Next
१४ विद्या, ६४ कलांचे माहेरघर - कोल्हापूर
BOI
Wednesday, February 13, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

कोल्हापूरला १४ विद्या, ६४ कलांचे माहेरघर समजले जाते. याची साक्ष पटविणाऱ्या विविध पर्यटनस्थळांची माहिती ‘करू या देशाटन’च्या आजच्या भागात घेऊ या.
.........
कोल्हापुरात क्रीडापटू, लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, नाटककार, अभिनेते, अभिनेत्री, नृत्यांगना, नर्तक, संगीतकार, वादक, चर्मकार, लोहार, विणकर, सुवर्णकार, पत्रकार, गायक, विचारवंत, राजकीय नेते यांची मांदियाळी आहे. जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ब्रह्मपुरी येथील उत्खननात सापडलेल्या ग्रीक देवतेच्या मूर्तीवरून कोल्हापूरचा युरोपीय ग्रीक संस्कृतीशी संबध असावा असे दिसून येते. कोल्हापूरला दक्षिणकाशी असेही संबोधले जाते. 

कोल्हापूरची माती सुपीक आहे. कोल्हापूर नैसर्गिकदृष्ट्याही समृद्ध आहे. ‘विद्यानगरी’ म्हणून कोल्हापूरने स्थान निर्माण केले आहे. शिवाजी विद्यापीठ, तसेच अनेक अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये येथे आहेत. औद्योगिक जिल्हा म्हणूनही कोल्हापूरचे नाव असून, कृषी-आधारित उद्योगात तो आघाडीवर आहे. कोल्हापुरी चप्पल आणि चांदीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत. कोल्हापूरचे दूध, साखर आणि गूळ घराघरात पोहोचला आहे. 

कोल्हापूर सहकारी चळवळीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. १० हजारांहून अधिक सहकारी संस्थांचे जाळे येथे पसरले आहे. यामध्ये बँका, कृषी, नागरी, दूध, तंबाखू, साखर यांचे सहकारी संघ आणि कारखाने, मजूर सोसायट्या, पतसंस्था यांचा समावेश आहे. गोकुळ, वारणा या संस्था मुंबई-पुण्यातही दूधपुरवठा करतात. समृद्ध इतिहासामुळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लोकांची गुणवत्ता यामुळे कोल्हापूरची एक वेगळी संस्कृती विकसित झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक परिवर्तनाचे अध्वर्यू समजले जातात. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. सध्याचे राजे छत्रपती संभाजी महाराज हे सामाजिक कार्यात अग्रणी आहेत. तसेच ते राज्यसभेचे खासदारही आहेत. 

कोल्हापूर ही कलाकारांची भूमी आहे. चित्रनगरी म्हणूनही कोल्हापूरची ख्याती आहे. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, केशवराव भोसले, अभिनेते सूर्यकांत, चंद्रकांत हे बंधू, गणपत पाटील, रमेश देव, सुधीर फडके, जगदीश खेबूडकर, अरुण सरनाईक अशा अनेक दिग्गजांची कोल्हापूर ही जन्मभूमी आहे. ही नामावळी खूप मोठी आहे. भाई बागल, कॉ. पानसरे, दाजीबा देसाई, तात्यासाहेब कोरे, रत्नाप्पा कुंभार यांच्यासारख्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मंडळींनीही आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उठविला. वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, शिवाजीराव सावंत, सुमती क्षेत्रमाडे असे लेखकही येथे झाले. ‘पानिपत’कार विश्वास पाटीलही या मातीमधीलच.

न्यू पॅलेस, कोल्हापूर

कोल्हापूरचे भूषण असलेल्या ‘न्यू पॅलेस’पासून पर्यटनस्थळांची माहीती घेऊ. 

न्यू पॅलेस : हे कोल्हापूरचे वैभव दर्शविणारे एक ठिकाण आहे. १८७७ ते १८८४मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. मेजर मॅन्ट या आर्किटेक्टने या भव्यदिव्य वास्तूचे संकल्पचित्र तयार केले होते. घडीव पॉलीश केलेल्या दगडामध्ये ही इमारत बांधली आहे. मध्यवर्ती मनोऱ्यावर घड्याळ बसविण्यात आले आहे. इंडो-युरोपियन शैलीच्या या इमारतीवर मुघल व राजस्थानी प्रभाव दिसून येतो. ही इमारत अष्टकोनी असून, पहिल्या मजल्यावर सध्याचे राजे श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज रहातात. खालील मजल्यावर छत्रपती शाहू संग्रहालय आहे. मराठेशाहीची झलक बघायची असेल, तर इतिहासप्रेमी, कलाप्रेमी व पर्यटकांनी येथे भेट दिलीच पाहिजे, असे हे संग्रहालय आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातील व्यक्तींच्या वापरातील भरजरी पोषाख, दागदागिने, शस्त्रे, चांदीचे हत्ती, ब्रिटिश व्हाइसरॉय आणि भारताच्या गव्हर्नरकडून आलेली पत्रे आणि औरंगजेबची तलवार या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तू येथे पाहायला मिळतात. पॅलेसच्या मध्यभागी दोन मजली उंचीचा भव्य दरबार हॉल आहे. कोल्हापूरच्या राजवैभवाची साक्ष देणारा हा हॉल अत्यंत कल्पकतेने आकर्षक पद्धतीने सजविला आहे. बाजूच्या भिंतीवर शिवाजी माहाराजांच्या जीवनातील दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. फोटो गॅलरीतील शिकारीची दृश्ये पाहता पाहता वेळ कसा जातो हे लक्षातच येत नाही. संग्रहालयाच्या एका विभागात, वाघ, वाघांची डोकी, जंगली कुत्री, अस्वले, गवे अशा शिकार केलेल्या अनेक प्राण्यांचे पेंढा भरलेले अवशेष आहेत. यातील काही शिकारी शाहू महाराजांनी केलेल्या आहेत. राजवाडा परिसरात एक लहान तलाव आहे. तेथे एक छोटे प्राणिसंग्रहालय आहे. तलावामध्ये फ्लेमिंगोसारखे पक्षी आहेत. मोर, इमू (शहामृग), हरणेही आहेत. त्यामुळे बालगोपाळांचे ते एक आकर्षण आहे. 

टाउन हॉल वस्तुसंग्रहालय

टाउन हॉल वस्तुसंग्रहालय :
भाऊसिंगजी रस्त्यावरील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोर हे वस्तुसंग्रहालय आहे. इतिहास व पुरातन वस्तुशास्त्राची आवड असणाऱ्या पर्यटकांनी येथे जरूर भेट द्यावी. ब्रह्मपुरी येथील टेकडीवर उत्खनन सुरू केल्यावर प्रस्तुत वस्तुसंग्रहालयाची आवश्यकता भासू लागली. सुरुवातीला हे अवशेष ठेवण्याकरिता एका जैन आश्रमामध्ये तात्पुरते संग्रहालय तयार केले गेले. नंतर हा संग्रह पुरातत्त्व संशोधक डॉ. सांकलिया यांच्या निवासस्थानी हलविण्यात आला;मात्र जागेच्या अपुरेपणामुळे एका कायमस्वरूपी इमारतीची गरज भासू लागली. सन १८७२ ते १८७६च्या दरम्यान याची इमारत उभी राहिली. प्रारंभी फक्त शस्त्रे आणि खापरे यांचा संग्रह असणाऱ्या या वस्तुसंग्रहालयामध्ये परिसरातील कलाकारांच्या कलाकृतीही उपलब्ध झाल्या. आता या सर्व वस्तू निरनिराळ्या प्रकारांप्रमाणे वेगळ्या करून व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, पुरातत्त्वीय वस्तू, शिल्पे, धातू, शस्त्रास्त्रे आणि इतर अशा सात विभागांमध्ये मांडून ठेवण्यात आल्या आहेत. 

वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरच अठराव्या शतकातील दोन तोफा आणि त्यामागे मांडण्यात आलेली महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मिळालेली हत्तींची दोन मध्ययुगीन शिल्पे ठेवली आहेत. अगदी अश्मयुगीन हत्यारांपासून ते थेट पहिल्या जागतिक महायुद्धात वापरण्यात आलेल्या विविध शस्त्रास्त्रांचा साठा, हस्तिदंती आणि चंदनी मूर्ती, चिनी मातीच्या थाळ्या, खेळण्यातील फासे, लाखेने रंगविलेली भांडी, तसेच कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची चित्रे अशा अनेक वस्तू प्रेक्षकांचे चित्त आकर्षित करतात. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील शिलाहार राजाने दिलेला ताम्रपट, तसेच ब्रह्मपुरीतील उत्खननात सापडलेली पॉसिडॉन या ग्रीक देवतेची कांस्यमूर्ती हे येथील एक आकर्षण आहे. हे वस्तुसंग्रहालय रविवार सोडून इतर वारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत खुले असते. 

शालिनी पॅलेस : याची निर्मिती १९३१ ते १९३४ या कालावधीत झाली. राजकन्या शालिनी यांचे नाव पॅलेसला देण्यात आले. रंकाळा तलावाच्या काठावर हा पॅलेस आहे. रंकाळ्याचे सौंदर्य या इमारतीमुळे अधिक खुलून दिसते. याच्या बांधकामात काळा घडीव दगड आणि इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला आहे. आतील दरवाज्याच्या चौकटी बेल्जियम काचेने सजविण्यात आल्या आहेत. हा पॅलेस सध्या बघण्यासाठी खुला नाही. 

खासबाग मैदान

खासबाग मैदान :
हे कोल्हापुरातील कुस्तीप्रेमींचे आवडते ठिकाण. या मैदानावर अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कुस्त्या होतात. या मैदानात ३० हजार प्रेक्षक बसू शकतात. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राजवटीदरम्यान कुस्तीच्या पारंपरिक क्रीडाप्रकाराच्या उत्तेजनार्थ हे मैदान विकसित केले. कोल्हापूरला कुस्तीगिरांची पंढरी मानले जाते. प्रत्येक पेठेत पहिलवान जोर-बैठका काढताना दिसतात. आपल्या तालमीचा आणि कुस्तीचा त्यांना अभिमान असतो. 

मोतीबाग तालीम : हिंदकेसरी गणपतराव आंदळकरांनी १९६७पासून या तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारतकेसरी रुस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या मल्लांचा समावेश आहे. कोल्हापूरच्या महाराजांनी १९४८मध्ये लंडन ऑलिपिकसाठी कराडच्या खाशाबा जाधव यांना आर्थिक मदत केली होती. पहिलवान गणपतराव आंदळकरांनाही कोल्हापूरच्या छत्रपतींनी मदत केली आहे. 
आंदळकरांनी दादू चौगुले या प्रसिद्ध मल्लास तयार केले. हेच दादू चौगुले लाल मातीबरोबर मॅटवरील कुस्तीही गाजवू लागले. त्यांनी भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद हे किताब पटकावले. 

फुटबॉल मैदान

फुटबॉल खेळासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम व शाहू स्टेडियम प्रसिद्ध आहे. राजर्षी शाहूंचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी महाराज इंग्लंडला गेले होते. तेथे त्यांनी फुटबॉल हा खेळ पाहिला आणि त्यांना तो आवडलाही. असा रांगडा खेळ आपल्या संस्थानातही खेळला जावा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. सन १९१४च्या सुारास ते इंग्लंडहून कोल्हापुरात आले. छत्रपती राजाराम महाराज राज्यकारभारात व्यग्र असल्याने प्रिन्स शिवाजी महाराजांनी हा जगप्रसिद्ध खेळ कोल्हापुरात सुरू करण्याकरिता प्रयत्न चालविले. त्या काळात लेफ्टनंट नारायणसिंग फुटबॉल खेळत होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन शिवाजी महाराजांनी फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली (वर्ष १९१६-१९१७); मात्र शिवाजी महाराजांचे इसवी सन १९१८मध्ये अपघाती निधन झाले. यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉल खेळ कोल्हापुरात रुजविण्याचे काम हाती घेतले. फुटबॉल खेळाची इत्थंभूत माहिती मिळवून त्यांनी कोल्हापुरात फुटबॉलचा खेळ खऱ्या अर्थाने रुजविला. कुस्तीबरोबरीने फुटबॉल हा कोल्हापूरकरांच्या आवडता खेळ आहे. ताशा-हलगीच्या ठेक्यावर हा खेळ खेळला जातो. या खेळाचा अनुभव घ्यावा असे जोशपूर्ण वातावरण येथे असते. गल्लोगल्ली फुटबॉलचे संघ आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉलने शंभरी पार केली आहे. 

जयप्रभा स्टुडिओ : चित्रपटसृष्टीतील भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पहिले पोस्टर पेंटिंग, ‘प्रभात’ची सुरुवात असे सर्व काही कोल्हापुरात सुरू झाले. संस्थानचा राजाश्रय मिळाल्याने आकाराला आलेले शालिनी सिनेटोन आणि कोल्हापूर सिनेटोन म्हणजे आता बंद असलेला ‘जयप्रभा स्टुडिओ’ अशा अनेक प्रवाहांनी समृद्ध बनवला. कोल्हापूरचा हा चित्रपट इतिहास एकाच छताखाली उपलब्ध व्हावा यासाठी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राने पुढाकार घेतला आहे. केंद्राच्या वतीने कोल्हापूर चित्रपट संशोधन केंद्र साकारले जात आहे. 

पंचगंगा घाट

पंचगंगा घाट :
कोल्हापूरहून पन्हाळ्याला जाताना पंचगंगेच्या पुलावरून डावीकडे पंचगंगेच्या सुंदर, बांधीव घाटाचे दर्शन होते. उत्सुकतेपोटी मी पन्हाळ्यावरून येताना तेथे गेलो. घाट अतिशय सुंदर असून, स्वच्छता ठेवल्यास अधिक सुंदर दिसेल. कोल्हापूरची संस्कृती पंचगंगा नदीच्या काठावर सुरू झाली. तेथे एक प्राचीन मंदिर आहे. नदीच्या तीरावर पाण्यापर्यंत पायऱ्यांचा सुंदर घाट बांधला आहे. नदीच्या सुंदर दृश्यामुळे शिवाजी पूल अधिक सुंदर दिसतो. घाट आणि मंदिर लक्षात घेऊन पुलाच्या जवळ एक लहान सहलीचे ठिकाण विकसित करण्यात येत आहे. तसेच गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी या स्थानाचा विकास करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाची योजना आहे. ब्रह्मपुरी :
येथे सायंकाळी, सूर्यास्ताच्या वेळी विस्तीर्ण पंचगंगेचे विलोभनीय दृश्य पाहता येते. पंचगंगेला लागून असलेल्या ब्रह्मपुरी टेकडीच्या एका उंचवट्यावर कोल्हापूर महानगरपालिकेने एक उद्यान विकसित केले आहे. हाच ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंट. पूर्वीच्या काळी तेथे एक नेटके नगर अस्तित्वात होते. १९४७च्या सुमारास राजाराम कॉलेजचे प्रा. के. जी. कुंदनागर, आर. एस. पंचमुखी यांच्या पुढाकाराने व प्रा. हसमुख सांकलिया व डॉ. मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या टेकडीवर उत्खनन झाले. भांडी, नाणी, प्राचीन मूर्ती, काचेचे मणी आदी त्यात सापडले. एका रोमन देवतेचा पुतळाही उत्खननात सापडला. पुरातत्त्व खात्याने हा परिसर विशेष संरक्षित म्हणून घोषित केला. या टेकडीखाली कधी काळी मूळ कोल्हापूर होते. येथे झालेल्या उत्खननात २५०० ते ३००० वर्षांपूर्वीच्या वस्तू सापडल्या आहेत. या वस्तू आज टाउन हॉल म्युझियममध्ये संग्रही ठेवण्यात आल्या आहेत. 

श्री त्र्यम्बोली देवी (टेंबलाई देवी) मंदिर : हे मंदिर पूर्वेस एका टेकडीवर आहे. पौराणिक कथेप्रमाणे त्र्यम्बोली देवी (रेणुका देवी) ही श्री महालक्ष्मी देवीची बहीण आहे. काहींच्या मते महालक्ष्मी व टेंबलाई या जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. दैत्याबरोबर झालेल्या लढाईत रेणुका देवीने महालक्ष्मीला मदत केली होती; पण विजयी झाल्यानंतर महालक्ष्मीने योग्य सन्मान दिला नाही. त्यामुळे रेणुका देवी क्रोधित झाली आणि म्हणून ती या टेकडीवर स्थायिक झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते. येथून कोल्हापुराचे विहंगम दृश्य दिसते. येथे २० फूट उंचीची एक गणपती मूर्ती आहे. येथे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असावे, अशी माहिती पुढे येत आहे. कोहळा पंचमी किंवा कूष्मांड पंचमी या दिवशी टेंबलाबाई (त्र्यंबुली) येथे हा कोहळारूपी राक्षस मारला जातो. या दिवशी अंबाबाई टेंबलाईच्या भेटीसाठी जाते. सकाळी अंबाबाईच्या देवळातून देवीची पालखी प्रस्थान करते. या मिरवणुकीत राजघराण्यातील व्यक्ती, अमीर-उमराव, सरदार, मानकरी इत्यादी लोक भाग घेतात. या वेळी एक कुमारिका त्रिशुळाने कोहळा फोडते. हा कोहळा म्हणजे प्रतीकात्मक राक्षस असतो. कोहळा फोडल्यानंतर देवीची पालखी पुन्हा अंबाबाईच्या देवळात येते. 

कात्यायनी मंदिर : हे कोल्हापुरातील धार्मिक व सहलीचे ठिकाण आहे. महालक्ष्मी माता आणि देवी माता कात्यायनी या दोघींचे एकमेकींशी घनिष्ठ संबंध आहेत. आजही दररोज दुपारी महालक्ष्मी मंदिरात आरतीच्या वेळी देवी माता कात्यायनी उपस्थित असते असे मानले जाते. हे मंदिर कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरापासून १० किलोमीटर दूर आहे. अत्यंत शांतता असलेले हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पूर्वी येथे चार ते पाच फूट उंचीची मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसायची. 

कणेरी येथील संग्रहालय


कणेरी शिवमंदिरकणेरी सिद्धगिरी शिवमंदिर : हे एक धार्मिक ठिकाण आहे. तसेच सिद्धगिरी गुरुकुल फाउडेशन ट्रस्टच्या माध्यमातून उभे असलेले, ग्रामीण लोकजीवन प्रभावीपणे दर्शविणारे संग्रहालय हे आता लोकांचे आवडीचे ठिकाण झाले आहे. शेतकरी, त्याचे दैनंदिन जीवन येथे अतिशय सुंदर रीतीने मांडण्यात आले आहे. तसेच अनेक प्राणी व माणसांच्या पुतळ्यांच्या साह्याने जिवंत वाटावेत असे देखावे निर्माण करण्यात आले आहेत. साधारण १४व्या शतकात हे मूळ मंदिर बांधले असावे. येथे आता ४२ फूट उंचीची शिवाची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. 

या लेखासाठी बडोद्याचे हिंमतबहाद्दूर श्रीमंत जितेंद्रसिंगजी गायकवाड, इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक सुहास वारले, मूळचे कोल्हापूरचे, पण सातारा औद्योगिक वसाहतीचे उपअभियंता श्री. पवार, कोल्हापूरचे माझे मित्र, लेखक व अभिनेते विलास अध्यापक यांचे सहकार्य झाले. 

पुढील भागात पाहू या कोल्हापूरच्या आसपासची ऐतिहासिक व निसर्गरम्य ठिकाणे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search