Next
मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा
तरुणाईचा उत्साहवर्धक सहभाग
BOI
Monday, April 29, 2019 | 02:39 PM
15 0 0
Share this article:

श्री लक्ष्मीपल्लीनाथ

रत्नागिरी :
‘जीवनात चांगले, समाजहिताचे कार्य करून मनुष्य जन्माचे सार्थक करावे. कोणतेही काम करताना मनापासून करावे. तरच ते काम अत्यंत उत्तम पद्धतीने साकार होते,’ असे प्रतिपादन नागपूर येथील ह. भ. प. विनोदबुवा खोंड यांनी केले. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाच्या नुकत्याच झालेल्या चैत्रोत्सवात झालेल्या त्यांच्या कीर्तनांना भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ह. भ. प. विनोदबुवा खोंड

चैत्रोत्सवात खोंडबुवांनी केलेल्या कीर्तनांतून हे साधेच वाटणारे, परंतु अत्यंत महत्त्वाचे मुद्दे प्रभावीपणे, विस्ताराने मांडले. मनुष्य जन्माचे सार्थक कसे करता येईल, काम मनापासून केले तर काय होते, या गोष्टी त्यांनी सुंदर दाखले देऊन पटवून दिल्या. दर वर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा (१४ ते १९ एप्रिल) या कालावधीत हा उत्सव अत्यंत उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. लक्ष्मीपल्लीनाथाचा हा शतकोत्तर तृतीय चैत्रोत्सव होता, तर मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात (ता. लांजा) कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सातवा उत्सव होता. लक्ष्मीपल्लीनाथ हे चाळीस कुळांचे कुलदैवत आहे. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा आणि उत्साहपूर्ण सहभाग, तसेच नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये यंदाही ठळकपणे जाणवली. श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रासारखे धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम नेहमीप्रमाणेच पार पडले. तसेच हरिहर याग हेदेखील यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य होते. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. सामान्यतः विष्णू याग किंवा रुद्र याग केला जातो. पल्लीनाथाच्या उत्सवात मात्र यंदा या दोन्ही दैवतांचा एकत्रित म्हणजेच हरिहर याग करण्यात आला. उत्सवाच्या काळात दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशा पद्धतीने कार्यक्रम पार पडले. मंदिराच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त उत्सवाच्या पहिल्या दिवशी चतुःषष्टी (६४ उपचारांची) राजोपचार पूजा झाली. रात्री भाट्ये बंधूंचे मंगलाचरण आणि चांदोरकर बंधूंच्या सोमेश्वर मंडळाचे भजन झाले. उत्सवकाळात दररोज रात्री ह. भ. प. विनोदबुवा खोंड यांची कीर्तने झाली. त्यांना राजू जोशी (तबला), सुशील गद्रे (हार्मोनियम) यांची उत्तम संगीतसाथ लाभली. पौर्णिमेला लळिताच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली.दरम्यान, अखेरच्या दिवशी म्हणजे १९ एप्रिलला रात्री अजिंक्य पोंक्षे यांचा ‘भक्तिसंगीत रजनी’ हा रंगतदार कार्यक्रम झाला. त्यांना उत्तम करंबेळकर (तबला), सुशील गद्रे (हार्मोनियम) आणि प्रथमेश तारळकर (पखवाज) यांनी संगीतसाथ केली. उत्सवकाळातील सर्वच कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती होती. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या कुलोपासकांनीही उत्सवकाळात आवर्जून मंदिरात हजेरी लावली. सर्वच ठिकाणी असलेला तरुणांचा सक्रिय सहभाग हे या उत्सवातील सुखावणारे चित्र होते. भोवत्यांसारखी परंपरा, त्यात म्हटली जाणारी पदे, तसेच उत्सवातील अन्य कार्यक्रम हा एक सांस्कृतिक ठेवा असून, तो जपण्यासाठी तरुणाईने घेतलेला पुढाकार हे या उत्सवाचे ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य आहे. सर्वांनी उत्साहाने सहभाग घेऊन उत्सवाची शोभा वाढविल्याबद्दल श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाच्या वतीने सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. 

अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://www.laxmipallinath.com/

(ह. भ. प. खोंडबुवांच्या कीर्तनाची झलक दर्शविणारा, तसेच पारंपरिक भोवत्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search