Next
देवदास
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Tuesday, December 19 | 02:25 PM
15 0 0
Share this story

आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला वेळच्या वेळी आपल्या प्रेमाची कबुली नाही दिली, तर आपण कायमचे दुरावतो त्या व्यक्तीला आणि मग तो सल कायमचा राहतो.... मग काही जण आयुष्यभर ते दु:ख मनात साठवत, ती खंत उराशी बाळगून कसंबसं जीवन कंठतात, तर काही जण त्या प्रेमभंगामुळे मुळापासून उखडले जातात..आयुष्य उद्ध्वस्त होतं अशांचं.... अशाच प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या तरुणाची दर्दभरी कहाणी मांडणारा १९५५ सालचा ऑल टाइम ग्रेट सिनेमा ‘देवदास’... पाहू या आजच्या ‘सिनेसफर’मध्ये...
......... 
देवदास... शरदबाबूंची अजरामर प्रेमकथा! असफल प्रेमाचा त्रिकोण! देवदास आणि पार्वती बालपणीचे सवंगडी. त्यांची बालपणीची मैत्री तरुणपणी प्रेमात बदलते. देवदासचं प्रेम अव्यक्त आणि संदिग्ध. तिने मात्र मनोमन त्यालाच वरलंय आणि म्हणून धीटपणे आपलं प्रेम व्यक्तही करते; पण ऐन वेळी त्याचा भिडस्तपणा आड येऊन तो ते स्वीकारत नाही आणि त्यांची ताटातूट. काही काळाने त्याला आपण काय गमावतोय याची जाणीव होऊन तो तिच्याकडे येतो खरा; पण एव्हाना उशीर झालाय. आपण प्रेम कायमचं गमावलंय हे कळून तो उद्ध्वस्त होतो. त्याला सहारा देते चंद्रमुखी. ती त्याच्या प्रेमात पडते, त्याचं पारोवर प्रेम आहे हे माहीत असूनसुद्धा! तो एव्हाना पारोला गमावल्याच्या दु:खात खचलेला आणि एकाकी झालेला. स्वतःचं दु:ख आणि स्वतःवरचा राग तो दारूत बुडवतो. आणि तिघांच्याही नशिबी शेवटी शोकांतिकाच येते. ना चंद्रमुखीला देवदास मिळत ना देवदासला पारो! बिमल रॉय यांचं कसलेलं दिग्दर्शन, राजिंदरसिंग बेदींचे भिडणारे संवाद, साहिरची अर्थगर्भ गाणी, सचिनदांचं समर्पक संगीत आणि दिलीपकुमार, सुचित्रा सेन, वैजयंतीमाला, मोतीलालबरोबरच इतरही सर्वांचीच अप्रतिम अदाकारी - यामुळे मनात कायमची घर करून राहणारी ही आगळी आणि अजरामर प्रेमकहाणी - ‘देवदास’!

पूर्वी कुणीसं म्हटलं होतं- देवदास तीन वेळा मेला. सर्वप्रथम शरदबाबू गेले तेव्हा त्याचा मानसपुत्र त्यांच्याबरोबर गेला, नंतर त्याला रूपेरी पडद्यावर अमर करणारे कुंदनलाल सैगल वारले तेव्हा देवदास पुन्हा गेला आणि नंतर दिलीपकुमारने त्याला पडद्यावर ‘साकारला’ तेव्हा देवदास पुन्हा मेला - या उद्गारातली दिलीपकुमारसारख्या मातब्बर अभिनेत्याला कुणीतरी मुद्दाम दिलेली कुत्सित दूषणं बाजूला ठेवू. कारण खरं पाहता दिलीपकुमारने शरदबबूंच्या देवदासला पुरेपूर आणि चोख न्याय दिलाय! (भन्साळी आणि शाहरुखने नंतर काय केलं ते आपण पाहिलं असेल म्हणा, पण तो विषय नको!). दिलीपकुमारने देवदासची विषण्ण अवस्था, आपल्याच चुकीमुळे आपण प्रेम गमावलंय हे कळून होणाऱ्या चिडचिडीतून आलेली वेदना आणि एकाकी अवस्थेतून चेहऱ्यावर उमटणारं आर्त दु:ख विलक्षण प्रभावीपणे व्यक्त केलंय! त्याला अर्थातच फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड मिळाला होता आणि तो ‘ट्रॅजेडी किंग’ असण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मुळात मीनाकुमारी, नर्गिस, बीना रॉय, सुरैया अशा चार जणींना हुलकावणी दिलेल्या पार्वतीच्या (पारो) रोलमध्ये हिंदी सिनेमामधल्या आपल्या पदार्पणातच सुचित्र सेनने कमाल केलीय, तर चंद्रमुखीचा रोल वैजयंतीमाला अक्षरशः जगलीय. तिला या रोलबद्दल सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. असाही एक किस्सा, की त्यातल्या एका प्रसंगात मोतीलालच्या सहजसुंदर अभिनयासमोर दिलीपकुमार थोडा फिका वाटत होता. त्यामुळे दिलीपकुमारने त्या शॉटचे बरेच रिटेक करायला लावले; पण मोतीलाल सरसच वाटत होता. शेवटी म्हणे मोतीलालने त्याला सांगितलं. ‘युसुफ तुम इस तरह से मुझे मात नहीं दे पाओगे!’

शरदचंद्र चॅटर्जींची ‘देवदास’ ही १९१७ सालची गाजलेली आणि लोकप्रिय कादंबरी. अर्थात त्यात त्या काळच्या चालीरीतींचं आणि समाजमनाचं प्रतिबिंब उघडच असलेलं. १९वं शतक संपून विसाव्या शतकाला सुरुवात झाल्यावरचा काळ. देवदास हा एका श्रीमंत ब्राह्मण जमीनदाराचा (मुराद) मुलगा. त्याची मैत्रीण पार्वती ऊर्फ पारो ही त्या मानाने कनिष्ठ जातीच्या नीलकंठ चक्रवर्ती यांची (शिवराज) मुलगी. सिनेमाला सुरुवात होते ती देवदासच्या शाळेच्या दृश्याने. भोलू (मोहन चोटी) हा मास्तरांचा (कन्हैयालाल) असिस्टंट, मुलांकडून पाढे पाठ करून घेतोय. छोट्या देवदासची मैत्रीण पारो (बेबी नाझ) त्याच्याच शेजारी बसणारी. दोघांची गाढ मैत्री. देवदास मुळात व्रात्य, त्याचं अभ्यासात बिलकुल लक्ष नाही आणि त्याचा हूडपणा इतर मुलांना त्रासदायक. त्याची मारामारी आणि खोड्यांची तक्रार घेऊन मास्टर त्याच्या वडिलांकडे (मुराद) जातात. ते छडीने देवदासला फोडून काढतात. देवदास चिडून रानांत जाऊन झाडावर लपून बसतो. पारो बिचारी त्याच्यासाठी परकरात लपवून खायला आणून वगैरे देते. ती दोघं मजेत रानात हुंदडतात (गाणं- ओ अलबेले पंछी तेरा दूर ठिकाना है..’.....

देवदासच्या खोड्या थांबायचं नाव नसतं. लोकांच्या नित्य तक्रारी ऐकून चिडलेले त्याचे वडील त्याला शिक्षा म्हणून कलकत्त्याला दूर बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवून देतात. देवदासची आणि पारोची ताटातूट. (गाणं – आन मिलो आन मिलो शाम सावरे...’) पण दोघांचं मैत्र कायम. 

काही वर्षं उलटतात. आता मोठा झालेला देवदास (दिलीपकुमार) गावात परत आलाय. आल्या आल्या तो आपल्या बालमैत्रिणीला भेटायला तिच्या घरी आलाय. पारो (सुचित्रा सेन) स्त्रीसुलभ लज्जेने वरच्या मजल्यावर जाऊन लपलीय. देवदास तिला शोधत वर येतो. पारो पणती लावते. देवदास तिच्या खोलीत प्रवेशतो. पणतीचा उजेड पारोच्या सुंदर चेहऱ्यावर. इतक्या वर्षांनी बालमित्रांची भेट; पण जुजबी बोलून तो निघतो. पारोच्या आजीला देवदासला पाहून आणि पारो आणि त्याची मैत्री पाहून दोघांचं लग्न व्हावं असं वाटतं. ती पारोच्या आईला तसं बोलून दाखवते आणि देवदासच्या आईजवळ विषयसुद्धा काढते; पण देवदासच्या आई-वडिलांचा या लग्नाला साफ नकार असतो. जातीचा अभिमान आड येत असतो. दुसऱ्या दिवशी देवदास आणि पारोची भेट. बालपणी देवदास तिच्या घराच्या पत्र्यावर फळ टाकून तिला बोलवायचा अगदी तश्शीच! (फारच गोड सीन हा!)

इकडे पारोच्या वडिलांना देवदासच्या आई-वडिलांनी पारोचा हात झिडकारल्याचं समजून ते प्रचंड संतापतात आणि पारोसाठी देवदासपेक्षाही श्रीमंत वर शोधण्याची प्रतिज्ञा करतात, नव्हे जवळच्याच गावातला चाळीशी उलटलेल्या एका विधुर, पण श्रीमंत माणसाबरोबर पारोचं लग्न ठरवूनही येतात. पारोने मनोमन देवदासलाच आपला स्वामी मानलंय. त्यामुळे आपल्या लग्नाची चाललेली बोलणी ऐकल्यावर ती तडक देवदासकडे येते, तेही रात्रीच्या अंधारात. बालपणी ज्याच्याबरोबर इतके अतीव आनंदाचे क्षण जगलो, त्या आपल्या मित्राबरोबरच लग्न करून आपण सुखी राहू हा तिच्या मनाचा कौल तिला धीट बनवून गेलाय. रात्रीचे दोन वाजलेत; पण ती निग्रहाने देवदासला शोधत त्याच्या घरात घुसलीय. भिडस्त देवदास तिला बघून दचकतो. इतक्या रात्री ती आलेली पाहून. त्याला तिचं असं बेधडकपणे रात्री त्याच्या खोलीत येणं भलतंच धाडसी वाटलंय... कुणीतरी नोकरचाकराने पाहिलं असेल आणि या गोष्टीचा बभ्रा होऊ शकतो हेच त्याच्या मनात. ‘समाज काय म्हणेल?’ ही आशंका; पण पारो एकाच भरवशावर, की तिची प्रेमदेवता तिला वाचवेल, तिचा पत्नी म्हणून स्वीकार करून! देवदासच्या मनातली खळबळ दिसत नाही. तो घरच्यांची संमती मिळवेल असा भरवसा देऊन पहाटेच्या अंधारात पारोला घरी सोडतो. 

दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच त्याने पारोशी लग्नाचा विषय काढल्यावर त्याची आई (प्रतिमादेवी), मोठा भाऊ (इफ्तेकार) त्याची निर्भर्त्सना करतात. वडील तर रुद्रावतार धारण करून ‘दूर हो जा मेरी नज़रोंसे’ ऐकवतात...कच खाल्लेला, खचलेला, पराभूत देवदास त्या तिरीमिरीत बॅग भरून सरळ गाव सोडतो. पारोला न भेटताच!  ती बिचारी देवदासच्या मनात काही योजना असतील अशा विचारात दु:ख गिळून बसते.

तिकडे कोलकात्यात जाऊन देवदास आपलं लग्न पारोशी होऊच शकत नाही या सत्याचा स्वीकर करतो आणि आणखीच निराश होऊन त्या निराशेच्या भरातच पारोला पत्र लिहून मोकळा होतो. ‘आपलं लग्न होणं हे घरच्यांना कदापि मान्य होणार नाही आणि मी घरच्यांच्या मर्जीविरुद्ध जाऊ शकत नाही आणि तसंही मी तुझ्याकडे मैत्रीण म्हणून पाहिलं पत्नी म्हणून नाही. सबब आपण एकमेकांना विसरणं हेच दोघांच्या हिताचं.... वगैरे वगैरे लिहून... चिठ्ठी पोस्टात पडून मार्गस्थ होते; पण इकडे त्याची द्विधा मनःस्थिती... आपण केलं ते योग्य केलं नाही... नव्हे आपलं चुकलंच हे त्याला कळून चुकतं... तो पुढच्याच गाडीने पुन्हा गावाला परततो... पण हाय! तोपर्यंत ते पत्र पारोच्या हातात पडलेलं असतं. ती उन्मळून पडते. दुसऱ्या दिवशी देवदास तिला नदीकिनारी गाठतो. ‘पारो माझी चूक झाली... मी नादान होतो... काय करावं, काय लिहावं ते मला सुचत नव्हतं आणि मी वेड्यासारखं काहीबाही लिहून बसलो.... पण मला आता चूक कळलीय... मी अजूनही काही तरी करून माझ्या आई-वडिलांचं मन वळवेन’...वगैरे सांगतो; पण अभिमानी पारो त्याचं ऐकत नाही... त्याच्या चंचल स्वभावावरचा तिचा विश्वास आता उडलाय... तो कशावरून हिम्मत दाखवेल लग्नाची, असंही वाटतंय... आणि शिवाय तिच्या घरच्यांची तिला काळजी आहेच... त्यांच्या मनाविरुद्ध जाणं आता कितपत जमेल हेही तिच्या मनात आहे.... तिचा नकार ऐकून देवदासचा अहंकार दुखावतो.. उलट तीच अहंकार दाखवतेय, असं त्याला वाटतं.. तो तिला तसं ऐकवतोही आणि वर तिला या प्रसंगाची आठवण राहावी याची शिक्षा म्हणून तिच्या कपाळावर हातातल्या काठीने घाव घालून तिथे जखम करतो... तो व्रण तिला आयुष्यभर आपली आठवण देईल असं सांगतो.... आणि तिथून सुरू होते पराभूत आणि एकाकी देवदासची शोकांतिका... निराश आणि दु:खी पारोच्या मनःस्थितीवर आणखी वेदना वाढवतात तिच्या घरात आलेले गाणारे ‘साजन की  हो गयी...गोरी...’ साहिरचे चपखल शब्द..... !

उद्ध्वस्त देवदास कोलकात्यात परतून चुनीलालबरोबर (मोतीलाल) चंद्रमुखीच्या (वैजयंतीमाला) कोठीवर जातो, आपलं दु:ख विसरण्याचा तो एक मार्ग समजून आणि इकडे पारोचं लग्न होऊन बिदाई.... 

तिकडे प्रेमभंगाच्या दु:खात डुबलेली पारो आपला मनाविरुद्ध लादलेला संसार सुरू करते आणि इकडे केवळ आपल्या भिडस्त आणि भित्र्या स्वभावामुळे मिळू शकणारं प्रेम गमावलेला देवदास त्याच प्रेमाच्या आठवणीत झुरत कोलकात्यात दारूचा सहारा घेतो. अतिरिक्त दारू पिणं त्याचं शरीर आतून पोखरत जात असतं. त्याची ती दु:खी मनोवस्था आणि दिवसेंदिवस खचत जाणारी तब्येत चंद्रमुखीला बघवत नाही. न राहवून ती त्याला सुनावते आणि त्यावर तो त्याचं लॉजिक मांडतो ...तो दोघांचा संवाद हिंदी चित्रपटांच्या इतिहासातल्या अमर आणि अविस्मरणीय संवादांपैकी एक!! 

चंद्रमुखी : और मत पियो देवदास..
देवदास : क्यों?
चंद्रमुखी : कुछ ही दिन हुए पीना शुरू किया है. इतनी ज्यादा बर्दाश्त न कर सकोगे।
देवदास : कौन कम्बख्त है जो बर्दाश्त करने के लिये पिता है?.. मैं तो पीता हूँ के बस सांस ले सकू... और ऐसी जगह से उठकर जाने की ताकत तक नही है नं। तभी तो यहाँ पडा रहता हू। बस देखता रहता हूँ तुम्हारी मूँह की तरफ, तो भी मैं बिलकुल बेहोष नही होता... होश से कह दो कभी होश ना आने पाए... न जाने कितना दु:ख हुआ... जो मैंने पीना शुरू किया... तुम लोग क्या ये बात समझ सकोगी?... लोग नाटक करते है... प्यार के न जाने कितने ढोंग रचाते है... फिर भी पारो की बहोत याद आती है.. पलभर में सब कुछ खतम हो गया... वो शादी के रस्ते चल दी... और मै बरबादी के रास्ते पे!... और एक कभी न खतम होनेवाला नाटक शुरू हो गया... एक छोटीसी भूल और उसकी इतनी बडी सजा?.. क्यूँ पारो की याद हररोज सताती है मुझे?.. क्यूँ मैं उसे नही भुला सकता?.... कोई उम्मीद नही.. कोई भरोसा नही... कोई सुख नही.. कोई ख्वाहिश भी नहीं... वा बहोत अच्छे .... (राजेंद्रसिंग बेदींच्या संवादांना दिलीपकुमारने अप्रतिम न्याय दिलाय!).....

वडील वारल्याचं कळून तो घरी परतल्याचं कळल्यावर पारो त्याला भेटायला येते... तो बडबड करतोय... ती मूक.... आपण तिला रागाच्या भरात कसं मारलं ते त्याला आठवतंय... उलट त्याने दिलेली प्रेमाची निशाणीच तर आपली सुखसंपत्ती आहे,  सहारा आहे अशी पारोची भावना!... आपण दोघे एकत्र असतो तर कसे जगलो असतो ती स्वप्नं तो बोलत सुटलाय... त्याने दारू सोडण्याचं वचन द्यावं अशी ती मागणी करते... त्यावर तो तिला उलट विचारतो, की तिने त्याची आठवण काढणं बंद करणं तिला शक्य होईल?... तसं असेल तरच तो दारू सोडेल म्हणून!... त्याने काय दशा करून घेतलीय, हे पाहून कळवळून पारो त्याला म्हणते ‘माझ्या घरी चल... मी तुझी सेवा करीन... ते माझं स्वप्न आहेच...’ त्यावर तो तिला वचन देतो एकदा जरूर येईन म्हणून... (हा प्रसंग अप्रतिम!)

आणि पुढे कोलकात्यात परतलेला देवदास परीच्या आठवणीत झुरत तिच्यापासून दूर जाण्यासाठी पुन्हा दारूत बुडतो... चंद्रमुखी तीळ तीळ तुटत असते... एकदा मात्र तो ‘पुढचा जन्म असलाच तर तुझ्याबरोबर असेल’ असं तिला सांगतो आणि ती सुखावतेही.... पारोला विसरावं म्हणून तो ट्रेनने अख्खा भारतप्रवास करत सुटतो... त्याच्याबरोबर त्याच्यावर लहानपणापासून त्याची काळजी घेणारा धरमदास (नझीर हुसेन) असतो... देवदासची दारू सुटत नाही. शेवटी त्याची तब्येत सुधारण्यापलीकडे ढासळते... खोकल्याची उबळ आली की तोंडातून रक्त सांडायला लागतं... आपला शेवट जवळ आलाय, हे जणू कळल्यामुळे देवदास पारोला शेवटचा एकदा भेटण्यासाठी एकटाच बैलगाडीने रात्रीचा प्रवास करून तिच्या घरापर्यंत पोहोचतो.... वाटेत त्याला त्यांचे सर्व क्षण आठवतात... तिच्याजवळ जायचंय... तिच्या मांडीवर डोकं टेकवायचंय.... पण शरीर साथ देत नाही आणि तिच्या घरासमोरच्या पारावर तो प्राण सोडतो.... 

तिकडे नियतीचा संकेत असा, की तो तिच्या घराजवळ आल्यापासूनच पारोच्या मनाची तगमग सुरू झालेली असते... तिला काहीतरी वेगळं जाणवत असतं... मध्यरात्री दचकून उठून ती गॅलरीत उभीही राहिलेली असते... पण घरासमोरच्या पारावरचा देवदास अंधारात कुठचा दिसायला?... आणि मग सकाळी घरातल्या नोकरांकडून कुजबुज कानावर येते आणि देवदास घरासमोर पारावर मेल्याचं घरच्या मोठ्या मुलाकडून कळतं... ती हादरते.... देवदास गेलाय हे ऐकून ती गदगदून त्याच्या नावाचा आक्रोश करत धावत सुटते त्याच्याजवळ जाण्यासाठी... आपल्या लाडक्याला, आपल्या प्रेमदेवतेला  भेटण्यासाठी... .तिचा पती जोरात ओरडून दरबानाला हवेलीचा मोठा दरवाजा बंद करून घ्यायला सांगतो... ती दरवाज्यापर्यंत धावत जाते... ती बाहेर पडण्याआधी तो अजस्र दरवाजा बंद होतो आणि त्यावर धडकन डोकं आपटून ती उन्मळून तिथे कोसळते....

देवदासची चिता... तलत काळजात घुसणारं गीत गातोय ‘मितवा... मितवा...’ आणि भरून आलेल्या आभाळात एक पक्ष्यांचं जोडपं उडत जाताना दिसतं... सिनेमा संपतो...आपण सुन्न...!

बिमल रॉय आणि अख्ख्या टीमला दंडवत...साहिरची अप्रतिम शायरी आणि सचिनदांची सुरेल गाणी – ‘आन मिलो आन मिलो शाम सावरे’, ‘ जिसे तू कबूल कर ले वो दिल कहाँ से लाऊ’, ‘किस को खबर थी, ‘मितवा लागी रे कैसी ये’, ‘साजन की हो गयी...गोरी,’ ‘वो न आयेंगे पलटकर उन्हें लाख हम बुलाये’....

एक अप्रतिम अधुरी प्रेमकहाणी...डोळ्यांत पाणी आणणारी....अवश्य बघा हा १९५५ सालचा देवदास!

(दर मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सिनेसफर’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/YbA9uN या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yardena sasonker chincholkar About 361 Days ago
Maladilipkomar yani bhumika keleladevdas jast avadla mavin devdas peksha
0
0

Select Language
Share Link