंबूस्थानाच्या, हिमालयाच्या, जगाच्या बाहेर गेलो. अवकाशात गेलो. खोल निद्रावस्थेत गेलो. त्यानंतर काय घडले, काहीही माहित नाही. 

खोल, शांत निद्रा ही खूप सुंदर असते. जणू एक प्रकारचा रोजचाच मृत्यू. फक्त माणूस उठतो, तो त्याच देहात ज्यात तो निद्रावस्थेत गेलेला असतो. शांत निद्रेतून उठल्यावर ताजंतवानं वाटतं. पण ही निद्रा शांत नव्हती. खूप अस्वस्थ करणारी होती. रात्री मध्येच एकदा जाग आली. काही क्षण काहीच कळेना, कुठे आहोत ते. आत त्या तंबूत अगदी निरव शांतता. डोळ्यासमोर धरलेलं आपलंच बोट दिसणार नाही, इतका काळोख. थोड्या वेळात भानावर आलो. मी संध्याकाळी सात वाजताच झोपलो होतो. किती वाजले, ते बघायला मोबाईल बघणं अशक्य होतं माझ्यासाठी.

कडाक्याची थंडी पडली होती. प्रचंड डोकं दुखत होतं. नीट श्वासही घेता येत नव्हता. अंगावर दोन ब्लॅंकेट्स होते. शिवाय उबदार कपड्यांची चार आवरणं होती, तरीही थंडी वाजत होती. अशा प्रकारचं छाती दुखणं पहिल्यांदाच अनुभवत होतो. डोळे मिटून पडून राहिलो. मी दुसऱ्या दिवशी उठू शकेल, की नाही याचीच शाश्वती मला वाटत नव्हती. मग पुढचा कठीण टप्पा कसा पार करणार..? अजून खूप मोठा ट्रेक बाकी होता. आता परत माघारी जाणंही शक्य नव्हतं. यात्रेच्या मध्यवर्ती ठिकाणावर मी होतो. 

डोळे मिटून वेदनेने विव्हळत पडून राहिलो. काही वेळात बाहेर लोकांची हालचाल जाणवू लागली. मी उठून बसूही शकत नव्हतो. आता बाहेर स्पष्ट उजेड दिसत होता. सकाळ झाली होती. मला बाहेर जाणं अत्यंत गरजेचं होतं. पूर्ण शक्ती एकवटून उठून बसलो. छातीच्या वेदना आणखी वाढल्या होत्या. लोकरीचे मोजे काढून पुन्हा जुने मोजे घातले. जोडे घालून बाहेर आलो. डोकं भयंकर दुखत होतं. बाहेर लोक पुढील टप्पा, ‘पंचतरणी’ला जायला निघाले होते. मला मात्र काहीही कळत नव्हतं काय करावं. माझं डोकं, विचारशक्ती जणू बधिर झाली होती.
(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link