Next
वा. ल. कुलकर्णी, कृ. वि. सोमण, अतुल कहाते
BOI
Saturday, April 07, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

चोखंदळ समीक्षक वा. ल. कुलकर्णी, ‘निर्णयसागर पंचांग’कर्ते आधुनिक भास्कराचार्य ज्योतिषी कृ. वि. सोमण आणि ‘च ची भाषा’सारख्या अनोख्या विषयावरच्या पुस्तकाचे गाजलेले लेखक अतुल कहाते यांचा सात एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
.......
वामन लक्ष्मण कुळकर्णी

सात एप्रिल १९११ रोजी चोपडे गावी (जळगाव) जन्मलेले वामन लक्ष्मण कुळकर्णी अर्थात ‘वा. ल.’ हे उत्तम समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 

त्यांचं वाचन आणि वाङ्मयाचा अभ्यास अफाट होता. त्यांचे शिष्य नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांची आठवण एका ठिकाणी सांगितली आहे. ती अशी - ‘कागदाच्या तीन-चार छोट्या तुकड्यांवर लिहिलेली टिपणं घेऊन ते वर्गात प्रवेश करत असत आणि ती टिपणं टेबलावर ठेवून ते शिकवायला सुरुवात करत. खुर्चीवर ते बसत नसत, उभ्यानेच शिकवत. त्यांची भाषा सोपी आणि शब्दोच्चार स्पष्ट असायचे. त्यांच्या शिकवण्यातून, वाङ्मयाकडे अभ्यासकाने कसं पाहावं ते आम्हाला समजलं. ‘वालं’च्या बोलण्यात आणि वागण्यात विद्यार्थ्यांविषयी असणारे प्रेम सहज दिसे. ‘वालं’नी मराठी विभागातली अभ्यासपद्धतीच पार बदलून टाकली. दर महिन्यात एक सेमिनार होई आणि त्यात विद्यार्थ्यांपैकी एकाने निबंध वाचायचा असे. हा निबंधही काही कामचलाऊ नसायचा. कारण तो ऐकण्यासाठी पदव्युत्तर वर्गातले विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि त्याशिवाय शहरातल्या इतर सर्व महाविद्यालयांतले मराठी शिकवणारे प्राध्यापकही असत. ‘वालं’च्या घरी कधी गेलो, तर टेबलवर ‘टाइम्स’ची वाङ्मयीन पुरवणी आणि ‘लंडन मॅग्झिन’सारखी एक-दोन वाङ्मयविषयक मासिकं पडलेली असायचीच.’

वामन मल्हार : वाङ्मयदर्शन, वाङ्मयातील वादग्रस्त स्थळे, वाङ्मयीन मते आणि मतभेद, वाङ्मयीन टीपा आणि टिप्पणी, वाङ्मयीन दृष्टी, आणि दृष्टिकोन, श्रीपाद कृष्णा : वाङ्मयदर्शन, साहित्य आणि समीक्षा, मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास आणि वाङ्मयविचार, न. चिं. केळकर : वाङ्मयदर्शन, हरिभाऊंची सामाजिक कादंबरी, साहित्य : स्वरूप आणि समीक्षा, मराठी कविता : जुनी आणि नवी, नाटककार खाडिलकर : एक अभ्यास अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१९६५ साली हैदराबादमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

(वा. ल. कुलकर्णी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........

कृष्णाजी विठ्ठल सोमण 

सात एप्रिल १९०६ रोजी जन्मलेले कृष्णाजी विठ्ठल सोमण हे ‘आधुनिक भास्कराचार्य’ म्हणून ख्यातकीर्त असणारे प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ आणि गणित अभ्यासक! ते ‘निर्णयसागर पंचागकर्ते सोमण’ म्हणूनही प्रसिद्ध होते. 

त्यांनी १९५० साली ‘ज्योतिर्विद्या मंडळ’ या संस्थेची स्थापना केली होती. आणि त्यांनी अनेकांना खगोलशास्त्राची गोडी लावली. 

सुलभ ज्योतिषशास्त्र, गणेशपूजा अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

तीन जुलै १९७२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(कृ. वि. सोमण यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

अतुल कहाते 

सात एप्रिल १९७३ रोजी जन्मलेले अतुल कहाते हे ‘च ची भाषा’सारख्या अनोख्या विषयावरच्या पुस्तकाचे गाजलेले लेखक. 

माहिती तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र, क्रिकेट अशा विषयांवर ते माहितीपूर्ण आणि सखोल लेखन करत असतात. महारा‌ष्ट्र टाइम्स,  लोकसत्ता, सकाळ, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक वृत्तपत्रं आणि मासिकांतून ते लिहीत असतात. तसंच आयबीएन लोकमत, साम मराठी यांसारख्या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे कार्यक्रम होत असतात.

महामंदीच्या उंबरठ्यावर, महामंदीतून सुटका, महामंदी समजून घेताना, यांनी जग बदललं - ॲमेझॉन, यांनी जग बदललं - गुगल, यांनी जग बदललं - फेसबुक, रहस्य वंशवेलीचे, वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष नेल्सन मंडेला, वॉरेन बफे, संकट आयसिसचे, सुपर हिरो - अमर्त्य सेन, तुमचे आमचे सुपर हिरो - नारायण मूर्ती, स्टीव्ह जॉब्ज - एक झपाटलेला तंत्रज्ञ!, अणुबॉम्ब, अमेरिकी राष्ट्रपती, आय. टी. गाथा, ‘आयटी’तच जायचंय, इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी, It Happens Only In I.T. , XML and Related Technologies, कहाणी ‘फ्ल्यू’ ची - इन्फ्ल्यूएन्झा ते स्वाइन फ्ल्यू, केवळ ‘आयटी’तच, क्रिकेट कसं खेळावं, गुलाम - स्पार्टाकस ते ओबामा, ‘च’ची भाषा, तुमचे आमचे झुंजार, ट्‌विटर, तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड, ध्यास जिंकण्याचा, पॅलेस्टाइन इस्रायल - एका अस्तित्वाचा संघर्ष, पैसा, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(अतुल कहाते यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link