Next
‘विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा अर्थसंकल्प’
अर्थसंकल्पाबाबत पुण्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया
BOI
Saturday, July 06, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच जुलै २०१९ रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया... 
------------------------------------------------------------ 
‘विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा अर्थसंकल्प’ : सीए आनंद जाखोटिया, विभागीय मंडळ सदस्य, आयसीएआय
‘अर्थसंकल्पात कॉर्पोरेट जगत, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे बदल केले आहेत. नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. वस्तू आणि सेवा कर (पाच कोटींपर्यंत) परतावा भरण्याचा कालावधी एका महिन्यावरून तिमाही करण्यात आला आहे. जीएसटी भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना स्वस्त दरात उद्योग कर्ज मिळणार आहे. इतर जीवनावश्यक सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधांवरही भर देण्यात आला आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या कर्जाच्या व्याजात विशेष सवलती देण्यात येणार असल्याने इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत. स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना मोठी कर सवलत देण्याची घोषणा केली आहे. ४०० कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांना २५ टक्के प्राप्तिकराची तरतूद आहे. त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल. एकूणच निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेला घेऊन जाणारा आहे.’

ऋता चितळे‘दूरदृष्टीने मांडलेला अर्थसंकल्प’ : सीए ऋता चितळे, अध्यक्षा, आयसीएआय
‘लोकांना तात्कालिक लाभ देण्याएेवजी त्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती, अपारंपरिक ऊर्जास्रोतांना प्रोत्साहन, इलेक्ट्रिकल वाहनांच्या वापराला प्राधान्य यातून सरकारची दूरदृष्टी दिसून येते. नवीन उद्योगासाठी विविध योजना रोजगाराला चालना देतील. कर विवरणपत्रांची संरचना बदलल्यामुळे करदात्यांना व कर संकलनात सुलभता येईल. सर्वसामान्यांना सवलती देताना पेट्रोल, डीझेल दरात वाढ व उच्च उत्पन्नधारकांना जास्त कर लावणे यातून नेहरूंच्या समाजवादी दृष्टीची आठवण येते. भविष्यातील गरज ओळखून ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या योजनेवर भर दिला आहे; तसेच त्यांना करांमध्ये मोठी सवलत दिली आहे. त्यामुळे अनेक तरुण स्टार्टअप सुरू करण्यासाठी पुढे येतील’.

अभिषेक धामणे‘देशाच्या सर्वांगीण विकासासाठीचा अर्थसंकल्प’ : सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष, आयसीएआय, पुणे
‘या अर्थसंकल्पात लघुउद्योग, शिक्षण, बांधकाम, वाहन उद्योग, पायाभूत सुविधा, बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये समतोल साधला आहे. लघुउद्योगांना व्याजदरात दोन टक्के सवलत तसेच दीड कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या लघुउद्योजकांना पेन्शन आणि ऑनलाइन कर्ज सुविधा निश्चितच उल्लेखनीय आहे. गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी साडेतीन लाखापर्यंत व्याजाद्वारे वजावट निश्चितच बांधकाम उद्योगाला फायद्याची ठरेल. बँकेतून एक कोटींपेक्षा जास्त पैसे काढल्यास दोन टक्के टीडीएस कापण्याच्या तरतुदीमुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकारण्यास मदत होईल. स्टार्टअप्सच्या जाचक अटींमधील शिथिलता व भरघोस मदत यामुळे स्टार्टअप्सला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल.’ 

नरेंद्र सोनावणे‘रिटर्न गिफ्ट’ देणारा अर्थसंकल्प : नरेंद्र सोनावणे, माजी अध्यक्ष, पाश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना, पुणे
‘मोदी सरकार-२ चा हा पहिला अर्थसंकल्प ‘रिटर्न गिफ्ट’ देणारा आहे. महिला, युवक, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी हा अर्थसंकल्प ‘अच्छे दिन’ घेऊन आला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसटी कमी केला असून, पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी महाग केले आहेत. छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना लागू केली. देशात २०२२ पर्यंत १.९५ कोटी घर बांधण्याची योजना बांधकाम व्यवसायाला चालना देईल. गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी सूट दोन लाखांवरून साडेतीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे; पण त्याचा फायदा मध्यमवर्गाला मिळेल का, याबाबत शंका आहे. सर्वसामान्य नागरिक, गरीब, शेतकरी, महिला आणि युवकवर्गाला केंद्रस्थानी ठेवून सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचे स्वागत केले पाहिजे. पुढील पाच वर्षांत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही’.

डॉ. हरीश पाटणकर‘सर्वसमावेशक अर्थसंकल्प’ : डॉ. हरीश पाटणकर, वैद्यकीय क्षेत्र
‘प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक वाटत आहे. सर्व क्षेत्रांचा विचार यामध्ये केला गेला आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी सर्वांत जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत ६४०० कोटी इतका निधी मंजूर केला आहे. या शिवाय कराच्या बाबतीत केलेल्या तरतुदी फार महत्त्वाच्या आहेत. नेहमीच्या करदात्यांकरून नियमित कर भरला जात होता; परंतु नव्या अर्थसंकल्पामधील तरतुदींमुळे श्रीमंत वर्गातील कर चुकवणाऱ्यांना आळा बसेल.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search