Next
परस्परांचा आदर करा...
BOI
Saturday, April 28 | 06:45 AM
15 0 0
Share this story


आकाश घरात सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करायचा. कधी स्नेहावर तर कधी आईवर चिडायचा. घरातल्या प्रत्येकाने त्याचंच ऐकलं पाहिजे, असा त्याचा कायम हट्ट असायचा. जेवणात तो सांगेल तेच बनवावं लागायचं नाहीतर लगेच तो दोघींवरही चिडायचा आणि मग घरात न जेवता एकटाच बाहेर जाऊन जेवून यायचा... ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या नात्यांमधील नाजूक गोष्टींबद्दल....
......................................
२८ वर्षांची स्नेहा स्वतःहूनच समुपदेशनासाठी आली. आल्यावर प्रथम तिने स्वतःची सविस्तर ओळख करून दिली. स्नेहा एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका होती. गेल्या तीन वर्षांपासून ती त्या शाळेत नोकरी करत होती. स्नेहाच्या कुटुंबात चार सदस्य होते. स्नेहा, तिचा पती आकाश, त्यांची पाच वर्षांची मुलगी आणि स्नेहाची सासू. सहा वर्षांपूर्वी आकाश आणि स्नेहाचं लग्न झालं. स्नेहाच्या आई-वडिलांनी हे स्थळ स्नेहासाठी निवडलं होतं. घरातलं वातावरण रूढी-परंपरा यांना धरून निर्णय घेणारं असल्याने स्नेहा आणि आकाशचं लग्न अगदी कमी वेळात झालं. म्हणजे लग्नापूर्वी एकमेकांना भेटण्याची किंवा जाणून घेण्याची फारशी संधी त्या दोघांनाही मिळालीच नाही. 

दोघांचं लग्न ठरलं आणि दीड-दोन महिन्यात झालंही. लग्नानंतर मात्र स्नेहाला हळूहळू आकाशचा स्वभाव समजायला लागला. त्याचा स्वभाव खूपच तापट हट्टी आणि कडक होता. घरात तो सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करायचा. कधी स्नेहावर तर कधी आईवर चिडायचा. घरातल्या प्रत्येकाने त्याचंच ऐकलं पाहिजे, असा त्याचा कायम हट्ट असायचा. जेवणात तो सांगेल तेच बनवावं लागायचं नाहीतर लगेच तो दोघींवरही चिडायचा आणि मग घरात न जेवता एकटाच बाहेर जाऊन जेवून यायचा. घरातल्या भिंतीचे रंग, पडदे, वस्तूंची रचना, फर्निचर, सर्वांचे कपडे हे सगळं फक्त आणि फक्त आकाशच्याच आवडीचं होतं. 

दोघांनी लग्नानंतर कुठे जायचं हेदेखिल त्याने एकट्यानेच ठरवलं होतं. स्नेहाने त्याच्याबरोबर फिरायला जाताना कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने घालायचे, तिने कोणते कपडे विकत घ्यायचे, कोणत्या दुकानातून घ्यायचे हे सुद्धा आकाशच ठरवायचा. त्याच्याच मनाप्रमाणे तिने वागावं, यासाठी तो इतका हट्ट करायचा, की स्नेहापुढे त्याचं ऐकण्याशिवाय कोणताच पर्याय नसायचा. तिने स्वतःची इच्छा व्यक्त केली किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला नकार दिला, की तो इतका चिडायचा आणि रागवायचा, की स्नेहाला रडूच कोसळायचं. एकदा तो चिडला, की पुढचे चार-पाच दिवस तो तिच्याशी बोलायचाच नाही. त्याच्या या वागण्यामुळे स्नेहाची खूप घुसमट व्हायची. तिला स्वतःच्या मनाप्रमाणे काहीच करता यायचं नाही. आपण आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट केली आणि ती आकाशला नाही आवडली, तर काय..? हीच भीती सतत मनात घेऊन ती वावरायची. सतत मन मारून जगायची.

इतकी वर्षं तिने हे सहन केलं, पण आता हे सहन करणं तिला अवघड झालं होतं. आकाशबद्दल तिच्या मनात खूप राग, द्वेष, चिड निर्माण झाली होती. तिच्या सासूबाईंना तिची घुसमट, त्रास हे सगळं समजत होतं; पण मुलाच्या स्वभावापुढे त्याही हतबल होत्या. 

हा त्रास असह्य झाल्याने महिन्याभरापूर्वी स्नेहाने हे सगळं तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं आणि त्या मैत्रिणीने सुचवल्यानुसार ती समुपदेशनासाठी आली होती. तिच्या बोलण्यावरून आकाशची समस्या लक्षात आली होती. त्यामुळे तिला पुढच्या वेळी येताना आकाशलाही घेऊन येण्यास सांगितले. ठरलेल्या पहिल्या दोन सत्रांना आकाश आलाच नाही. तो स्नेहावर रागावला होता; पण स्नेहाने मुलीला घेऊन  माहेरी निघून जाणार असल्याचे सांगितल्यावर तो नाईलाजानेच समुपदेशनाला येण्यास तयार झाला. पहिल्या सत्रात तो विशेष काहीच बोलला नाही. स्नेहावरचा त्याचा राग गेला नव्हता. परंतु या सत्रात झालेल्या संवादानंतर तसेच त्याच्या असलेल्या अनेक शंकांच्या निरसनानंतर पुढच्या सत्रामध्ये तो हळूहळू मोकळा होऊ लागला. यानंतर आधी अप्रत्यक्षपणे आणि नंतर प्रत्यक्षपणे त्याच्या वर्तनाची त्याला जाणीव करून देण्यात आली. त्याचा हा स्वभाव त्यांच्या नात्यासाठी कसा मारक आहे, त्याच्या स्वभावामुळे स्नेहाची होणारी मानसिक- भावनिक घुसमट, त्यामागील कारणे. आपल्या मतांप्रमाणे इतरांच्या मतांना महत्त्व देण्याची गरज, त्यांचाही आदर करणे कसे महत्त्वाचे. 

आपल्या हट्टी स्वभावामुळे त्यांच्या व्यक्ती-स्वातंत्र्यात येणारे अडथळे, त्याचा नात्यावर होणारा नकारात्मक परिणाम याबाबत गांभीर्याने विचार करण्यास त्याला भाग पाडण्यात आलं. तसं त्याला योग्य मार्गदर्शनही केलं गेलं. या साऱ्यातून आकाशला त्याची चूक उमगत गेली आणि ती सुधारण्याची त्याने तयारीही दर्शवली. सुचवलेले वरचे सर्व प्रयत्न त्याने नेटाने केले. स्नेहानेही त्याला खूप सहकार्य केलं. यामुळे आकाशच्या वागण्यात खूप चांगले बदल घडून आले आणि त्यांचं नातं पुन्हा घट्ट झालं.

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link