Next
पुणे रेल्वे स्टेशनवर मिळणार ‘यादों का सफर’चे ‘तिकीट’
नॅरो गेज डब्याचे तिकीटविक्री केंद्रात रूपांतर; स्मृती जपण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा उपक्रम
प्रणित जाधव
Friday, June 14, 2019 | 01:30 AM
15 0 0
Share this article:पुणे :
पूर्वीच्या काळी देशभरात अनेक ठिकाणी धावणाऱ्या नॅरो गेज रेल्वेची जागा आता ब्रॉड गेज रेल्वेने घेतली आहे. जुन्या चित्रपटांत हमखास पाहायला मिळणारी नॅरो गेज रेल्वे आता केवळ माथेरानसारखी काही गिरिस्थाने आणि पर्यटनस्थळीच सुरू आहे. ‘यादों का सफर’ करण्यासाठी अर्थात या जुन्या स्मृतींचा वारसा जपण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. नॅरो गेज रेल्वेच्या जुन्या, पडून असलेल्या डब्याचे नूतनीकरण करून त्याचे रूपांतर तिकीट विक्री केंद्रात करण्यात आले आहे.

पुणे स्टेशनवरील मुख्य तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ताडीवाला रोडच्या बाजूने जेथून प्रवासी ये-जा करतात त्या ठिकाणी रेल्वेच्या जुन्या नॅरो गेजच्या डब्यात तिकीट केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे गतस्मृतींचा वारसा जपणे आणि प्रवाशांची गैरसोय टाळणे असे दोन उद्देश या उपक्रमातून साधले गेले आहेत. 


नव्याने सुरू करण्यात आलेल्या या तिकीट केंद्रात आरक्षण वगळता सगळ्या प्रकारची तिकिटे दिली जातात. त्यात लोकल रेल्वेचे तिकीट, रेल्वे पास, देशभरातील कोणत्याही रेल्वेचे जनरल डब्याचे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट आदींचा समावेश आहे. या डब्याला वशिष्ठ असे नाव देण्यात आले आहे. 

या वेगळ्या प्रयोगाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, अशा प्रकारचा देशातील हा कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे त्यांनी सांगितले. ‘नॅरो गेज रेल्वेच्या नूतनीकरण केलेल्या या डब्यात सहा जूनला तिकीटविक्री केंद्र सुरू झाले. पडून राहिलेल्या जुन्या डब्यांचा चांगल्या पद्धतीने वापर केला जात आहे. भारतीय रेल्वेचा वारसा या माध्यमातून जपला जात असून, जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. तसेच, यामुळे मुख्य तिकीट केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन प्रवाशांची होणारी गैरसोयही टळणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. 

(या अनोख्या तिकीटविक्री केंद्राची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search