Next
बोलीभाषांचे जतन म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनाचे जतन
विचार भारती संमेलनात कुवळेकर यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, December 04, 2018 | 12:01 PM
15 0 0
Share this story

विचार भारती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी साहित्यिक विजय कुवळेकर, डॉ. नितीन करमळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल, संमेलनाचे कार्यवाह प्रदीप नाईक, स्वागताध्यक्षा आ. मेधा कुलकर्णी, विश्व संवाद क

पुणे : ‘बोलीभाषा याही संस्कृतीच्या वाहक आहेत. भाषा तुटते तेव्हा आपल्या देशाचे जीवन तुटते. त्यामुळे बोलीभाषांचे जतन म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनाचे जतन’, असे प्रतिपादन झी२४ तास वाहिनीचे मुख्य संपादक व प्रसिद्ध साहित्यिक विजय कुवळेकर यांनी केले. भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी, दोन डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या दुसऱ्या विचार भारती साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्षपदावरून कुवळेकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. 

संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष किशोर शशितल, संमेलनाचे कार्यवाह व भारतीय विचार साधनाचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा आमदार मेधा कुलकर्णी, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

कुवळेकर पुढे म्हणाले, ‘भाषेवर आपले प्रेम कमी झाले, तर उत्तम साहित्य कुठून येणार? तात्कालिकतेच्या मागे आपण धावतो तेव्हा शाश्वततेचा विचार होत नाही आणि शाश्वततेचा विचार होत नाही तेव्हा संस्कृती संकटात येते. सत्व व स्वत्व टिकविल्याशिवाय टिकाऊ अशी कोणतीही गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही. संपूर्ण जग मानवविरोधी संघर्षाने व्यापलेले दिसते. अशा वेळेस माणसांना जवळ आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, दूर नेण्याचा नव्हे. आपल्या शब्दांवर आपली निष्ठा असायला हवी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगाच्या कोठडीत राष्ट्रासाठी साहित्यसाधना केली.’


वैचारिक संवादाचा संकोच होत असल्याची खंत व्यक्त करून ते म्हणाले, ‘आपली प्राचीन संस्कृती म्हटले, की अलीकडे बुरसटलेल्या विचारांचे समजतात. वैचारिक विशालतेचा आपण संकोच केला आहे. सर्व विचारांच्या नद्या या राष्ट्रहित नावाच्या समुद्राला जाऊन मिळतात. विरोधी विचारसुद्धा घडविणारा हवा, बिघडविणारा नको. आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा वैचारिक भ्रष्टाचार अधिक धोकादायक आहे. पुरोगामी व प्रतिगामी अशा शिक्क्यांपासून सावध राहिले पाहिजे.’

समाजाला योग्य दिशा देण्यासाठी सज्जन शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘सात्विक शक्ती एकत्र झाल्याशिवाय दुर्जन शक्ती पराभूत होऊ शकत नाहीत. साधुत्व शक्ती प्रबळ होण्यासाठी जोडणाऱ्या शक्ती एकत्र व्हायला पाहिजेत. दुर्दैवाने तोडणाऱ्या शक्ती लवकर एकत्र येतात, परंतु जोडणाऱ्या शक्ती चटकन एकत्र येत नाहीत’, असेही त्यांनी नमूद केले.

प्रदीप नाईक म्हणाले, ‘हे संमेलन कोणाच्याही विरोधात नाही. सर्वांसाठी हे संमेलन असून समाज जोडणे ही या संमेलनाची भूमिका आहे.’

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘समाजाला काही तरी विचार देणारे असे हे संमेलन आहे. समाजाच्या हितासाठी जे केले जाते ते साहित्य ही साहित्याची व्याख्या आहे. साहित्य ही शक्ती आहे. तिचा वापर विधायक हेतूने व्हावा. साहित्याचा उपयोग सकारात्मक संघर्षासाठी व सुसंवादासाठी व्हायला हवा. ही ताकद ओळखून लेखणीचा वापर केला पाहिजे. हा उपयोग कसा करावा, याचे आदानप्रदान करण्यासाठी साहित्य संमेलन असते. विचारातून विखार निर्माण होऊ नये, विचारातून विकार निर्माण होऊ नये आणि विचारातून विद्वेष तर नक्कीच निर्माण होऊ नये. समाज बदलायचा असेल तर साहित्यिकांची समज प्रगल्भ व्हायला हवी.’

कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘संवाद सर्व क्षेत्रात व्हायला पाहिजे, केवळ साहित्य क्षेत्रात नव्हे. विचार समान असले तरच संवाद होऊ शकतो. सर्व क्षेत्रात डिजिटलायझेशन झाल्यामुळे साहित्य आपल्यापर्यंत पोचण्याचे स्वरूप बदलले आहे. विद्यापीठाच्या जुन्या पुस्तकांचे पुन:प्रकाशन व नवीन पुस्तकांची निर्मिती असा प्रकल्प हाती घेतला आहे.’

समारोप सत्रात बोलताना संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद दातार म्हणाले, ‘जीवनासाठी साहित्य असा विचार करणाऱ्यांचे एकत्रीकरण व्हावे आणि राष्ट्रीय, भारतीय विचारांचा प्रसार, प्रचार व्हावा आणि नवनवीन साहित्याची निर्मिती होत राहावी, ही या संमेलनामागची भूमिका आहे. हे संमेलन जीवनाभिमुख साहित्यावर विश्वास असणाऱ्यांचे आहे.’

गीत रामायणकार ग. दि. माडगूळकर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक खास कार्यक्रम कलावंत रवींद्र खरे यांनी सादर केला. संमेलनाच्या प्रत्येक सत्रात एक या प्रमाणे प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे लिखित कादंबरी ‘अहिनकुल’, डॉ. दिपाली पाटवदकर लिखित ‘आर्यभट्ट’, हेमंत महाजन लिखित व विजय मराठे अनुवादित ‘बांगलादेशी घुसपैठ’, डॉ. प्रतिभा औटी-पंडित लिखित ‘बोल अमृताचे’ आणि विवेक जोशी लिखित ‘विपन्स दॅट विन्स दी वॉरफेअर’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनानिमित्ताने भारतीय विचार साधनातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना कुवळेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. संमेलनात तीन ठरावही मंजूर करण्यात आले.

लोकभाषा हा समाजाचा रक्तप्रवाह

दुसऱ्या सत्रात भाषातज्ज्ञ प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांची मनस्विनी प्रभुणे यांनी मुलाखत घेतली. या वेळी बोलताना डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘लोकभाषा हा समाजाचा रक्तप्रवाह आहे. लोकसाहित्य हे परंपरागत मनाचा आविष्कार असतो. परंपरा म्हणजे अनादी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेचे दृश्यकरण असते. भाषा ही केवळ भाषा नसते, ती एक संपूर्ण संस्कृती असते. लोकसाहित्य हे समूहमनाचा मौखिक आविर्भाव असते. लोकसाहित्य हे नित्य वर्तमान असते. बोलीभाषा या शरीरातील पेशींसारख्या असतात. जुन्या व नव्यांचा संगम होऊन नवीन भाषा अस्तित्वात येते. वाक्प्रचार व म्हणींच्या स्वरूपात जुन्या गोष्टी कायम राहतात.’

लोकांमध्ये संवाद नाही हे आजचे वास्तव

या संमेलनात ‘साहित्यातून संघर्षाकडे की सुसंवादाकडे’ या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व भानू काळे यांनी भाग घेतला. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या परिसंवादाचे अध्यक्ष होते. या वेळी बोलताना  तोरसेकर म्हणाले, ‘संघर्ष असो वा सुसंवाद असो, त्यासाठी समोरच्याचे ऐकून घेण्याची तयारी हवी. साहित्य क्षेत्रात मात्र सध्या टोळीबाजी झालेली आहे. संघर्ष प्रस्थापितांविरुद्ध करायचा असतो. सध्या प्रस्थापितच आपण बंडखोर असल्याचे सांगत आहेत. कृत्रिम साहित्य हे नाट्य निर्माण करू शकते, परंतु ते सुसंवाद निर्माण करू शकत नाही. संघर्ष व सुसंवाद या सख्ख्या बहिणी आहेत; मात्र त्यांचे कधीही पटत नाही.’

भानू काळे म्हणाले, ‘साहित्याला जीवनाचे अधिष्ठान असायलाच हवे आणि सुसंवाद हे एक अधिष्ठान असू शकते. आपल्याकडे वैचारिक असहिष्णुता आहे. अशा प्रकारे असहिष्णुता असताना सुसंवाद होऊच शकत नाही. साहित्य कशासाठी याचे उत्तर शोधणे ही साहित्यिकांचीही जबाबदारी आहे. आजच्या जगात आपल्या मनातील संवाद हरविला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आंतरिक संवाद होईल तेव्हाच परस्पर संवाद व्यवस्थित होईल.’ 

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘लोकांमध्ये संवाद नाही, ही गोष्ट खरी आहे. संवाद करायचाच नाही, ही भूमिकाही काही जण घेतात. संघर्ष हा संवादाला पर्याय असू शकत नाही. साहित्य हे दुधारी तलवारीसारखे आहे. साहित्यात संघर्ष व संवाद या दोन्हींची शक्यता आहे. यातला कोणता मार्ग पत्करावा, हे संबंधित लेखकावर अवलंबून आहे. संघर्षाचा मार्ग आजच्या स्थितीत परवडणारा नाही.’

आसावरी जोशी आणि विभावरी बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर शशितल यांनी आभार प्रदर्शन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link