Next
रत्नागिरीत रंगणार ‘थिबा राजवाडा कला संगीत महोत्सव’
BOI
Wednesday, January 02, 2019 | 12:20 PM
15 0 0
Share this article:

देवकी पंडितशिखरनाद कुरेशीआदित्य मोडकरत्नागिरी : नव्या वर्षाची सांस्कृतिक सुरुवात आर्ट सर्कलच्या ‘थिबा राजवाडा कला संगीत महोत्सव’ या दिमाखदार सोहळ्याने होणार असून, हा महोत्सव २५ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित केला आहे.
 
महोत्सवाचे उद्घाटन २५ जानेवारीला होईल. या दिवशी जगप्रसिद्ध बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा शिष्य सौरभ वर्तक आणि तौफिक कुरेशी यांचे पुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे पुतणे शिखरनाद कुरेशी हे दोन नव्या पिढीतील दमदार कलाकार महोत्सवाचा प्रारंभ करतील. आफ्रिकन तालवाद्य झेंबे आणि अस्सल भारतीय बासरी यांच्या संगमाचा आनंद महोत्सवाच्या प्रारंभी रसिकांना मिळणार आहे. शिखरनाद यांनी अनेक जगप्रसिद्ध गायक आणि वादक कलाकारांना साथसंगत केली आहे. स्वतंत्र कलानिर्मिती करण्याचा वडिलांचा वसा ते पुढे नेत आहेत. सौरभ हे बहुआयामी वादक असून, शुद्ध शास्त्रीयवादनाबरोबरच ते सतार, सरोद, व्हायोलिन, आणि गायन यांना सहवादनदेखील करतात. त्यांचा स्वतःचा फ्यूजन बॅंड असून, त्यांनी उस्ताद शाकिर खान आणि शौनक अभिषेकी यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या सोबत काम केले आहे.

शुभंकर बॅनर्जीयाच दिवशी लोकप्रिय गायिका विदुषी देवकी पंडित यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. गेल्या तीन दशकांपासून देवकीताईंचा स्वर रसिकांच्या कानात रुंजी घालत आहे. गानसरस्वती किशोरी आमोणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारख्या गुरूंकडून मार्गदर्शन घेत त्यांनी स्वरांची आराधना केली आहे. त्यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाचा पहिला दिवस संपेल. आसमंत बेनेव्हलन्स यांनी महोत्सवाचा प्रारंभीचा दिवस प्रायोजित केला असल्याने या  दिवसाचा आस्वाद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे.

२६ जानेवारीला भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अद्भुत वास्तव म्हणजेच तालयात्रा साकारणार आहे. जगप्रसिद्ध तबलावादक आणि गुरू तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या प्रतिभेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही अभिजात कलांचा सुंदर मिलाफ आहे. विविध भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्य, गायन आणि कथ्थक यांचा समावेश आहे. यात गुरू पंडित तळवलकरांना सावनी तळवलकर आणि आशय कुलकर्णी हे तबलासाथ, ओंकार दळवी आणि कृष्णा साळुंखे पखवाजसाथ, अभिषेक भुरुक ड्रम, उमेश वारभूवन झेंबे, ईशान परांजपे केजोन, अभिषेक शिनकर संवादिनीसाथ करतील. नागेश आडगावकर, विनय रामदासन हे गायक कलाकार आहेत. अमृता गोगटे, ईशा फडके, आयुषी दीक्षित या कथ्थक नृत्य सादर करतील. या संपूर्ण कार्यक्रमाला अनय गाडगीळ हे कीबोर्डसाथ करतील.
 
पंडित सुरेश तळवलकरसौरभ वर्तकमहोत्सवाच्या अखेरच्या दिवसाची म्हणजेच २७ जानेवारीची सुरुवात शास्त्रीय संगीतातील दोन तरुण गायक रमाकांत गायकवाड आणि आदित्य मोडक यांच्या सहगायनाने होईल. रमाकांत यांनी संगीताचे बाळकडू आई-वडिलांकडून घेत गायनाचे धडे गिरवणे सुरू केले. किराणा आणि पटियाला घराण्याच्या अंगाने वयाच्या सहाव्या वर्षापासून ते गाण्याचे शिक्षण घेत आहेत. आदित्य यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून चंद्रकांत पारकर यांच्याकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर प्रदीप धोंड आणि आता गायक डॉ. राम देशपांडे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आहे. या दोघांनीही भारतभरातील विविध मानाच्या महोत्सवांमधून सादरीकरण केले आहे.

रमाकांत गायकवाडसुप्रसिद्ध व्हायोलिनवादक विदुषी कला रामनाथ यांच्या सादरीकरणाने महोत्सवाचा शेवट होईल. मेवाती घराण्याच्या शिष्या असलेल्या कला रामनाथ यांनी १४ वर्ष पंडित जसराज यांच्याकडून शिक्षण घेतले आहे. लयीवरची पकड, स्वरांमधली स्पष्टता आणि आशयगर्भता ही त्यांच्या वादनाची खास वैशिष्ट्ये आहेत. वयाच्या अडीचाव्या वर्षापासून गायन आणि व्हायोलिनचे शिक्षण रामनाथ यांचे आजोबा विद्वान नारायण अय्यर यांनी द्यायला सुरुवात केली. आज गाणारे व्हायोलिन अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे. त्यांना पंडित शुभंकर बॅनर्जी हे तबलासाथ करतील.

‘२५, २६ आणि २७ जानेवारी या तीन दिवसांमध्ये साकारणार्‍या या भव्य महोत्सवाचा सर्व रसिकांनी आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन आर्ट सर्कलतर्फे करण्यात आले आहे.

कला-संगीत महोत्सवाविषयी :
दिवस : २५ ते २७ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता 
स्थळ : थिबा राजवाडा प्रांगण, रत्नागिरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search