Next
‘मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध’ : मुख्यमंत्री
नागपूरमध्ये १६व्या ‘जागतिक मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन
BOI
Saturday, January 05, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this story


नागपूर : ‘जगाच्या पाठीवर अतिशय प्राचीन भाषा म्हणून मराठीचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल. मराठी भाषा ही अमृताचा ठेवा असून मराठी भाषेसाठी नागपूरचे बलिदान मोठे आहे. भाषेसाठी एवढे बलिदान दुसऱ्या कोणत्याही शहराने दिले नाही. त्यामुळे ‘जागतिक मराठी साहित्य संमेलन’ नागपुरात होत असल्याचा आनंद आहे. एकविसाव्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठीला विकसित करणे गरजेचे असून मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूरमध्ये होत असलेल्या १६व्या ‘जागतिक मराठी साहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ‘जागतिक मराठी अकादमी’च्या वतीने ‘शोध मराठी मनाचा’ या थीमवर चार ते सहा जानेवारी यादरम्यान येथील वनामती सभागृहात जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे, यशवंतराव गडाख, गिरीश गांधी व शशिकांत चौधरी उपस्थित होते.

'मराठी ज्ञानभाषा व्हावी' 
‘परदेशात मराठी माणसाने आपल्या कर्तृत्त्वावर विश्व उभे केले आहे. यातून सामान्य मराठी तरुणाला प्रेरणा मिळत आहे. आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. त्या व्यक्तींकडून तरुणाईने खूप काही शिकण्यासारखे आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या प्राचीन भाषेत मराठीचा समावेश होतो, याचा अभिमान वाटतो. भारतीय चित्रपटसृष्टी मराठी माणसाने समृद्ध केली आहे. मराठी नाटकाचे स्थान आजही अव्वल आहे. मराठी साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. हे युग इंटरनेटचे युग असून २१व्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठी भाषा विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला ज्ञान भाषेचा प्रवास वाढवावा लागेल. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले.

‘नव्या पिढीसमोर मराठीचे योग्य सादरीकरण व्हावे..’ 
‘मराठी भाषेची गोडी नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याची गरज असून मराठी अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. माणूस हा गुणवत्तेने मोठा असतो. भाषेच्या विकासासाठी समाजाला किंवा सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा प्रत्येकाने आपली गुणवत्ता व क्षमता वाढवल्यास भाषेचा व पर्यायाने मराठी माणसाचा सन्मान वाढेल. मराठीचे योग्य सादरीकरण नव्या पिढीसमोर झाले पाहिजे’, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केली.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार म्हणाले, ‘व्यवसायानिमित्त परदेशात असलो, तरी मनाने आजही मराठीच आहे. अलिकडच्या काळात भारताची, जगात पत वाढली आहे. भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या वाटेवर असून मूलभूत सोयीसुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतातील लोकशाही ही जगात श्रेष्ठ असून लोकशाहीमुळे भारत महासत्ता होईल. जागतिक मराठी साहित्य संमेलनातून तरुणांना प्रेरणा मिळेल.’ 

माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी या वेळी ठाणेदार यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘परदेशात गेलेला मराठी माणूस हा स्वत:च्या हिमतीवर व कष्टाने आपले नाव उज्ज्वल करतो. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेसारख्या देशात संघर्ष करून आपला व्यवसाय उभा केला. त्यांच्यासारखाच माणूस जागतिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, ही बाब अभिनंदनीय आहे. शोध मराठी मनाचा हे संधी देण्याचे व्यासपीठ असून मराठी माणसाला व मराठीला सातासमुद्रापार ओळख मिळवून देणार आहे.’  

जागतिक अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे म्हणाले, ‘घरात मराठी बोलली पाहिजे. इंग्रजी ही नोकरीची भाषा असून जगण्याची नाही. मराठी जगवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजाचीसुद्धा आहे. राज्यात नववीपर्यंत मराठीला प्राधान्य दिले गेले पाहिजे. इतरांच्या प्रगतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा व नव्या वाटा चोखाळाव्या. यासाठी शोध मराठी मनाचा हे व्यासपीठ आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

गिरीश गांधी यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकात विशद केली. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही ‘श्रीं’ची ईच्छा’ या पुस्तकाच्या ५०व्या आवृत्तीचे व ‘पुन्हा श्री गणेशा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विष्णू मनोहर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात साहित्यिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link