Next
‘दिव्यांगांसाठी सर्वार्थाने पूरक मतदान केंद्रे आवश्यक’
प्रा. कविता मुरुगकर यांची मागणी
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 03:03 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत बोलताना जेष्ठ प्रा. सुरेश आठवले आणि ‘बीएनसीए’मधील युनिव्हर्सल डिझाइन केंद्राच्या प्रमुख आर्किटेक्ट प्रा. कविता मुरुगकर

पुणे : ‘दिव्यांग व्यक्ती हा आपल्या लोकशाही प्रणालीचा तितकाच महत्त्वाचा घटक आहे, त्यांची मते ही इतरांइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांच्यासाठी पूरक असणारी मतदान केंद्रे उभारली पाहिजेत,’ अशी मागणी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) युनिव्हर्सल डिझाइन केंद्राच्या प्रमूख आर्किटेक्ट प्रा. कविता मुरुगकर यांनी केली आहे. त्या दिव्यांग हक्कासंबंधीचे कामही करत आहेत.

प्रा. मुरुगकर यांच्या मागणीला ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘जगातील एक मोठे लोकशाही राष्ट्र असणार्‍या भारतात आज दिव्यांगांना मतदान करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. मतदान केंद्रावर एखादा उतार (रॅम्प) किंवा व्हीलचेअर असणे अत्यावश्यक आहे. सुगम्य भारत अभियानात सुगम्य मतदान होणे हेही निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक गोष्ट आहे.’

आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदान दिव्यांगांसाठी पूरक व्हावे यासाठी अभ्यासपूर्ण सूचना प्रा. कविता मुरुगकर यांनी केल्या आहेत. ‘सर्व प्रकारची शारीरिक व्यंगे असणार्‍या दिव्यांगांना या निवडणुकीत मतदान करता आले, तरच खर्‍या अर्थाने या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान झाले, असे म्हणता येईल,’ असे त्या म्हणाल्या. प्रा. मुरुगकर या डिझाइन ब्रिज फाउंडेशनच्या संचालकही आहेत.

‘या आधीच्या निवडणुकीतील निरीक्षणांवर आधारित सूचना राज्याच्या दिव्यांग विभागाचे आयुक्तांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी प्रत्यक्ष अंमलात आणणे शक्य आहे. अनेक मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी उतार, रस्ते, तसेच जिने चढून जाण्यासाठी रेलिंग्ज किंवा कठड्यांसारखी व्यवस्था करणे गरजेचे आहे. अंधांना स्पर्शातून चाचपडत जाणे सोयीचे जाईल यासाठी विशेष सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी ब्रेल लिपीतले मार्गफलक, मतदान यंत्रे किंवा कानांनी ऐकता येईल, अशी ध्वनियंत्रणा उपलब्ध केली पाहिजे. अशा सार्‍याच दिव्यांगांसाठी पिण्याचे पाणी, तसेच विशेष स्वच्छतागृहे आदी अनेक गोष्टींमधील त्रुटी यंदा प्राधान्याने भरून काढणे आवश्यक आहे. दिव्यांग व जास्त वयाच्या नागरिकांना तळ मजल्यावर मतदानाची विशेष व्यवस्था केली जावी,’ असे प्रा. मुरुगकर यांनी सांगितले.

दिव्यांगांसाठी करण्यात येणार्‍या या सुविधांसाठी होणारा खर्च हा अत्यावश्यक असून, तशी तरतूद केली गेली पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने आपली मतदान केंद्रे दिव्यांगस्नेही बनलील, अशी अपेक्षाही त्यांनी केली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search