Next
अशी आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना
BOI
Saturday, October 27, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

गेली दोन –तीन वर्षे सातत्याने व्याजदरात होणाऱ्या घसरणीमुळे ज्येष्ठ नागरिक काहीसे हवालदिल झाले आहेत. ज्येष्ठांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने गुंतवणुकीसाठी दोन पर्याय देऊ केले आहेत. यातील एक पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक ठेव योजना व दुसरा पर्याय म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज आपण प्रधानमंत्री वय वंदना योजनेची माहिती घेऊ या....
...........
ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेसाठी पोस्ट अथवा राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतवणूक करावी लागते. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत मात्र केवळ ‘एलआयसी’मार्फतच करावी गुंतवणूक लागते. या दोन्हीही योजनांतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने ज्यांना गुंतवणुकीची जोखीम नको आहे व एक निश्चित उत्पन्न दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक हवे आहे, अशांसाठी हे दोन्हीही पर्याय निश्चितच योग्य आहेत. प्रधानमंत्री वय वंदना ही योजना १७ मे २०१७पासून कार्यन्वित करण्यात आली. सुरुवातीला ३१ मार्च २०१८ पर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार होता; मात्र एक फेब्रुवारी २०१८ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्यात आली. आता ३१ मार्च २०१९पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. शिवाय आधीची कमाल गुंतवणूक मर्यादा साडेसात लाखांवरून १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

या योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत. 
किमान वय : ६० वर्षे पूर्ण 
कमाल वय : कितीही 
योजनेचा कालावधी : १० वर्षे 
किमान पेन्शन : मासिक - एक हजार रुपये, तिमाही - तीन हजार, सहामाही - सहा हजार व वार्षिक - बारा हजार
कमाल पेन्शन : मासिक - दहा हजार, तिमाही - तीस हजार, सहामाही - साठ हजार, वार्षिक – एक लाख वीस हजार.
पेन्शनची कमाल मर्यादा कुटुंबासाठी असून, सर्व पॉलिसी मिळून होणारे पेन्शन कमाल मर्यादेपेक्षा जास्त असता नये. कुटुंबामध्ये पती/पत्नी व अवलंबून असल्यास पालक किंवा मुले यांचा समावेश होतो. 

आपणास हवी असणारी पेन्शन व त्यासाठी एकरकमी भरावी लागणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल
किमान रक्कम : एक लाख पन्नास हजार रुपये
दरमहा पेन्शन - एक हजार रुपये (दहा वर्षांसाठी)                        
कमाल रक्कम : पंधरा लाख रुपये. 
दरमहा पेन्शन  – दहा हजार रुपये 
वार्षिक पेन्शन – एक लाख वीस हजार रुपये.
     
मिळणारे पेन्शन आपण निवडलेल्या पर्यायानुसार एनईएफटी किंवा आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीमद्वारे आपल्या बँक खात्यात जमा होते.
सरेंडर व्हॅल्यू : अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे पेन्शनर किंवा त्याची पती/पत्नी यांच्या गंभीर आजारासाठी ही पॉलिसी सरेंडर करता येते व आपण गुंतविलेल्या रकमेच्या ९८ टक्के इतकी रक्कम मिळू शकते.

कर्ज सुविधा : पॉलिसी घेतल्यापासून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर गरज पडल्यास कर्ज मिळू शकते. असे कर्ज जास्तीत जास्त आपण एकरकमी भरलेल्या रकमेच्या ७५ टक्के इतके मिळू शकते. यावर सहामाही पद्धतीने व्याज आकारणी होते व हे व्याज मिळणाऱ्या पेन्शनमधून वसूल केले जाते. कर्ज रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम किवा त्याआधी (सरेंडर केल्यास/पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास) मिळणाऱ्या रकमेतून वसूल केली जाते. (पेन्शन पॉलिसीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास गुंतविलेली रक्कम वारसास दिली जाते.)

ही पेन्शन पॉलिसी एलआयसी एजंटमार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी http://www.licindia.in/ या साइटवर लॉग इन करावे.

आपण घेतलेल्या पेन्शन पॉलिसीबाबत आपण साशंक अथवा असमाधानी असाल, तर आपण ही पॉलिसी फ्री लूक पीरियडमध्ये रद्द करू शकता. आपण पॉलिसी एजंटमार्फत घेतली असेल, तर हा फ्री लूक पीरियड पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून १५ दिवसांपर्यंत असतो. ऑनलाइन पॉलिसी घेतली असेल, तर हा ३० दिवसांपर्यंत असतो. अशा पद्धतीने पॉलिसी रद्द केल्यास आपण भरलेल्या रकमेतून स्टँप ड्युटी व तत्सम खर्च वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते.

वरील सर्व बाबींचा विचार करता सद्य परिस्थितीत प्रधानमंत्री वय वंदना योजना ज्येष्ठांसाठी निश्चितच उपयुक्त आहे. 

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी  प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search