Next
पंढरपुरात रंगली चैत्री वारी
BOI
Tuesday, March 27, 2018 | 05:34 PM
15 1 0
Share this storyसोलापूर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपुरात आज (२७ मार्च) चैत्र वारी मोठ्या उत्साहात पार पडली. कडाक्याचे ऊन अंगावर झेलत भाविकांनी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी या दोन मोठ्या वाऱ्यांनंतर येणाऱ्या माघ व चैत्र महिन्यातील एकादशीच्या वाऱ्याही महत्त्वाच्या असतात. चैत्र महिन्यातच शिखर शिंगणापुरातील शंभू महादेव व वाडी रत्नागिरीतील श्री जोतिबाची यात्रा भरत असते. या दोन्ही यात्रांना जाणारे भाविक विठुरायाचे दर्शन घेऊनच जातात. आज (२७ मार्च) शिखर शिंगणापूरची यात्रा असल्यामुळे पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

भल्या सकाळी भाविकांनी चंद्रभागेच्या पाण्यात पवित्र स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले. दरम्यान, चालून आलेला पदक्षीण भाविकांनी चंद्रभागेच्या वाळवंटात विविध खेळ खेळून हलका केला. ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे...’ असे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर महाद्वार घाटामार्गे भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी राऊळात एकच गर्दी केली होती. कडक उन्हाची तमा न बाळगता भाविकांनी पंढरपुरातील परिसर देवतांचेही दर्शन घेतले. खरे तर ही वारी चंदन उटीची वारी म्हणूनही ओळखली जाते. विठूरायाला उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून गुढीपाडव्याच्या दिवसापासून पावसाळ्यापर्यंत दररोज चंदनाची उटी लावली जाते. चैत्री वारीच्या दिवशी दुपारी तीन वाजल्याच्या नंतर श्रींना चंदनाची उटी लावली जाते. चंदन उटीच्या रूपात सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी भाविक आतुर झाले होते. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पुरेसे पाणी नसले, तरी भाविकांनी कसलीही तक्रार न करता उपलब्ध पाण्यात पवित्र स्नान केले. बी. एम. पुजारी या भाविकाने पंढरपूरला आल्यावर एक वेगळेच समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. 

(वारकऱ्यांचे खेळ आणि चैत्री वारीचे एकंदर वातावरण अनुभवा सोबतच्या व्हिडिओतून...)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्री . गजानन गवळी , भुताष्टे ता . माढा , जि . सोलापूर About 355 Days ago
बातमी, व्हिडीओ व फोटो फीचर खूपच छान आहे . यामुळे पंढरपरातील चैत्री वारी घरबसल्या अनुभवायला मिळाल्याचा आनंद मिळाला . या वारीला मी गेलो होतोय परंतु , बाईट्स ऑफ इंडियाची बातमी वाचून आणि पाहून आजही वारीतच असल्याचे जाणवतय . अशा प्रकारच्या सकारात्मक बातम्या फारच क्वचीत माध्यमे दाखवतात . त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत आम्हाला बाईट्स ऑफ इंडियाच्या निमीत्ताने सकारात्मक बातम्यांचे नवे माध्यम मिळाल्याचे फारच समाधान मिळाले आहे . हे माध्यम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परमात्मा पांडुरंग सावळा विठूराया आपल्याला निश्चित मदत करेल . - आपले प्रतिनिधी व सर्व टीमला पुढील कार्यास शुभेच्छा !
0
0

Select Language
Share Link