Next
‘आयएनएस इम्फाळ’ युद्धनौकेचे जलावतरण
नौदलाच्या ताफ्यात शक्तिशाली युद्धनौकेची भर
BOI
Saturday, April 20, 2019 | 04:43 PM
15 1 0
Share this article:


मुंबई : शत्रूच्या नौकेवर नेमका मारा करू शकणाऱ्या गायडेड क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या ‘आयएनएस इम्फाळ’ या युद्धनौकेचे जलावतरण नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते शनिवारी (२० एप्रिल) माझगाव गोदीत करण्यात आले. नौदलाच्या ‘प्रकल्प १५ बी’मधील ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही तिसरी युद्धनौका आहे. या अत्याधुनिक युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाच्या बळात आणखी वाढ झाली आहे. 

अॅडमिरल सुनील लांबा
ही अत्याधुनिक युद्धनौका जागतिक पातळीवरील युद्धनौकांच्या तोडीस तोड आहे. माझगाव गोदीत तिची बांधणी करण्यात आली आहे. तिची लांबी १६३ मीटर्स असून, ३० नॉट्सपेक्षा अधिक वेगाने ती जाऊ शकते. अत्याधुनिक सेन्सर्स, रडार, क्षेपणास्त्रे यांनी ती सुसज्ज आहे. शत्रूच्या रडार कक्षेत ती येऊ शकत नाही. १०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर ६० किलो स्फोटकांचा मारा करू शकणारे बराक क्षेपणास्त्र, तसेच १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे ४५० किलोमीटरपर्यंत डागण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे. ही नौका दोन हेलिकॉप्टर्सही वाहून नेऊ शकते.  

देशातील महत्त्वाच्या शहरांच्या नावाने युद्धनौका तयार झाल्या आहेत. दिल्ली, मुंबई व म्हैसूर नावाच्या क्षेपणास्त्र डागणाऱ्या क्रूझ विनाशिका आहेत, तर कोलकाता, कोची व चेन्नई या ‘स्टेल्थ’ श्रेणीतील क्षेपणास्त्र डागणाऱ्या युद्धनौका आहेत. माझगाव गोदीने तयार केलेल्या या स्टेल्थ प्रकारच्या अत्याधुनिक युद्धनौकेला आधी ‘आयएनएस पारादीप’ असे नाव देण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेवरून या नौकेचे नाव बदलून ‘आयएनएस इम्फाळ’ असे करण्यात आले आहे. या युद्धनौकेला मणिपूरची राजधानी इम्फाळचे नाव दिल्यामुळे प्रथमच ईशान्य भारताला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

 ‘आयएनएस इम्फाळ’ ची वैशिष्ट्ये 

- शत्रूच्या रडार कक्षेत येऊ शकत नाही. 
- १०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यापर्यंत ६० किलो स्फोटकांच्या माऱ्याची क्षमता असलेले बराक क्षेपणास्त्र वाहण्याची क्षमता. 
- १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे ४५० किलोमीटरपर्यंत डागण्याची क्षमता 
- दोन हेलिकॉप्टर्स वाहण्याची क्षमता 
- तीन प्रकारचे रडार व दोन प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स 
- विनाशिका श्रेणीतील सर्वाधिक म्हणजे ७५०० टन वजन असलेली युद्धनौका
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search