Next
‘आपण ‘व्हाइट कॉलर जॉब’ समजुतीत अडकलो आहोत’
प्रेस रिलीज
Thursday, May 17 | 12:00 PM
15 0 0
Share this story

‘डीआयएफपीटी’तर्फे आयोजित कार्यक्रमात सुभाष इनामदार लिखित पुस्तकाचे प्रकाशन करताना विश्वास लोकरे. शेजारी डावीकडून अभय मठ, सुभाष इनामदार, मेधा कुलकर्णी, सर्वेश जावडेकर आणि डॉ. प्रवीण दबडगाव.

पुणे : ‘हाताने काम करणे आपल्याकडे कमी प्रतीचे समजले जाते. परदेशात मात्र ही भावना दिसत नाही. ऑस्ट्रेलियात आयत्या वेळी कामासाठी प्लंबर बोलवावा लागला, तर त्याला जवळपास ७० डॉलर प्रति तास या दराने शुल्क द्यावे लागते. आपण मात्र श्रमाचे काम आणि पंख्याखाली बसून केला जाणारा ‘व्हाइट कॉलर जॉब’ याच समजुतीत अडकलो आहोत,’ असे मत पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीरिंग रिसर्च फाउंडेशनचे (पीसीईआरएफ) अध्यक्ष विश्वास लोकरे यांनी व्यक्त केले.

ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी (डीआयएफपीटी) या संस्थेस सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेच्या संकेतस्थळाचे, तसेच ‘डीआयएफपीटी’चे संचालक सुभाष इनामदार यांनी लिहिलेल्या ‘कौशल्य विकास शोध आणि बोध’ या पुस्तिकेचे विश्वास लोकरे यांच्या हस्ते रविवारी प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

‘डीआयएफपीटी’तर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना विश्वास लोकरे.या प्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे सर्वेश जावडेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडगाव, ‘डीआयएफपीटी’चे संचालक अभय मठ उपस्थित होते. सदनिका ग्राहकाच्या दृष्टीने ‘प्लंबिंग’ आणि ‘वॉटरप्रूफिंग’ या गोष्टींना खूप महत्त्व असून, एकूणच श्रमाच्या कामास प्रतिष्ठा प्राप्त व्हायला हवी असल्याचे मत लोकरे यांनी व्यक्त केले.

आमदार मेधा कुलकर्णीआमदार कुलकर्णी म्हणाल्या, ‘पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणामार्फत कौशल्य विकसनासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असून, कौशल्य विकसनाची मानसिकताही तयार केली जात आहे. यापूर्वीही अशा योजना अस्तित्त्वात होत्या, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या आणि त्यांची कामे कागदोपत्री राहात होती. या सरकारने, मात्र योजनांच्या माध्यमातून खोटी कामे दाखवली जाऊ नयेत आणि योजनांचा योग्य प्रसार व्हावा याची काळजी घेतली. पुण्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन व्हावे यासाठी आम्ही आग्रही असून, कौशल्य विकसन संस्थांना जागा व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.’

जावडेकर म्हणाले, ‘प्लंबिंगमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची बचत करणे शक्य आहे; परंतु त्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याने त्याच्या अंमलबजावणीत अडचणी येतात.’

प्लंबिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थी मिळवणे आणि टिकवणे ही प्रमुख समस्या असल्याचे इनामदार यांनी सांगितले. ‘बहुसंख्य तरुणांच्या डोळ्यांत एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्ने असतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना त्यासाठी आवश्यक कौशल्ये नसल्यामुळे नोकरी मिळत नाही. शाळांमध्ये आठवीपासूनच कौशल्य प्रशिक्षण बंधनकारक करणे गरजेचे आहे. प्लंबिंग या विषयातील सेंटर ऑफ एक्सलन्स बनण्याचे संस्थेचे प्रयत्न आहेत,’ असे इनामदार यांनी सांगितले.
​​
‘आतापर्यंत संस्थेने ८००हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. प्लंबिंगबरोबर गॅस पायपिंगदेखील संस्थेच्या अभ्यासक्रमात शिकवले जात असल्यामुळे गॅस पायपिंगच्या क्षेत्रातील संधीही विद्यार्थ्यासाठी खुल्या होत आहेत. लवकरच महिलांसाठीही प्लंबिंग प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे,’ असे मठ यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link