पुणे : पुणे महानगर परिषद या संस्थेतर्फे ‘ऑनलाइन औषध विक्री योग्य की अयोग्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी मार्गदर्शन केले. हे चर्चासत्र २७ सप्टेंबर २०१८ रोजी पत्रकार भवनात झाले.
झगडे म्हणाले, ‘औषध विक्री आणि त्याबाबाबतचे कायदे चांगले आहेत; पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी देण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. गुटखा वाइट असून, तो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो हे कळायला ३० वर्षे गेली. ऑनलाइन औषध विक्रीच्याबाबतीत ३० वर्षांनी तसेच काही दुष्परिणाम ऐकायला मिळतील तेव्हा काय करणार. कोट्यवधी प्रिस्क्रिप्शन ऑनलाइन कशी तपासणार. या प्रश्नी औषध विक्रेत्या संघटना, नागरिक, ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या असून, रुग्णांच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांची तर वानवाच आहे.’
या वेळी या चर्चासत्रात माजी आयुक्त (अन्न औषध प्रशासन) झगडे यांच्यासह हृदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, जनरल प्रॅक्टिशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर, सायबर क्राइम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पेठ कार्यकारी संचालक सुर्यकांत पाठक, ऑनलाइन औषध विक्रेते ईझी फार्माचे संचालक अनिकेत बोरा, आउटसोर्सिंग प्रायव्हेट एसवायएस लॉजिक लिमिटेडचे संचालक समीर गोडबोले यांचा सहभाग होता.

पाठक म्हणाले, ‘ऑनलाइन विक्रीच्या निमित्ताने परकीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करत असून, मूठभरांच्या हातात सर्व सत्ता द्यायची आहे का. त्यातून त्यांनी पुढे किंमती वाढविल्यास कोण रोखणार. ऑनलाइनमुळे बेरोजगारीही वाढेल याचा धोका आहे.’
डॉ. शिंदे म्हणाले, ‘फार्मासिस्ट हे व्यावसायिक तज्ज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवता येतो; मात्र डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनला चोरूनही ऑनलाइन खरेदी शक्य असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. ऑनलाइन खरेदीतून रुग्णाला कमी पैशांत औषधे मिळणार असतील, तर विरोध नाही; मात्र त्यांची विश्वासार्हता तपासावी लागणार आहे.’
ऑनलाइन औषध विक्री प्रतिनिधी बोरा म्हणाले, ‘ज्या ग्राहकांना जुनाट विकार आहेत आणि दरमहा ठरलेली औषधे घ्यावी लागतात अशांना ऑनलाइनचा फायदा होऊ शकतो. खात्रीने ठरलेल्या वेळी औषधे मिळतील.’ ऑनलाइन विक्रेतेदेखील शासनाकडूनच प्रमाणित असतात आणि प्रशिक्षित असतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वैजनाथ जागुष्टे यांनी तातडीच्या औषध सेवेसाठी शेजारच्या औषध विक्री दुकानाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
पुणे महानगर परिषदचे निमंत्रक अॅड. गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी चर्चासत्राचे संयोजन समिती सदस्य अॅड. गणेश सातपुते, कार्याध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष किरण बराटे, योगेश खैरे, सरचिटणीस केदार कोडोलीकर, खजिनदार संजय दिवेकर, सहखजिनदार अनिरुद्ध खांडेकर, चिटणीस दत्तात्रय जगताप, चिटणीस अॅड. राजेश तोंडे यांसह औषध विक्री क्षेत्रातील मान्यवर, विक्रेते, तसेच पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.