Next
‘येणाऱ्या काळात गडचिरोलीच्या विकासाची गती वाढवू’
प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री राजे अंबरीशराव अत्राम यांचे प्रतिपादन
BOI
Monday, January 28, 2019 | 03:32 PM
15 0 0
Share this article:गडचिरोली : ‘लोककल्याणकारी संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर ‘सब का साथ सब का विकास’ या न्यायाने पुढे जाऊ या.  शासन कायम शेतकरी, युवक आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात विकासाची गती वाढवू आणि आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू,’ असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंबरीशराव अत्राम यांनी केले.

येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा झाला. पालकमंत्री राजे अंबरीशराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलीस दल, तसेच गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्वीकारली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा रंगत गेला.या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी पालकमंत्री म्हणाले, ‘सर्वाधिक पुरोगामी असणाऱ्या आपल्या राज्याने देशात सातत्याने पहिले स्थान राखलेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ हे ध्येय समोर ठेवले. त्यांना अपेक्षित असणारा विकास प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. सामान्य माणसाच्या विकासाच्या उद्दिष्टाने गेल्या चार वर्षांत गडचिरोली जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी मिळविण्यासोबतच विविध योजना राबविण्यात शासनाला यश आले आहे. पुढील काळातही विकासाची गती कायम राहण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.’शेतकरी बांधवांच्या शेतीला संरक्षित सिंचन उपलबध झाल्याने जिल्ह्यात धान्यासोबतच कापसाचे उत्पादनही घेतले जात असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘शेतकऱ्यांना नुकसान झाल्याच्या स्थितीत त्यांना आधार मिळावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. या पीक कर्जमाफीचा लाभ गडचिरोली जिल्ह्यात ३८ हजार २९९ शेतकऱ्यांना झाला. या योजनेअंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनापोटी या सर्वांना ११४ चौदा कोटी ११ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. सोबतच खरीपासाठी नव्याने सुमारे १०५ कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार म्हणून शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरू केली आहे. या अंतर्गत ७५ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्यात आली आहे.’आदिवासी विकास महामंडळाच्या व पुरवठा विभागाच्या माध्यमातून शासन येथे धान्य खरेदी करीत आहे. जिल्ह्यात सहा लाख ८८ हजार क्विंटल धान्य आतापर्यंत खरेदी करण्यात आले आहे. साधारण ११० कोटींची खरेदी या माध्यमातून झाली आहे. धान्याचा हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांना उत्पन्न सुरू राहावे यासाठी ‘मनरेगा’च्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याचे काम शासन करीत आहे. यातून आतापर्यंत साधारण ८३ कोटी रुपयांच्या खर्चाची कामे झाली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आपला हा जिल्हा आदिवासीबहुल आणि दुर्गम असा जिल्हा आहे. येथे आव्हानात्मक असणारे गाव तिथे वीज नेण्याचे काम शासनाने पूर्ण केले असून, घरोघरी वीज पुरवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सौभाग्य योजनेअंतर्गत काम सध्या सुरू आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला चालू वर्षात २३४ कोटींहून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत या आदिवासी विकासासाठी दिलेला एकूण निधी अकराशे कोटींहून अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.‘गडचिरोली जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. विविध निर्देशांकावर आधारित कालबद्ध कार्यक्रमात जिल्ह्यात विविध विभाग विकासाचे काम करीत आहे. यासाठीदेखील ४३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीतून येथील युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे, तसेच स्वयंरोजगारासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्याचे कामही शासन करीत आहे. यासोबतच पर्यटन विकासाच्या योजनांमधून कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास शासन कटिबद्ध आहे,’ असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात दळणवळण व्यवस्था उत्तम असावी यासाठी जिल्हा मार्गांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून विस्तारीत करण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे इंद्रावती नदीवर पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यानंतर आंतरराज्य संपर्क सोपा होणार आहे; तसेच जिल्ह्यात शिक्षण सुविधा वाढाव्यात यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठासाठी स्वतंत्र जागा असावी यासाठी शासनाने ८९ कोटींचा विशेष निधी दिला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.‘आपल्या जिल्ह्यात पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची आहे.  या वर्षभराच्या काळात पोलीस दलाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. जिल्ह्यात वर्षभरात ५० माओवाद्यांचा नाश पोलीस दलाने केला; तसेच आत्मसमर्पण योजनेतून १८जणांनी शरणागती पत्करली. जिल्ह्यातील युवकांना पोलीस भरतीत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी खास बाब म्हणून जिल्ह्यातील युवकांनाच पात्र समजावे असे विशेष आदेश शासनाने जारी केला असल्याचे त्यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितले. जिल्ह्यात वनांवर आधारित उद्योग व्हावेत व स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठीही शासन काम करीत आहे, असेही ते म्हणाले.

‘ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई व शबरी आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात पक्की घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. या घरांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय शासनाने नुकताच घेतला. यामुळे या कामाला अधिक गती येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‘आपण साजरा करीत असलेला आजचा हा प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून, विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाअधिक मजबूत होत आहे. विकेंद्रीकरणाची कास धरणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचे १५०वे जयंती वर्ष आहे, तर त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या ७३ व ७४व्या घटना दुरुस्तीचे हे रोप्य महोत्सवी वर्ष आहे. हे लक्षात घेता या वर्षामध्ये व त्यामागे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे आवश्यक आहे; तसेच स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे,’ असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस दलातील केंद्र शासनाकडून पराक्रम पदक पुरस्कारांनी राजू हनुमंत सिडाम, महेश गणुजी कुलेटी, गणेश मोहुर्ले, विजय चिंतामन टाल्टे, किरण बुचय्या दुर्गम, रमेश बोडका गावडे यांचा समावेश आहे. महसुल विभागातील मावा गडचिरोली स्पर्धेतील आंकाक्षित जिल्हा कक्षांतर्गत सीमा आटमांडे (कुरमाघर), प्राची मोहरकर (सुतक प्रथा), वर्षा वशिष्ट (सकस आहार), पुंडलिक काटकर (कृषीपूरक व्यवसाय), चंद्रशेखर गुरनूले (परसबाग), विजय दिगडे (गडचिरोली ब्रांड), मनीषा पोड (वनोपज), अनिकेत सोनोने (स्वंयरोजगार), सदानंद धुडसे (प्राथमिक शिक्षण), सारंग तरारे (शाळा व्यवस्थापन), राजू सोरते (आर्थिक समावेशन) यांचा १० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला; तसेच भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला.जिल्हा परिषद विभागाकडून वनराई बंधारे बांधकाम उपक्रमांतर्गत ग्रामंचायत तोडसा, जांभुळखेडा या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सिकई खेळात अनेक विक्रम करणारी एंजल देवकुळे हिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून, तिचा सत्कार दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते झाला आहे. सेजल गद्देवार, रजत सेलोकर, ईशा कोवासे, अंकित कन्नया, विकी पोदादी, सार्थक पुद्धटवार यांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर गडचिरोली आपत्ती व्यवस्थापनतर्फे जिल्ह्यातील स्थानिक भाषामध्ये आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जनजागृती विषयीची चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे सूत्रसंचालन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी मदन टापरे आणि ओमप्रकाश संग्रामे यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search