Next
पंचवटी एक्स्प्रेसच्या ‘सी थ्री कोच’चा बारावा वाढदिवस साजरा
BOI
Friday, March 29, 2019 | 11:15 AM
15 0 0
Share this article:नाशिक :
नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची जीवनवहिनी समजल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमधील ‘सी थ्री कोच’चा बारावा वर्धापनदिन प्रवाशांनी नुकताच केक कापून मोठ्या आनंदात साजरा केला. या कोचची गिनिज बुकात नोंद असून, या कोचमधील प्रवासी शिस्त पाळून आणि आस्थेने या कोचची काळजी घेतात.

मनमाड-मुंबई मार्गावर धावणाऱ्या आणि इंटरसिटी एक्स्प्रेसचा दर्जा असलेल्या पंचवटी एक्सप्रेसमधील ‘सी थ्री’ या डब्याचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. पंढरीनाथ घुगे, रेल परिषदेचे अध्यक्ष गुरमितसिंग रावल, जयराम दियालानी, अशोक रुपवते, अमोल घाटगे, डॉ. सुहानंद सोनार, तुषार भवर, गोविंद वागे, आरती माळी, विनार गणवीरे, पवन दोंडमिया, दत्ता दळवी, प्रज्ञा चंद्रमोरे, उत्तम टाकळकर, विनायक पगारे, कोमल भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सातला आदर्श कोचमध्ये नाशिक ते इगतपुरीदरम्यान वर्धापनदिनाचा कार्यक्रम झाला. घुगे आणि रावल यांच्या हस्ते केक कापण्यात आला. सायंकाळी सव्वा सहाला दादर ते कल्याणदरम्यान दुसरा कार्यक्रम झाला. रेल परिषदेचे दिवंगत अध्यक्ष बिपीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोच आदर्शवत झाला. प्रवासादरम्यान जपलेली मूल्ये, शिस्त, स्वच्छता आदींमुळे या कोचची नोंद ‘लिम्का बुक’मध्ये झाली आहे. गांधी यांच्या निधनानंतर हा कोच आदर्श ठेवण्याचे कार्य रेल परिषद एनएक्स या नावाने प्रवासी करत आहेत. संपूर्ण पंचवटी गाडी नवीन आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ व कमी वेळेत होत आहे. 

या वेळी घुगे म्हणाले, ‘पंचवटी गाडी आपले कुटुंबच आहे. या कोचची व गाडीची काळजी सर्वांनी घ्यावी. पंचवटी गाडी नवीन स्वरूपात सुरू करण्यासाठी दिवंगत बिपीन गांधी यांनी प्रयत्न केले. सी थ्री कोच आदर्श करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.’ अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. या कोचचा विक्रम अन्य जागतिक पुस्तकांमध्ये होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस या वेळी प्रवाशांनी व्यक्त करून दाखवला. पंचवटी एक्स्प्रेस आदर्श ठरावी, यासाठीने सर्व कोच स्वच्छ आणि व्यसनविरहित असले पाहिजेत, अशी इच्छा महिला प्रवाशांनी व्यक्त केली.

‘प्रत्येक कोच आदर्श व्हायला पाहिजे, या उद्देशाने आम्ही वाढदिवस साजरा करीत असून, रेल्वे गाडी स्वच्छ ठेवणे ही प्रवाशांची सामाजिक जबाबदारी आहे. प्रवाशांना चांगला संदेश जावा, या उद्देशाने आम्ही दर वर्षी या कोचचा वाढदिवस साजरा करतो. या कोचची नोंद गिनिज बुकात झालेली असून, पंचवटी एक्स्प्रेसच्या सगळ्या कोचची गिनीज बुकात नोंद व्हावी, हा आमचा उद्देश आहे,’ असे रेल परिषदेचे अध्यक्ष गुरमितसिंग रावल यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search