Next
...आणि मी ईशान्य भारताकडे खेचला गेलो!
BOI
Tuesday, April 03, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

हाफलांग, आसाम

ईशान्य भारत म्हणजेच भारताच्या एका वेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा प्रदेश. या भागाला जसं निसर्गाचं वरदान आहे, तसंच नैसर्गिक साधन संपत्तीचंही. असं सगळं असूनही काही अंतर्गत घडामोडींमुळे, समस्यांमुळे हा प्रदेश बराच काळ वेगळा राहिला आहे. गेल्या काही काळात या प्रदेशाला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले असून, अनेक सामाजिक संस्था त्यासाठी काम करत आहेत. ते कार्य पाहून प्रेरित होऊन, स्वतःही सेवानिवृत्तीनंतर बराच काळ त्या भागात विविध प्रकारचे समाजकार्य केलेली व्यक्ती म्हणजे पुण्यातील अरुण सरस्वते. ‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही त्यांचे तेथील अनुभव सांगणारी लेखमाला आजपासून सुरू करत आहोत...
.............. 
ईशान्य भारतातील राज्ये म्हणजे ज्यांना आपण सेव्हन सिस्टर स्टेट्स म्हणून ओळखतो ती छोटी राज्ये. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, मेघालय, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा त्यात समावेश होतो. तर या राज्यांकडे मी एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे खेचलो गेलो होतो. त्याला कारणही तसंच होतं. १९७९च्या सुमारास आसाममधील हाफलांग येथे राहत असलेली माझी मानलेली बहीण मुक्ता भट्टाचार्य हिला भेटण्यासाठी गेले होतो. हाफलांग हे आसाममधील दार्जिलिंगसारखे थंड हवेचे ठिकाण व नॉर्थ काचार हिल्स हे जिल्ह्याचे ठिकाण चारही बाजूंनी निळसर डोंगरांनी वेढलेले. नागा, दिमासा, बंगाली, आसामी, कुकी, मार अशा विविध जाती-जमाती इथे घोळक्याने आपली संस्कृती सांभाळत आहेत. 

हाफलांग डोंगरावर असल्यामुळे सगळीकडे चढ-उतार असलेले रस्ते आहेत. दर शनिवारी बाजार भरतो, तेव्हा विविध जमातींचे, रंगीबेरंगी पोशाखात नटलेले गावकरी आपली फळे-भाजीपाला घेऊन विक्रीसाठी आलेले असतात. एकाची भाषा दुसऱ्याला कळत नाही; पण खरेदी-विक्रीचे व्यवहार व्यवस्थित चाललेले असतात. पहाटे चार-पाच वाजता सूर्योदय होतो, तेव्हा सर्व डोंगर-दऱ्या ढगांनी भरलेल्या असतात, जणू काही ढगांची नदी वाहत आहे, असे वाटते. मुक्ताकडे राहत असताना एकदा एक तरुण-तरुणी तिच्याकडे आली होती. मुक्ताने मला त्यांची ओळख करून दिली. तरुण होता श्रीकृष्ण भिडे व तरुणी अलका पाठक. दोघेही महाराष्ट्रात राहणारे. दोघेही ‘वनवासी कल्याण आश्रम’चे कार्यकर्ते होते. मुक्ता त्यांना नेहमी आर्थिक आणि काही उपयोगी सामानाची मदत करत असे. ती घेण्यासाठी ते आले होते. मुक्ताने आमची ओळख करून दिली. इतक्या दूरवर मराठी भाषिक एकमेकांना भेटल्यावर खूप आनंद वाटला. मी त्यांची चौकशी सुरू केली. इतक्या लांबवर ते कसे काय आले, काय करतात, किती दिवस राहणार वगैरे वगैरे. त्यांची उत्तरे व हकीकत ऐकून मी एकदम उडालोच आणि अंतर्मुख झालो. 

भिडे नागपूरचे होते व अलका ठाण्याची. त्यांनी सांगितलं, ‘आम्ही ‘वनवासी कल्याण आश्रम’चे कार्यकर्ते आहोत. येथील आदिवासींचा उत्कर्ष करणं, हे या संस्थेचे ध्येय. त्यांना स्वच्छतेचे धडे देणं, शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणं, भारताविषयी आत्मीयता जागृत करणं, हिंदू संस्कृती देवता, सणवार यांची माहिती देऊन त्या आचरणात आणणं, ख्रिश्चन धर्मांतरण करण्यापासून परावृत्त करणं, त्यांची संस्कृती व संस्कार जपणं, शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचा विकास करणं, हे कार्य या संस्थेतर्फे केलं जातं. कारण जोपर्यंत ती सुशिक्षित होणार नाहीत, तोपर्यंत आपण अमुक एक गोष्ट का करत आहोत आणि ते योग्य का अयोग्य, याची जाण त्यांना येणार नाही. त्यांच्याबरोबर राहूनच त्यांचं मतपरिवर्तन करायचं असतं.’ या कार्यासाठी आवश्यक असलेला निधी व सामग्री त्यांनाच गोळा करावी लागते. त्यासाठी ते मुक्ताकडे आले होते. 

मी त्यांना त्यांचं पुढील आयुष्य, लग्न आदी गोष्टींसंबंधी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की त्यांनी त्यांचे जीवन याच कार्याला समर्पित केलं आहे. ‘कारण हे एक राष्ट्रकार्य आहे. नागालँड, मिझोराम या भागातील संस्कृती लोप पावत आहे. तेथील लोक आता भारतापासून वेगळे होण्याची भाषा करत आहेत. भारताला आवश्यक असणारे खनिज तेल, युरेनियम, कोळसा यांच्या खाणी या भागात प्रचंड प्रमाणात आहेत. हा भाग भारतापासून वेगळा झाला, तर आपलं खूप नुकसान होणार आहे. हे असं होऊ नये, म्हणून वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, विद्याभारती, रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र यांचे कार्यकर्ते दूरवरच्या भागात काम करत आहेत. त्यांच्या शेकडो शाळा व वसतिगृहं आहेत. त्यात आदिवासी शिक्षण घेत आहेत. या कार्यास आमच्या घरच्यांच्याही पाठिंबा आहे. ते ही आदिवासींच्या जीवनात समरस झाले आहेत,’ अशी माहिती त्या दोघांनी दिली. इतकंच नाही, तर मलाही त्यांनी त्यांच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन केले. इतक्या लहान वयात आपल्या सर्व सुखांचा त्याग करून राष्ट्रप्रेमापोटी या आदिवासींच्या उत्कर्षासाठी आपल्याला समर्पित करण्याच्या त्यांच्या वृत्तीनं माझा त्यांच्याविषयी व इतर संस्थांविषयी आदरभाव वाढला. मीही त्या दिशेनं विचार करू लागलो. सेवानिवृत्तीनंतर जमेल तसं तिथे येऊन आदिवासींच्या उत्कर्षासाठी काम करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे मी ईशान्य भारताकडे खेचला गेलो.

२००० साली मी सेवानिवृत्त झालो. यानंतरचा काळ ईशान्य भारतासाठी घालवायचा हा विचार पक्का होता; पण नेमकं काय करायचं हे सुचत नव्हतं. पुढे माझ्या कार्याची दिशा मला आपोआप मिळाली. २००३च्या डिसेंबरमध्ये पुण्यातल्या मामा जोशी यांनी ईशान्य भारतातल्या सात राज्यांत सहल आयोजित केली होती. साधारण तीन आठवड्यांची सहल होती. त्या सहलीमधून या सात राज्यांत जाऊन आलो. प्रत्येक ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या आदिवासी वसतिगृहात जाऊन आलो. योगायोगाने आगरतळ्याला पुन्हा श्रीकृष्ण भिडे भेटले. वसतिगृहात या मुलांवर होणारे संस्कार, स्तोत्रपठण, शिस्त व दिनक्रम जवळून पहिला. आम्हा सर्वांवर त्याचा खूप प्रभाव पडला. तिथल्या तिथे आम्ही सर्वांनी वर्गणी जमा करून त्या त्या वसतिगृहांना आर्थिक सहायता म्हणून दिली. 

परत येताना मी गुवाहाटीहून एकटाच परत हाफलांगला मुक्ताकडे आलो. या वेळी तिथे उत्तर पूर्वांचल जनजाती सेवासमिती संस्थेचे रामानंदजी शर्मा यांचा परिचय झाला. विश्व हिंदू परिषदेद्वारा संचलित विवेकानंद हायस्कूल व मुलामुलींचे छात्रावास पाहिले. शिक्षणाचा दर्जा किती खालावलेला आहे, हे तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर बोलताना लक्षात आले. एखाद-दुसरा ग्रॅज्युएट किंवा ऑफिसमधून सेवानिवृत्त झालेली व्यक्ती शिक्षक म्हणून नेमल्या जातात. कधी कधी तिथेच दहावी पास झालेल्यांना शिक्षक म्हणून नेमतात. याविषयी शर्माजी म्हणाले, ‘हे ठिकाण शहरापासून खूप लांब आहे, शिवाय इथे पगार कमी असल्यामुळे सुशिक्षित पदवीधर कोणीही इथे येण्यास तयार होत नाहीत. विज्ञान शिकवताना प्रॅक्टिकल्सद्वारे हा विषय सोपा करून शिकविता येतो, हे  इथल्या शिक्षकांना माहीत नाही.’ 

बडा हाफलांग येथे विश्व हिंदू परिषदेच्या विद्या भारती संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर व राष्ट्र सेविका समितीद्वारे संचलित ‘गोकुळ’ हे मुलींचे वसतिगृह पाहिले. पुण्यातल्या सुनीता नांदेडकर या छात्रावासाच्या प्रमुख होत्या. त्यांचाही परिचय झाला. माझी शिक्षणाबद्दलची आवड पाहून शर्माजी व नांदेडकर यांनी मला तेथे राहून विद्यार्थ्यांना शिकविण्याची विनंती केली. अर्थात मी त्यांना होकार दिला आणि मी त्या ठिकाणचा ‘व्हिझिटिंग’ अर्थात ‘मानद शिक्षक’ झालो. मुक्ताप्रमाणेच अजून एका डॉक्टर कुटुंबाबरोबर माझे घरोब्याचे संबंध होते, ते दाम्पत्य होते डॉ. अजय पाल व डॉ. दीपाली बर्मन. दोघेही हाफलांग शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. रुग्णालयाशेजारीच त्यांची घरे होती. त्यांच्या समवेत मी तिथे राहत असे. त्यांची मुलगी अंकिता पुण्याला माझ्याकडे अकरावी-बारावीसाठी राहत होती. तीही आता डॉक्टर झाली आहे. रामानंदजी शर्मा यांचंही त्यांच्याकडे जाणं-येणं असे. त्यांचं खासगी क्लिनिक हाफलांगला आल्यावर माझी पंचाईत व्हायची. मुक्तासहित सर्वांनाच वाटे, की मी त्यांच्यासोबत राहावं. इतक्या दूरही अशी आपुलकी मिळाली याचा आनंद वाटतो. 
(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra honrao About 349 Days ago
फार छान कार्य. तुमच्या बरोबर यायला आवडेल
0
0
Ramchandra M. Deshpande About 351 Days ago
Very good ही लेखमाला रोज प्रसारित करण्यात येणार आहे का?
0
0

Select Language
Share Link