Next
सावरकरांचे कार्य क्रांतियुद्धाचा पाया रचणारे
कीर्तनसंध्या उपक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांचे प्रतिपादन
अनिकेत कोनकर
Thursday, January 03, 2019 | 02:12 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळण्यासाठी ‘जोसेफ मॅझिनी’ आणि ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ ही पुस्तके लिहिली. मित्रमेळा या नावाने संघटना सुरू करून क्रांतिकारकांना जोडण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अवघ्या तीन जणांपासून सुरू झालेल्या या संघटनेचा पुढे ‘अभिनव भारत’च्या रूपाने विशाल वृक्ष होत गेला. त्यामुळे सावरकरांचे कार्य हेच क्रांतियुद्धाला आधारभूत आहे, क्रांतियुद्धाचा पाया रचणारे आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी केले. रत्नागिरीतील कीर्तनसंध्या उपक्रमात ते दोन जानेवारी २०१९ रोजी बोलत होते. 

रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवारातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘कीर्तनसंध्या’ या उपक्रमाचे यंदा आठवे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवाची सुरुवात दोन जानेवारी रोजी झाली असून, सहा जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत हा कीर्तन महोत्सव चालणार आहे. यंदाच्या कीर्तनांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामी, संत एकनाथ आणि संत नामदेव या संतपंचकासह भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास आणि क्रांतिकारकांचे प्रेरणादायी कार्य आफळेबुवा उलगडणार आहेत. पहिल्या दिवशी बुवांनी पूर्वरंगामध्ये संत ज्ञानेश्वर, तर उत्तररंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रातील प्रेरक गोष्टी सांगितल्या.

चारुदत्त आफळेबुवा म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामध्ये अनेक साम्यस्थळे होती. संत ज्ञानेश्वरांना ईश्वरभक्तांची, संतांची, वारकऱ्यांची मांदियाळी उभी करायची होती, तर सावरकरांना क्रांतिकारकांची मांदियाळी उभी करायची होती. संत आणि क्रांती यात साम्य नाही, असे वाटले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे, ज्यात रणांगणावर उपदेश केलेला आहे. भक्तिसंप्रदायाला गीता हा ग्रंथ प्रेरणादायी आहे, तसेच क्रांतिसंप्रदायाला प्रेरणादायी अशी गीता म्हणून कोणते तरी पुस्तक असण्याची आवश्यकता होती. म्हणूनच इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्याचा पराक्रम सावरकरांनी चरित्ररूपाने मांडला. क्रांतिसंप्रदायाला प्रेरणा मिळावी, हाच त्यामागचा उद्देश होता; मात्र आपली चळवळ परकीय व्यक्तीच्या चळवळीवर आधारित असलेली नको, म्हणून त्यांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहिले. हे दोन्ही ग्रंथ क्रांतिसंप्रदायासाठी ‘गीता’ ठरले. आपल्या चळवळीत जोडले जाणाऱ्यांना ते शिवचरित्रही जरूर वाचायला लावत. या त्यांच्या कार्यातून स्वातंत्र्ययुद्धाचा पाया रचला गेला.’

‘‘योग्य वेळी अर्जुनाला उभे केले पाहिजे, त्याच्याकडून पराक्रम घडवून घेतला पाहिजे,’ हा गीतेचा संदेश ज्ञानेश्वर आणि सावरकर या दोघांनाही कळला आणि पटला होता, हे त्यांच्या कार्यातून दिसते,’ असेही आफळेबुवा म्हणाले. 

आफळेबुवांचा सत्कार

सावरकरांचे व्यक्तिमत्त्व घडण्यात त्यांच्या वडिलांचे संस्कार किती महत्त्वाचे होते, हेही आफळेबुवांनी सांगितले. तसेच, असे संस्कार आजच्या पिढीतील मुलांवरही होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘सावरकरांचे वडील दामोदरपंत यांनी आपल्या घरामध्ये असलेली सगळी उत्तमोत्तम पुस्तके मुलांकडून प्रकट वाचून घेतली. रोजची वृत्तपत्रे कशी वाचावीत, हे त्यांना शिकवले. अग्रलेख वाचून घेतले. वाचनावर विचारमंथन करायची सवय लावली. त्यातूनच विनायकरावांना वाचनाची, वेगळा विचार करण्याची सवय लागली आणि जे ऐकू त्यावर ते काव्य करण्याचा छंद जडला. दुर्गादासविजय सप्तशती नावाने एक ग्रंथ त्यांनी लिहायला घेतला होता. त्याच्या ३००-४०० ओव्या तयार केल्या होत्या. रँडच्या वधाच्या आरोपाखाली दामोदर चापेकर यांना फाशी दिल्याचे वृत्त त्यांनी केसरी वृत्तपत्रामध्ये वाचले. ते वाचून त्यांनी खूप विचार केला आणि ही परंपरा थांबता कामा नये, असे तेव्हा १५ वर्षांचे असलेल्या सावरकरांना प्रकर्षाने वाटले. ही परंपरा सांभाळण्याच्या विचारातूनच त्यांनी मित्रमेळा ही संघटना स्थापन केली. त्यातूनच पुढे क्रांतिकारक तरुणांची फौज त्यांनी उभारली,’ असे आफळेबुवांनी सांगितले.  

ज्ञानियांचा राजा गुरुमहाराज, सोनियाचा दिवस आज, वाचिली कथा मी बंधूंची, मग आग जाहली माझ्या सर्वांगाची, बोलवती शब्द कसे, इथे जन्मला हिंदुत्वाचा कैवारी आदी पदे बुवांनी सादर केली. 

दीपप्रज्ज्वलन करताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे. शेजारी उमेश आंबर्डेकर, प्रदीप प्रभुदेसाई, प्रभात सप्रे आणि माधव कुलकर्णी आदी

थाटात उद्घाटन
रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे उभारलेल्या भव्य मंडपात महोत्सवाचे संध्याकाळी थाटात उद्घाटन झाले. या वेळी पितांबरी उद्योगसमूहाचे प्रदीप प्रभुदेसाई आणि ‘श्रीवल्लभ केटरर्स’चे प्रभात सप्रे , सामाजिक कार्यकर्ते  माधव कुलकर्णी, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी, उमेश आंबर्डेकर, नितीन नाफड, मकरंद करंदीकर आदी उपस्थित होते. श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

समर्पक साथसंगत 
निबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हेरंब जोगळेकर (तबला), आनंद पाटणकर (संवादिनी), मिलिंद लिंगायत (पखवाज), वैभव फणसळकर (सिंथेसायझर), अभिजित भट (सहगायन) यांनी आफळेबुवांना साथसंगत केली. 

राहुल पंडित यांचे स्वागत करताना आफळेबुवाचांगला प्रतिसाद
कीर्तनसंध्या उपक्रमाला गेली सातही वर्षे रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही पहिल्या दिवशीपासूनच कार्यक्रमाला आबालवृद्धांची गर्दी होऊ लागली आहे. पार्किंगची सोय आणि भारतीय बैठकव्यवस्थेसह खुर्च्यांचीही व्यवस्था आहे. यंदा दररोज प्रश्नमंजूषा हा उपक्रम राबवला जात असून, विजेत्या मुलांना दररोज बुवांच्या हस्ते बक्षीस म्हणून पुस्तक दिले जाणार आहे.

स्वच्छता अभियानासाठी ‘कीर्तनसंध्ये’चाही हातभार
मध्यंतरामध्ये आफळेबुवांनी रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचे स्वागत केले. स्वच्छता अभियानात रत्नागिरीला देशात चाळिसावा क्रमांक मिळाला. यासाठी ‘कीर्तनसंध्ये’च्या माध्यमातून केलेल्या प्रचाराचाही फायदा झाल्याचे नगराध्यक्षांनी बुवांना सांगितले. रत्नागिरी शहराला पहिल्या दहामध्ये नामांकन मिळावे, अशी सदिच्छा बुवांनी व्यक्त केली. 

(पहिल्या दिवशीच्या कीर्तनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत... २०१८च्या कीर्तनसंध्या उपक्रमातील कीर्तनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)सावरकरांची ई-बुक्स मोफत :
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्टतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र साहित्यापैकी बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. बुकगंगाच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरूनही ती डाउनलोड करता येतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
makarand About 74 Days ago
आफळेबुवांची किर्तने खूपच छान अनुभव आहे. रत्नागिरीकरांना दरवर्षी ही पर्वणी मिळते. याचा एक साक्षीदार हाेण्याचे भाग्य मला मिळाले.
0
0

Select Language
Share Link