Next
मधु मंगेश कर्णिक, वसंत फेणे, भवानीशंकर पंडित
BOI
Saturday, April 28 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘देणारच जर तू सारे तर थोडे राखून ठेव, मी वाट पहावी म्हणुनी दारात निरंजन लाव’ असं लिहिणारे कवी, कथाकार आणि कादंबरीकार मधु मंगेश कर्णिक, वयाच्या नव्वदीपर्यंत सकस कथा लिहिते राहिलेले वसंत नरहर फेणे आणि ‘निर्मलभावे नव देखावे भरुनी दोन्ही डोळे, तुमी मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले’ लिहिणारे कवी भवानीशंकर पंडित यांचा २८ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
....
मधु मंगेश कर्णिक 
२८ एप्रिल १९३१ रोजी करुळमध्ये (कणकवली, जि. सिंधुदुर्ग) जन्मलेले मधु मंगेश कर्णिक हे कथाकार, कादंबरीकार, कवी असं विविधांगी लेखन करणारे ज्येष्ठ बहुप्रसवा लेखक! गरिबीशी झगडत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जबरदस्त आशावाद बाळगून, केवळ अंगभूत लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने त्यांनी जीवनात यशस्वी होऊन दाखवलं. ‘माझ्या भावी आयुष्याचं प्रशिक्षण माझ्या बालपणीच्या काटेरी दिवसांनी केलं’ असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलंय.
 
मॅट्रिकला असतानाच त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. रत्नाकर, लोकसत्ता, धनुर्धारी, विविधवृत्त अशा मासिकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत गेल्या. तसंच आलमगीर, गोमंतक, पुढारी, साधना, तरुण भारत, मनोहर अशा नियतकालिकांमधून त्यांनी स्तंभलेखन केलं होतं. साठोत्तरी मराठी साहित्यात त्यांनी आपल्या वेगळ्या आणि विपुल लेखनानं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्‌मय अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून त्यांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला आहे. 

मालगुंड या केशवसुतांच्या जन्मस्थळी त्यांचं यथोचित स्मारक होण्यात मधु मंगेश कर्णिक यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून त्या साहित्य चळवळीमार्फत सातत्याने जागोजागी संमेलनं, कथा, काव्यवाचन, चर्चा-वादविवाद इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे.  

१९९० साली रत्नागिरीमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
माहीमची खाडी, माझा गाव माझा मुलुख, भाकरी आणि फूल, जुईली, कमळण, करुळचा मुलगा, कातळ, लागेबांधे, सोबत, सृष्टी आणि दृष्टी, सूर्यफूल/सनद, तारकर्ली, अबीर गुलाल, देवकी, हृदयंगम, जगन नाथ आणि कंपनी, जैतापूरची बत्ती जिवाभावाचा गोवा, कोवळा सूर्य, राजा थिबा, संधिकाल, शाळेबाहेरील सौंगडी, विहंगम, पांघरूण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना गदिमा पुरस्कार, कर्मयोगी पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 

(मधु मंगेश कर्णिक यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
..........

वसंत नरहर फेणे 

२८ एप्रिल १९२६ रोजी जोगेश्वरीमध्ये जन्मलेले वसंत नरहर फेणे हे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. वयाच्या पस्तिशीत लेखनाला सुरुवात केल्यापासून नव्वदीपर्यंत ते सतत लिहिते राहिले. सकस कथा आणि कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी नाटक, विनोदी लेखन आणि अनुवाद असे प्रकारही हाताळले. प्रभावी भाषाशैली, सूक्ष्म निरीक्षण, राजकीय-सामाजिक भान, मानवी नात्यांची गुंतागुंत हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य होतं. 

सेन्ट्रल बस स्टेशन, ज्याचा त्याचा क्रूस, देशांतर कथा, द्वाजा, हे झाड जगावेगळे, मावळतीचे मृद्गंध, निर्वासित नाती, पहिला अध्याय, पाणसावल्यांची वसाहत, सहस्रचंद्रदर्शन, शतकान्तिका, विश्वंभरे बोलविले, पंचकथाई, काही प्यादी काही फर्जी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला होता.

सहा मार्च २०१८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(वसंत नरहर फेणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

भवानीशंकर श्रीधर पंडित

२८ एप्रिल १९०६ रोजी जन्मलेले भवानीशंकर श्रीधर पंडित हे कवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात. 

त्यांचं सर्वांत गाजलेलं अजरामर भावगीत म्हणजे खळ्यांनी संगीतबद्ध केलेलं आणि हृदयनाथांनी गायलेलं ‘गेले ते दिन गेले... ’

त्यांच्या काही बालगीतांचा समावेश बालभारती पाठ्यपुस्तकात झाला होता. त्यातलंच हे एक -

आई! आई! बोलतो कसा हा आई!!
म्हणतो ‘मं मं’ भूक लागतां
‘पा पा’ करतो पाणि मागतां
म्हणतो ‘दू दू’ दुधास बघतां
हसतो ही ही। बोलतो कसा हा आई!
तेल माखतां करतो ‘तो तो’
न्हाऊ घालतां ‘बुडू बुडू’ म्हणतो
तसाच झोपी जातां म्हणतो
‘गाई गाई’! बोलतो कसा हा आई!
मला पाहतां म्हणतो ‘ता ता’
‘बा बा’ करतो बाबा दिसतां
आणि घोकतो उठतां बसतां
‘याई याई’! बोलतो कसा हा आई !
यास पाखरें ‘चिउ’ वा ‘काऊ’
‘माउ’ मांजरी, उंदीर ‘बाऊ’
फळे मिठाई खाऊ ‘आऊ’
‘हम्मा’गाई! बोलतो कसा हा आई !
‘टन टन’ म्हणतो पायगाडीला
म्हणतो ‘पों पों’ मोटारीला
आणि बोलतो आगगाडीला
‘भप भप ई ई!’ बोलतो कसा हा आई !

१९५२ साली खामगावमध्ये भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

आधुनिक मराठी कविता, समग्र केशवसुत, महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे, आधुनिक मराठी कवितेचे प्रणेते, पिचलेला पावा, उन्मेष आणि उद्रेक - असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२१ जानेवारी १९७८ रोजी त्यांचं निधन झालं.

(भवानीशंकर पंडित यांची ‘धबधबा’ ही कविता वाचण्यासाठी https://goo.gl/frKCFg येथे क्लिक करा.  ररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link