Next
चाँद जाने कहाँ खो गया...
BOI
Sunday, January 14 | 06:45 AM
15 0 0
Share this story

चित्रगुप्त श्रीवास्तव१४ जानेवारी हा संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी संगीत दिलेले ‘चाँद जाने कहाँ खो गया’ हे गीत...
........
आज चौदा जानेवारी! मकर संक्रांत! सर्व रसिकांना शुभेच्छा! चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून १४ जानेवारीचे वेगळेच महत्त्व आहे. या तारखेला १९१९मध्ये गीतकार कैफी आझमी यांचा जन्म झाला होता, तर १९२५मध्ये निर्माता-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचा जन्म झाला होता. आणि १९९१मध्ये याच तारखेला संगीतकार चित्रगुप्त यांचे निधन झाले होते. अलीकडच्या पिढीला या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यायची असेल, तर आमीर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाचे संगीतकार ‘आनंद-मिलिंद’ या संगीतकारांचे वडील म्हणजे संगीतकार चित्रगुप्त होय, अशी ओळख करून द्यावी लागेल. 

चित्रगुप्त यांचे पूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव! बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील करमैनी गावामध्ये १६ नोहेंबर १९१७ रोजी यांचा जन्म झाला. त्या दिवशी नेमकी ‘चित्रगुप्त पूजा’ हा बिहारमधील सण/उत्सव होता. म्हणून त्यांचे वडील जमुनाप्रसाद यांनी त्यांचे नाव चित्रगुप्त ठेवले! पाटणा विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषय घेऊन ते एमए झाले. ते स्वातंत्र्यसैनिकही होते. विद्यार्थिदशेत असताना त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली.

गायक बनण्याचे स्वप्न घेऊन ते १९४५ साली मुंबईला आले. भातखंडे संगीत विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. काही काळ संगीत अध्यापनाचे कामही केले. नंतर ते संगीतकार एस. एन. त्रिपाठी यांचे सहायक म्हणून काम करू लागले. ‘मनचला’, ‘शौकीन’, ‘किस्मत’ या काही चित्रपटात त्यांनी गाणीही गायली; पण गायनापेक्षा संगीताकडे जास्त लक्ष देण्याचा सल्ला एस. एन. त्रिपाठींनी त्यांना दिला.

१९५०पासून चित्रगुप्त स्वतंत्ररीत्या संगीत देऊ लागले. ‘हमारा घर’ हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट! १९८०पर्यंतच्या आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत चित्रगुप्त यांनी सुमारे १०० चित्रपटांना संगीत दिले; पण तरीही अनेक चित्रपटप्रेमी त्यांना संगीतकार फार मान देत नाहीत. त्यामागे चित्रगुप्त यांचे एक दुर्दैव असे, की त्यांना संगीत देण्यासाठी जे चित्रपट मिळाले, ते पोशाखी, पौराणिक आणि देमार स्टंट चित्रपट होते. अशा प्रकारच्या दुय्यम किंवा तृतीय दर्जाच्या चित्रपटांनाही संगीत देताना चित्रगुप्त यांनी त्यांच्या परीने सुरेल संगीत देण्याचा प्रयत्न केला. तसेच ऑपेरा हाउस, बडा आदमी, आधी रात के बाद अशा काही चित्रपटांसाठी चित्रगुप्त यांनी शास्त्रोक्त संगीतावर आधारलेलीही गाणी दिली आहेत.

गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या पाठींब्यामुळे चित्रगुप्त यांचा मद्रासच्या ए. व्ही. एम. या चित्रसंस्थेत प्रवेश झाला. ‘भाभी’ या चित्रपटातील उत्तम गीतांमुळे त्यांना प्रथम दर्जाचे चित्रपट मिळू लागले. त्यामध्ये बरखा, कंगन, माँ-बाप, पतंग, सुहाग सिंदूर असे सामाजिक चित्रपट होते. त्या सुमारे १३ चित्रपटांतील गीतांनी लोकप्रियता मिळवलीच; पण त्याचबरोबर चित्रगुप्त यांना नाव, वैभव, ग्लॅमर, प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढे त्यांनी मजरूह आणि प्रेमधवन या गीतकारांचीही गीते सुंदर संगीतात गुंफून लोकप्रियता मिळवली.

जाग दिले दिवाना..... (उंचे लोग), ये दुनिया पतंग (पतंग), मुझे दर्द दिल का पता न था (आकाशदीप), चल उड जा रे पंछी (भाभी), कोई बता दे (मैं चूप रहूँगी), लागी छूटे ना (काली टोपी लाल रुमाल), तेरी दुनिया से दूर (जबक) अशी चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधुर गीतांची मोठी यादी आहे. 

परंतु चित्रगुप्त यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, तलत मेहमूद, मुकेश या गायकांपेक्षा महंमद रफी यांच्या आवाजाचाच जास्त वापर केलेला दिसून येतो. चित्रगुप्त यांनी संगीत दिलेल्यापैकी महंमद रफी यांनी गायलेल्या गीतांची संख्या २४८ आहे आणि त्यापैकी ११० सोलो अर्थात एकल गीते असून, १३८ द्वंद/युगलगीते आहेत. आणि गायिकांच्या बाबतीत असे दिसून येते, की लता मंगेशकर यांचाच आवाज त्यांनी बहुतेक वेळा वापरला होता.

चित्रगुप्त यांनी संगीत दिलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत, लोकांच्या स्मरणात आहेत, याचे कारण कमीत कमी वाद्यवृंद, हलकेफुलके संगीत, साध्या-सोप्या मधुर चाली ही त्यांच्या संगीताची वैशिष्ट्ये होती. त्यांना संगीतकार न मानणारेही त्यांची गाणी ऐकतात. त्यामुळे आज त्यांच्या पश्चात २८ वर्षांनंतरही त्यांची आठवण पुसली जात नाही.

संगीतकार चित्रगुप्त यांनी संगीत दिलेल्या ‘मैं चूप रहँगी’ या १९६२मधील चित्रपटातील हे एक मधुर द्वंद्वगीत पाहा! काव्य राजेंद्रकृष्ण यांचे आहे. हे गीत अभिनेता सुनील दत्त आणि अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या चित्रित झालेले आहे.

दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतात. एका चांदण्या रात्रीच्या शीतल वातावरणात दोघे एकमेकांना भेटतात. आणि अशा एकमेकांमध्ये हरवूनही जातात. आणि थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात येते, की आपल्या प्रेमाचा साक्षीदार असणारा चंद्र कोठेच दिसत नाही. आणि मग त्या दोघांचा एक प्रेमळ संवाद सुरू होतो. प्रश्न-उत्तर स्वरूपातून गीत फुलत जाते.

‘तो’ म्हणतो...
तुमको चेहरे से पर्दा हटाना न था 

(अरेच्चा, हा) चंद्र कोठे हरवला/दडून बसला (हे प्रिये) तुझ्या चेहऱ्यावरील घुंघट/पडदा तू दूर करायला नको होतास. (कारण तुझ्या चेहऱ्याचे सौंदर्य बघून त्या सुंदर चंद्रालाही आपल्या सौंदर्यापेक्षा हे अप्रतिम लावण्य बघून आपले तोंड लपवावेसे वाटले असेल.) 

प्रियकराने असे म्हणताच प्रेयसी म्हणते - 

चाँदनी को ये क्या हो गया 
तुमको भी इस तरह मुस्कराना न था

(अरे, तू चंद्राच्या गोष्टी करतोस पण ते बघ) चांदणीलाही हे काय झाले? (कदाचित तुझ्या हास्यामुळे ती लाजली असावी म्हणूनच) तू अशा पद्धतीने हसायला नको होतेस. 

राजेंद्रकृष्ण यातून सांगतात, की आकाशात चंद्र व चांदणीहीचेही प्रेम फुलत आहे. आणि इकडे प्रेमाने आनंदित झालेला प्रियकर सभोवतालच्या वातावरणाबद्दल म्हणतो -

प्यार कितना जवाँ रात कितनी हसीं
आज चलते हुए थम गई है ज़मीं

(आपले हे) तरुण प्रेम आणि ही सुंदर रात्र, येथे (अशा सुंदर वातावरणात) चालता चालता ही भूमी (जमीन) (एकाच जागी) थांबल्यासारखी वाटत आहे (म्हणजे हे सुंदर वातावरण बदलू नये.)

यावर प्रियकराला ती सांगते, की 

आँख तारें झपकने लगे
ऐसा उल्फ़त का जादू जगाना न था 

(अरे) प्रेमाची अशी जादू तू जागवायला नको होतीस (की त्यामुळे) या चांदण्या डोळे झाकून घेऊ लागल्या आहेत (पापण्या मिटू लागल्या आहेत.)

या प्रेमसंवादात आता ती म्हणते -

प्यार में बेख़बर हम कहाँ आ गए
मेरी आँखों में सपने से क्यूँ छा गए 

(अरे प्रिया) या प्रेमात आपण भान हरपून कोठे येऊन पोहोचलो? (आणि तू) माझ्या नयनात स्वप्नाप्रमाणे का येऊन बसलास?

आपल्या प्रेमात पडलेली ‘ती’ जेव्हा प्रेमभराने असे प्रश्न विचारते, तेव्हा ‘तो’ही तिला सांगतो –

दो दिलों की है मंज़िल यहाँ
तुम न आते तो हमको भी आना न था

(अग प्रिये आपण कोठे आलो, हे तू काय विचारतेस) दोन हृदयांचे/मनांचे प्रीतीचे एक ठिकाण असते ना, तेथेच आपण येऊन पोहोचलो आहोत (आणि या ठिकाणावर) तू न येतीस, (तू भेटली नसतीस) तर मलाही येववले नसते, मी आलो नसतो (अर्थातच तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावरही मी प्रेम करणे अशक्य आहे.)

अत्यंत साधे शब्द, सोपा अर्थ, प्रेमाचा संवाद असलेले हे गाणे मधुर वाटते. कारण याची चाल, याचे संगीत आणि ते खुलवण्यासाठी असलेला मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा स्वर! दोन्हीही गोड आवाजासाठी ओळखले जाणारे! या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चंद्राने ज्या प्रेयसीला बघून आपले तोंड झाकून घ्यावे, अशी सौंदर्यवती कोण असेल? होय! शालीन सौंदर्य असलेली मीनाकुमारी या गीताला ‘चार चाँद’ लावते. म्हणून तर सुनील दत्त म्हणतो, की आकाशीचा चंद्र गेला कोठे? 

अशीच होती चित्रगुप्त यांची सुनहरी गीते!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link