Next
पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेची ग्वाही
निर्धास्तपणे येण्याचे पर्यटन विभागाचे आवाहन
BOI
Thursday, March 28, 2019 | 06:09 PM
15 0 0
Share this article:

जम्मू-काश्मीरमधील पर्यटन व्यावसायिकांसह जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार ए. वाणी, ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर, सरहद संस्थेचे संजय नहार आदी मान्यवर.

पुणे : ‘जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित असून, त्यांना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची दक्षता सरकार आणि पर्यटन व्यावसायिकही घेत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी निर्धास्तपणे जम्मू-काश्मीरला यावे,’ असे आवाहन जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक निसार ए. वाणी यांनी पुण्यात केले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून, आगामी एप्रिल, मे महिन्यातील पर्यटनालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वांत जास्त संख्या महाराष्ट्रातील विशेषत: पुण्यातील पर्यटकांची असते. या पार्श्वभूमीवर येथील पर्यटकांनी निर्धास्तपणे जम्मू-काश्मीरमध्ये यावे, असे आवाहन करण्यासाठी जम्मू-काश्मीर पर्यटन विभाग आणि पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेचे तीस सदस्य पुण्यात आले होते. 


यानिमित्त ‘टूरिझम कॉन्क्लेव्ह’चे आयोजनही करण्यात आले होते. या वेळी पुण्यातील ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर, टीएएआय,पुणे चॅप्टरचे चेअरमन बेहराम पी. झादेह, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शेख अशिक, काश्मीर ट्रॅव्हल एजंट्स सोसायटीचे अध्यक्ष मीर अन्वर, सिल्क रूट हॉलिडेजचे व्यवस्थापकीय संचालक मंजूर पख्तून, ऑफबीट डेस्टिनेशन्सचे संचालक नितीन शास्त्री, लक्झरी हॉलिडेज, अॅ्डव्हेंचर ट्रॅव्हल अँड डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नासीर शाह, काश्मीर हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशनचे (खारोफ) संचालक वाहिद मलिक, काश्मीर फ्रेंडस ट्रॅव्हलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हमीद वांगो आणि ऑल कारगिल ट्रॅव्हल ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष अश्रफ अली आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘देशातील इतर कोणत्याही पर्यटन स्थळाइतकेच जम्मू-काश्मीर सुरक्षित असून, तिथे फक्त पर्यटकांच्या मदतीसाठी पोलिसांचा एक खास विभाग कार्यरत आहे. यामध्ये वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत अगदी किरकोळ अपवाद वगळता दहशतवादाचा धोका पर्यटकांना पोहचलेला नाही. पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे एकही उदाहरण नाही. पर्यटकांना सुरक्षेबाबत कोणतीही काळजी करू नये, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत,’ असे निसार ए. वाणी यांनी सांगितले. 

‘महाराष्ट्रातील लोकांचा आणि बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्यांचाही जम्मू-काश्मीरला कायमच पाठिंबा राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मनात असलेले भीती, गैरसमज दूर करून, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मुंबई, पुण्यासह अन्य काही शहरातही अशा कॉन्क्लेव्हचे आयोजन करत आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 
    

काश्मीर ट्रॅव्हल एजंट्स सोसायटीचे अध्यक्ष मीर अन्वर म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांचे असंख्य सकारात्मक अनुभव लोकांपर्यंत पोहचविणे आणि पर्यटन क्षेत्राला चालना देणे हे देशाच्या दृष्टीनेही अत्यंत गरजेचे आहे’.     

‘गेल्या काही वर्षात कारगिल हे ठिकाण पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत असून, २०१६ मध्ये तिथे ४२ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. २०१७ मध्ये ही संख्या ६७ हजारांवर पोहोचली तर गेल्यावर्षी २०१८ मध्ये एक लाखाहून अधिक लोकांनी इथे भेट दिली होती. १६ कोटी रुपयांचे उत्पन्न कारगिलमधील पर्यटनातून मिळाले. अद्याप इथे अनेक सुंदर, ऐतिहासिक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांनी बघितलेली नाहीत. अनेक पर्यटक इथे फक्त एक दिवस भेट देतात. पर्यटकांनी इथे जास्त दिवस राहावे, इथली अन्य ठिकाणे बघावीत असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सर्व उत्कृष्ट दर्जाच्या सोयी सुविधा आम्ही उपलब्ध केल्या असून, पर्यटकांच्या सुरक्षेची आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत,’ असे कारगिल व्यापार आणि पर्यटन संघटनेचे अध्यक्ष अश्रफ अली यांनी सांगितले. 

पुण्यासह कोल्हापूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील शंभरपेक्षा अधिक ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनी, टुरिझम प्रमोटर्स या ‘टूरिझम कॉन्क्लेव्ह’मध्ये सहभागी झाले होते.     
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search