Next
छोटी सी बात
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, December 12 | 12:45 PM
15 0 0
Share this story

आज जे पन्नाशी-साठीत आहेत, त्यांच्या गद्धेपंचविशीत समाजात तितका मोकळेपणा नव्हता किंवा कमी होता... मुलामुलींचं एकत्र बोलणं, फिरणं, एकमेकांबरोबर कट्ट्यावर, टपरीवर किंवा एखाद्या जॉइंटवर बसून एकमेकांना ‘हायफाइव्ह’ देत खिदळणं हे आजच्याइतकं ‘सहज’ होत नव्हतं... मुलीच काय, पण मुलंही बऱ्यापैकी लाजायची आपल्या भावना व्यक्त करायला... अशाच त्या ७०च्या दशकाच्या अधल्यामधल्या काळातल्या तरुणतरुणीचं भावविश्व नेमकं पकडणारा सुपरहिट धमाल लव्हेबल सिनेमा म्हणजे ‘छोटी सी बात’... आजच्या ‘सिनेसफरमध्ये त्या सिनेमाविषयी! 
.......
तो काळच तसा होता... प्रेमात पडायच्या वयात नसायचा ना सगळ्यांकडे तेवढा धीटपणा!! तितकं धाडस, तितका स्मार्टनेस नसायचा, की आपलं उठावं एखाद्याने आणि धाडकन तिच्यासमोर उभं राहून सांगावं तिला, ‘मला तू खूप आवडतेस... होशील माझी जीवनसाथी?’ वगैरे!!!... सगळ्यांना नव्हतं ना जमत ‘जोगिया’तल्या त्या तरुणासारखं सांगणं - ‘मम प्रीती आहे जडली तुजवर राणी’... काय की, पण मेजॉरिटी मुलंमुली भिडस्त असायचे असल्या बाबतीत त्या काळात! आपल्यापैकी आज जे पन्नाशीत आहेत, त्यातल्या कित्येकांनी हा अनुभव घेतला असेल तेव्हा...  कुणीतरी ‘ती’ आवडण्याचा... कुण्या ‘ति’च्या प्रेमात आकंठ बुडण्याचा...कदाचित शाळकरी वयात... किंवा शाळा संपता संपता... किंवा कॉलेजात... किंवा मग एकाच एरियात राहणारी कुणी... किंवा आपल्याच ऑफिसातलीच कुणी... पण ते हृदयात ‘ट्रिंग ट्रिंग’ होणं आणि मग एका वेगळ्याच भावनेने आयुष्य भरून आणि भारून जाणं... सारखा तिचा चेहरा डोळ्यांसमोर असणं... मग कधी तरी ‘तिला धीर एकवटून सगळं सांगायला हवं’ हे वाटूनसुद्धा प्रत्यक्षात मात्र तितकं डेअरिंग न होणं... आज जे पन्नाशी-साठीत आहेत त्यांच्या गद्धेपंचविशीत समाजात तितका मोकळेपणा नव्हता किंवा कमी होता... मुलामुलींचं एकत्र बोलणं... फिरणं... एकमेकांबरोबर कट्ट्यावर, टपरीवर किंवा एखाद्या जॉइंटवर बसून एकमेकांना ‘हायफाइव्ह’ देत खिदळणं... पटकन ‘हग देणं’ - हे आजच्याइतकं ‘सहज’ होत नव्हतं... मुलीच काय पण मुलंही बऱ्यापैकी लाजायची आपल्या भावना व्यक्त करायला... भिडस्तपणा म्हणा किंवा आणखी काही... तर, अशाच त्या ७०च्या  दशकाच्या अधल्यामधल्या काळातल्या तरुण-तरुणींचं भावविश्व ‘करेक्ट’ पकडणारी ही सुपरहिट, धमाल लव्हेबल कहाणी ‘छोटी सी बात’! 

सिनेमा सुरू होतो ‘जॅकसन तोलाराम कंपनी’चा जनरल मॅनेजर नौशेर्जी बोमनजी बाटलीवालाच्या परिचयाने. त्याचा प्रेमविवाह झालाय शिरीन दारूवालाशी. बाटलीवाला-दारूवालाची लव्हस्टोरी एकेकाळी चांगलीच गाजलेली. कंपनीचे चीफ अकाउंटंट हिराजी नानजी पारीख यांचंही अफेअर ऑफिसातल्याच हंसा मेहताशी होऊन लग्न झालेलं.... तर वासुदेवन नंबियार या एक्झिक्युटिव्हची, नर्स पार्वती अम्माशी प्रेमकहाणी रंगलेली. इतकंच काय, पण शिपाई पांडुरंगचंही एका विधवा रुक्मिणीशी प्रेम जुळून लग्न झालेलं. थोडक्यात काय, तर जॅकसन तोलाराम कंपनीची खासियत आहे प्रेम जुळून होणाऱ्या लग्नांबद्दल! आणि आता आपल्या ऑफिसची प्रेमपरंपरा चालवतोय सुपरवायझर ग्रेड-२ पदावरचा भिडस्त, लाजराबुजरा, फुलशर्ट घालून आणि तोही पँटमध्ये न खोचता आउट ठेवणारा साधाभोळा बॉय नेक्स्ट डोअर अरुण प्रदीप (अमोल पालेकर)! अरुण प्रेमात पडलाय, त्याच्याच रोजच्या बसस्टॉपवरून ९:०५ च्या ८६ नंबरच्या बसने जाणाऱ्या प्रभा नारायणच्या (विद्या सिन्हा)! फक्त याच्या प्रेमकहाणीत अजून रंग भरायचाय. कारण बिचाऱ्याचं प्रेम एकतर्फी आहे. प्रभाला पत्ताच नसतो त्याच्या प्रेमाचा! 

हा रोज बिचारा बसस्टॉपवर तिची वाट बघणार. ती आली की याच्या छातीत धडधड सुरू. बसस्टॉपवर तिच्याकडे चोरून बघणं आणि तिने बघताना पकडलं तर गोरंमोरं होणं! बसमध्ये ती सीटवर बसली आहे... हा उभा... आणि मग मध्ये माणसांची गर्दी वाढल्यावर कसंतरी अँगल साधत तिच्याकडे पाहत राहणं... प्रभा त्याच्याच जवळच्या ऑफिसमध्ये काम करते आणि त्याच्या एकंदरीत गोंधळावरून तिला हळूहळू कळलंय, की हा गडी बहुधा प्रेमात पडलाय आपल्या! पण अरुण बिचारा प्रेमातच काय, पण ऑफिसातसुद्धा दुर्लक्षितच आहे. हाताखालचे कारकून सोडा, शिपाई पण भाव देत नाही त्याला. बॉसचं डाफरणं त्यालाच सहन करावं लागतंय. संध्याकाळी ऑफिसमधून निघून हा प्रभाचं ऑफिस सुटायची वाट बघणार आणि मग ती निघाल्यावर तिच्या मागेमागे मंतरल्यासारखा जात रहाणार. तिने मागे वळून पाहिलं, की मग याची तारांबळ बघायलाच नको. मग उगाचच बूटपॉलिशवाल्याकडे उभं राहून बूट पॉलिशच काय करून घेईल किंवा मग कावराबावरा होऊन अबाउट टर्न करून चक्क तिथून सटकूनच काय जाईल... बिचारा तिच्याबरोबर गप्पा मारण्याची, सिनेमाला जाण्याची ‘दिवास्वप्नं’ काय ती बघत असतो... पण प्रत्यक्षात तिच्याशी बोलण्याइतका धीर मात्र एकवटणं शक्य होत नसतं त्याला!... 

प्रभा त्याची तारांबळ बघत असते. त्याच्या साधेपणाची तिला कुठेतरी कौतुकवजा गंमत वाटतेय. एक दिवस बसच्या रांगेत काहीतरी विषय काढायचा म्हणून तीच त्याला ‘किती वाजले?’ विचारते, तर हा गडी ‘ती आपल्याशी बोलली’ या जाणिवेनेच गार!... तोंडातून शब्द कुठचा फुटायला? प्रभा तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला, नंदाला (नंदिता ठाकूर) त्याच्या त्या सर्व गमतीजमतींचे अपडेट्स देत असते. एक दिवस त्याने घरापर्यंत फॉलो केल्यावर तिने असंच थांबून गर्रकन मागे वळल्यावर साहेबांची घाबरगुंडी उडालेली असते. त्याच्या दुसऱ्याच दिवसाची गोष्ट. 

प्रभा चक्क जॅकसन तोलाराम कंपनीच्या ऑफिसमध्ये आल्यावर ‘ती आपली तक्रार करायला आली की काय?’ या शंकेने हा हैराण!! प्रत्यक्षात ती तिच्या कंपनीच्या कामासाठी आलीय, हे कळल्यावर मात्र याचा जीव भांड्यात. आता हा प्रेमात एक पाऊल पुढे जाणार असं आपल्याला वाटेपर्यंत ‘प्रेमात बिब्बा’ किंवा ‘कबाब में हड्डी’ म्हणतात तसं नागेश शास्त्री (असरानी) या तिच्या ऑफिसमधल्या सुट्टीवरून परतलेल्या सहकाऱ्याची एंट्री. तो दोघांच्याच बसस्टॉपवरून आपल्या पिवळ्याधम्मक स्कूटरवरून निघालाय. तो एकदम स्मार्ट, बोलबच्चन आहे. तो आग्रह करून तिला बोलावतो आणि डबलसीट बसवून घेऊन जातो. अरुण बिचारा बसतो बघत... खट्टू होऊन... पण धीर एकवटून तो तिला लंचसाठी हॉटेलमध्ये बोलावतो, तर नेमका तिथेच आलेला नागेश पुन्हा एकदा कबाब में हड्डी बनून अरुणच्या लंचचा विचका करतो. अरुण आता अस्वस्थ... नागेशची ती लुडबुड... दररोज डोळ्यांदेखत प्रभाला आपल्या स्कूटरवर बसवून घेऊन जाणं अरुणला चांगलंच झोंबतंय. तो चक्क तिरमिरीत उठून एका गॅरेजवाल्याकडून मामा बनून एक रद्दड सेकंडहँड मोटरबाइक विकत घेतो. अर्थात प्रभाला मागे बसवून निघाल्याची स्वप्नं रंगवत!.. दुसऱ्या दिवशी निघतोही चक्क प्रभाला मागे बसवून; पण हाय रे दुर्दैवा!.. ती रद्दड बाइक गचके खात वाटेतच बंद पडते आणि त्याच्या जखमेवर मीठ चोळायला मागून पिवळ्या स्कूटरवरून आलेला नागेश त्याच्या ‘डब्बा’ बाइक खरेदी करण्याच्या अकलेची कीव करून, वर प्रभाला घेऊन त्याच्या नाकावर टिच्चून निघून जातो... 

नशिबाला दोष देत पूर्णपणे खचलेला अरुण मग मिळेल ते उपाय ट्राय करू पाहतो. कसंही करून प्रभाला मिळवायचंच म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होतात. रस्त्यावर बसणारे पोपटवाले ज्योतिषी, हस्तरेषासामुद्रिक, हिप्नोटिस्ट, भविष्याची पुस्तकं, हाताला ताईत बांधणं, पेपरातलं राशिभविष्य, भोंदू मौनीबाबा (पार्श्वभागातून फळ काढून प्रसाद म्हणून देणारा!)... आणि फायनली कुणाच्या तरी सांगण्यावरून मुंबईपासून दूर खंडाळ्यात राहणारा रिटायर्ड कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोककुमार) आपल्याला मदत करू शकेल अशा आशेने अरुण मजल-दरमजल करत त्याच्या बंगल्यावर जाऊन पोहोचतो आणि तिथून सिनेमात एक विलक्षण वेगळी रंगत यायला सुरुवात होते.

कर्नलकडे सल्ला मागायला येणाऱ्या क्लायंटेलची लिस्ट त्याच्या सेक्रेटरीच्या तोंडून ऐकून तो चाट पडत चाललेला असतोच आणि तेवढ्यात कर्नलचा सल्ला घ्यायला सुपरस्टार अमिताभ बच्चन शूटिंगमधून इथे आलेला पाहून आतून वेडाच होतो. आपण योग्य माणसाकडे आलोय याची त्याला खात्री पटते. कर्नल अरुणकडून सर्व परिस्थिती समजून घेतो. त्याची केस ‘लव्हज लेबर्स लॉस्ट’ असल्याचं समजून त्याच्या प्रेमप्रकरणात स्वतः लक्ष घालून मदत करण्याचं आश्वासन देतो. आणि अरुणचं प्रेमात जिंकण्यासाठीचं ट्रेनिंग सुरू होतं. 

कर्नल त्याला काही बेसिक रूल्स शिकवतो – १) शेकहँड करताना फर्म ग्रिप असावी. २) नाक खाजवणं किंवा डोकं खाजवणं बंद. ३) ताठ मानेनं डोळ्यात डोळे घालून बघावं... हे समजवताना कर्नलच्या तोंडी काही मजेशीर चमकदार वाक्यं आहेत (पटकथा, संवाद बासू चॅटर्जी यांचेच) जसं की - ‘जिंदगी की क्रिकेट मे ड्रॉ नहीं होता। या तो जीत होती है या हार। और जीत उसी की होती है जो उपर है।’ किंवा ‘यू नो अरुण, दी बॉटम इज ऑल व्हेरी क्राउडेड बट देअर इज ऑल्वेज रूम अॅट दी टॉप’... आणि हळूहळू कर्नल त्याला प्रेमातल्या प्रतिस्पर्ध्यावर बाजी उलटवण्याशिवाय पर्याय नाही हे समजावतो आणि मुलीला जिंकायचे डावपेच शिकवतो... ते सर्व ऐकण्यासारखं आणि बघण्यासारखंच!!... तिकडे सालस आणि गरीब अरुणच्या आठवणीत हळव्या झालेली प्रभाची मनःस्थिती अत्यंत अचूकपणे टिपणारे शब्द गीतकार योगेश यांनी मांडलेत – ‘न जाने क्यू होता है, ये जिंदगी के साथ, अचानक ये मन किसी के जाने के बाद – करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात?..’ आणि त्याच वेळी इकडे कर्नलकडून ट्रेनिंग मिळवत असलेला अरुण एकेक पायरी शिकत पुढे निघालाय!!... गाणं संपतं. नंतर जे घडत जातं ते अत्यंत मनोरंजक पद्धतीने बासूदांनी मांडलंय. 

कात टाकलेला एक नवाच अरुण मुंबईत परततो. आता तो सुटाबुटात! आणि त्याने नागेशवर एकेक करत उलटवलेले डावपेच! नागेशला स्कूटरवर तिष्ठत ठेवून प्रभाशी बसस्टॉपवर गप्पा आणि मग तिला बसने पाठवून तिच्याऐवजी स्वतःच नागेशच्या मागे बसून जाणं, नागेश ज्या दोन खेळांत प्रवीण असतो त्या ‘चेस आणि टेबल टेनिस’मध्ये युक्त्याप्रयुक्त्या वापरून त्याला नामोहरम करणं, नागेशला न जमणारं चॉपस्टिक्स वापरून लीलया चायनीज खाणं, आणि तिथे नागेशचा सपशेल पचका होणं... (आणि या पार्श्वभूमीवर मुकेशच्या आवाजात एक अत्यंत समर्पक मधुर गाणं – ‘ये दिन क्या आये, लगे फूल हसने देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने..’)...ऑफिसमधेही त्याचं रूप सगळ्यांना चक्रावून सोडणारं, प्रचंड कॉन्फिडंट अरुण आता आपला रुबाब सर्वांवर प्रस्थापित करतो. आणि अर्थातच प्रभाचं मन जिंकत जातो. 

कर्नलने स्वतःसुद्धा बहुधा त्याच्या आयुष्यात एका ‘प्रभा’चं प्रेम गमावलंय आणि म्हणून त्याला आता अरुणला ही ‘प्रभा’ मिळावी आणि त्यांची ताटातूट होऊ नये असं मनापासून वाटतंय. म्हणून तर एका भेटीत त्याचे आणि प्रभाचे संवाद फार गोड आहेत.

कर्नल : प्रभा, बडा प्यारा नाम है तुम्हारा. तुम अरुण को कब से जानती हो? 
प्रभा : यहीं कुछ थोडे दिनों से..
कर्नल : कैसा लडका है? मुझे तो बहोत पसंद है. तुम्हें?
प्रभा : अच्छा है। 
कर्नल : मैं जानना चाहता था, तुम्हें पसंद है या नाही? 
प्रभा : चलिये चलते है... 
कर्नल : इसका मतलब है तुम्हे पसंद नहीं? 
प्रभा : ये बात नहीं..
कर्नल : मैं समझता हूँ, सवाल बडा टेढा है। एक बात कहता हूँ प्रभा। तुम्हारा नाम सुन के एक बडी पुरानी बात याद आ गयी। एक लडकी थी जिसका नाम इत्तेफाक से प्रभा था। एक लाडका उस से बहुत प्यार करता था। लेकीन जिंदगी में दोनो मिल नही पाये। 
प्रभा : क्यूँ नहीं मिल पाये? 
कर्नल : उन्हें मिलना चाहिये था ना?
प्रभा : हां, अगर दोनो का प्यार सच्चा था, तो जरूर मिलना चाहिये था।
कर्नल : यही मैं तुमसे सुनना चाहता था...

कर्नलच्या ट्रेनिंगने मिळालेल्या एका नवीन आत्मविश्वासाने आणि एकमेकांविषयी उमलून आलेल्या प्रीतीने अरुण आणि प्रभा एकत्र येतात आणि शेवट गोड!... (आणि शेवटी पडदा पडता पडता नागेश खंडाळ्याला कर्नलची वाट शोधत जाताना दिसतो).

अमोल पालेकर जबरदस्त फॉर्मात होता त्या वेळी. यातला सुरुवातीचा भिडस्त, बुजरा, नाक खाजवणारा, शालीन आणि नंतरचा एकदम स्मार्ट तरुण त्याने कमालीच्या सहजतेने वठवलाय. ७४ सालच्या रजनीगंधानंतरच्या दोन वर्षांतच त्याचे ‘चितचोर,’ ‘घरोंदा’ आणि ‘छोटी सी बात’ हे सिनेमे आले आणि तुफान हिट झाले. पाठोपाठच दोन वर्षांत त्याने ‘भूमिका’, ‘अगर’, ‘दामाद’ आणि ‘गोलमाल’ यांसारखे सिनेमे करून लोकांचं मन जिंकलं होतं. विद्या सिन्हानेही त्या तीन-चार वर्षांत ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘इन्कार’, ‘मुक्ती’, ‘किताब’ आणि ‘पती, पत्नी और वो’ यांसारख्या सिनेमांद्वारे आपलं एक स्थान निर्माण केलं होतं; पण या सिनेमात आपल्या अत्यंत सहज देहबोलीने आणि संवादफेकीने दादामुनी अशोककुमार यांचा रिटायर्ड कर्नल ज्युलियस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग भाव खाऊन जातो!... असरानीचीही भूमिका छान! आणि सलीलदांच्या संगीतातली सर्वच गाणी मस्त! धरम-हेमाचं दर्शन देऊन जाणारं ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन...’

एका गोड प्रेमाची ही मजेशीर कथा. एकदा पाहिल्यावर पुनःपुन्हा पाहावा असा आणि अजून पहायचा राहिला असेल, तर आज लग्गेच पाहून टाकावा असाच!!!!!! 
 
(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link