Next
मनाची पकड घेणारी माईआजीची गोष्ट!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Saturday, June 23, 2018 | 02:35 PM
15 0 0
Share this story

स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू होऊन पुढल्या काही वर्षांपर्यंत घडणारी, एका तडफदार स्त्रीची मनात रुतणारी कथा ‘सुफळ संपूर्ण’ या कादंबरीत मांडण्यात आली आहे. ज्या काळात स्त्रीचं स्थान बहुतकरून माजघर आणि स्वयंपाकघर यातच सीमित असायचं, त्या काळात, पुण्यासारख्या शहरात लहानाची मोठी झालेली, सायकल चालवणारी मुलगी लग्न होऊन चिंबोरीसारख्या आडगावात येते आणि ब्राह्मण इनामदारांची सून म्हणून धीरानं सर्व कारभार हाकते, ते वाचताना आपण कधी हरखून जातो, तर कधी नकळत डोळे पाणावतातसुद्धा. नेहा कुलकर्णी यांनी या कादंबरीतून रेखाटलेली माईआजी ही मराठी साहित्यात एक अविस्मरणीय भर नक्कीच! 
..............
लेखिका नेहा कुलकर्णी यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मावशीकडून त्यांना माईआजीविषयी समजत गेलं आणि त्यांच्या मनात त्या व्यक्तिरेखेने घर केलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अत्यंत कणखर बाण्याच्या या लोकविलक्षण स्त्रीची कथा मग त्यांनी ‘सुफळ संपूर्ण’ या छोटेखानी कादंबरीतून आपल्यासमोर आणली आहे. 

पुण्यात राहणाऱ्या अभ्यंकरांची बकुळा, त्र्यंबकची पत्नी आणि आपटे इनामदारांची सून म्हणून पुण्याहून दूर असणाऱ्या चिंबोरी गावात जाते. शहरातल्या चालीरीती बाजूला ठेवून आपट्यांच्या घरच्या चालीरीती स्वीकारते, अगदी शहरातली पाचवारी साडी नेसणं सोडून नऊवारी लुगडं नेसण्यापासून ते चहाऐवजी दूध पिणं अशा सवयी अंगीकारून! गावच्या इनामदारांची शहरी सून, त्या स्वातंत्र्यपूर्व काळात गावात सायकल चालवणारी पहिलीच म्हणून कोण अप्रूप!

बकुळेची लग्नानंतर झालेली उमा... तिचं त्र्यंबकबरोबरच्या मीलनाच्या रात्रीचं अगदी मोजक्या ओळींत केलेलं गोड वर्णन... आपटेवाड्याची उमावहिनी झाल्यावर तिच्यात होत गेलेले भावनिक बदल... तिचं त्या भव्य आपटेवाड्यात रुळत जाणं आणि गावच्या ओंकारेश्वराशी जुळलेलं भावनिक नातं या गोष्टी नेहाल कुलकर्णी यांनी इतकं हळुवार उलगडत नेलंय, की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. वाड्याची भव्यता आणि त्यातल्या अनेक खोल्यांची त्यांनी केलेली वर्णनं अफलातूनच! असरट पसरट वाडा, दणकट लाकूड, भक्कम काम, दोन भागांतलं स्वयंपाकघर, बैठा ओटा, वाड्यात गेल्या गेल्या आंबेमोहर भाताचा येणारा वाफाळता वास, स्वयंपाकघराच्या पलीकडच्या न्हाणीघरातले तांब्याचे तीन-साडेतीन फूट खोलीचे मोठे हंडे, घंगाळं, डाळीबिळी घालून बनवलेल्या उटण्याचा, तांब्याच्या भांड्यांचा आणि पाणी तापवण्यासाठी जळलेल्या लाकूडफाट्याचा सुरेख संमिश्र सुगंध हे सारं तंतोतंत डोळ्यांसमोर उभं ठाकतं. 

उमेचा संसार बहरतो. नवऱ्याला, त्र्यंबकला त्याच्या दुकानदारीतही तिची उत्तम साथ मिळते. मुळातच सुबत्ता असलेला वाडा तिच्या आगमनाने समृद्ध होतो. सायकल चालवणारी उमा तसाच बाका प्रसंग आल्यावर, वादळी पावसाळी रात्री बैलगाडी जुंपून हिमतीनं आजारी सासऱ्याला दुसऱ्या गावात डॉक्टरकडे घेऊन जाऊन त्याचे प्राण वाचवण्याइतकी धैर्यवानही होते. होताहोता उमावहिनीचा दरारा वाढतो. काही वर्षं लोटतात. इनामदारांची उमावहिनी आता वाड्याची माई झालेली असते. माई खंबीरपणे कारभार हाकत असते.  

...पण कालांतराने त्यांच्यावर काही संकटं कोसळतात. जवळची माणसं दगा देतात. कोर्टकज्जा सुरू होतो. आणि अशातच गांधीहत्येची बातमी येते आणि पाठोपाठच महाराष्ट्रभर सर्व ब्राह्मणांची घरं जाळण्याची मोहीम सुरू होते. चिंबोरीसारख्या आडगावी आणि इनामदारांनी सर्वांशी इतके चांगले संबंध ठेवल्यामुळे त्यांच्या वाड्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही हा समज खोटा ठरवत गावातलीच मंडळी वाड्याला आग लावण्यासाठी एका रात्री मशाली घेऊन चाल करून येतात आणि सर्वांना माईंचं आणखी एक धक्कादायक रूप दिसतं. माई बंदूक घेऊन हल्लेखोरांचा प्रतिकार करते आणि वाडा वाचवते. ह प्रसंग रोमहर्षकच उतरलाय. 

वय वाढत जातं. त्र्यंबक सर्व जबाबदारी कधीच झटकून अध्यात्माकडे वळलेला असतो, पण त्याची पत्नी उमावहिनी ऊर्फ माई समर्थपणे गाडा हाकत असते. हळूहळू वाड्यावर आश्रयाला आणि शिक्षणासाठी आधार म्हणून काही गरजू मुली राहायला येतात. माई त्यांना जातपात न बघता खुशाल पंखांखाली घेते. आणखी काही वर्षं जातात. आता त्र्यंबक आणि माईचे, आबा आणि माईआजी झालेले असतात. पुढे आबांचा मृत्यू होतो आणि माईआजी एकटीच उरते. आणि तिच्या विलक्षण आयुष्याची कथा सुफळ संपूर्ण होते. 

‘आपण सगळेच जण म्हणजे एक झाड असतो. म्हणजे कसं, की आपल्या सगळ्यांची मुळं कुठेतरी आत खोल रुजलेली असतात..,’ अशा पकड घेणाऱ्या शब्दांनी सूर होऊन आपल्या मनाची पकड घेत रंगत जाणारी, ही व्यवसायानं पत्रकार असणाऱ्या नेहा कुलकर्णी यांनी लिहिलेली कादंबरी प्रत्येकाने जरूर वाचावी अशीच!
 
पुस्तक : सुफळ संपूर्ण     
लेखक : नेहा कुलकर्णी     
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, आनंदनगर, नवघर, वसई रोड (प), पालघर ४०१ २०२    
संपर्क : (०२५०) २३३५२०३
पृष्ठे : ८० 
मूल्य : १०० ₹ 

(‘सुफळ संपूर्ण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link