Next
आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधींचे मोलाचे योगदान
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे गोपाळ तिवारी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान
BOI
Wednesday, August 21, 2019 | 04:04 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान, भ्रष्टाचार निर्मूलन, संरक्षण दलातील आधुनिकता, तरुणांना मतदानाची संधी अशा दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे भारत आज प्रगतिपथावर आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजीव गांधी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे; मात्र त्यांचे योगदान आणि बलिदान आपण विसरत चाललो आहोत, ही दुर्दैवी बाब आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार आणि राजीव गांधी यांची दूरदृष्टी चिरंतर ठेवायची असेल, तर काँग्रेस पक्षाने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम केले पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ तिवारी यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकारनगर येथील भीमसेन जोशी कलादालनात झालेल्या या कार्यक्रमावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, ‘पीएमटी’चे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे, शारदा तिवारी, संयोजक आबा बागुल, सदानंद शेट्टी यांच्यासह पुण्याचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘सद्यस्थितीत काँग्रेस उपेक्षित अवस्थेत आहे. नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यापुढे काँग्रेस गलितगात्र झाल्याचे दिसत आहे. विचारांशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची वानवा हे त्याचे कारण आहे. काँग्रेस म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक. आज देश एकाधिकारशाहीकडे जात असताना राजीव गांधी यांचे सर्वसमावेशक विचार पसरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या पडत्या काळात आपण सर्व एकत्र येऊन विचार पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे, ही समाधानाची बाब आहे. सत्तालोलुपांनी निष्ठा गहाण ठेवून काँग्रेसला दूर केले आहे. अशा वेळी निष्ठावान काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गटबाजीला दूर सारले, तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील.’

बाळासाहेब शिवरकर म्हणाले, ‘राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने आज आयटी पार्कमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळाला. बोफोर्स तोफांमुळेच कारगिल युद्ध जिंकले. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी त्यांनी डिजिटायझेशन सुरू केले. लोकशाही प्रक्रियेत तरुणांना सहभागी करुन घेतले. अनेक समाजहिताचे निर्णय घेणाऱ्या राजीव गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.’

गोपाळ तिवारी म्हणाले, ‘काँग्रेस कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपणारा असतो. ज्यांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करीत आहे, त्या आदरणीय राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ उक्तीप्रमाणे काँग्रेस विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी काम करत आहे. महात्मा गांधी आणि राजीव गांधी यांच्या विचारांची सांगड घालून युवक काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस आणि पालिकेत चांगले काम करता आले. या प्रवासात कुटुंबीयांची साथ मिळाली.’

आबा बागुल म्हणाले, ‘आपले आयुष्य समाजसेवेसाठी वाहणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्काराची सुरुवात केली असून, यामुळे जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारार्थींना मिळेल.’ 

मोहन जोशी म्हणाले, ‘राजीव गांधींच्या प्रेरणेतून गोपाळ तिवारी निष्ठेने काम करत आहेत. पद असो वा नसो, त्यांनी काँग्रेस विचार सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत सामाजिक काम केले. त्यांचा हा उचित सन्मान झाला आहे.’

रमेश बागवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आबा बागुल यांनी केले. मुख्तार शेख यांनी सूत्रसंचालन केले. सदानंद शेट्टी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search