Next
‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’
प्रेस रिलीज
Saturday, April 14, 2018 | 03:59 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल,’ अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रिपाइं आणि परिवर्तन साहित्य महामंडळातर्फे आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. त्यासाठी डॉ. पानतावणे यांची कन्या नंदिता यांच्यासह मान्यवरांना घेऊन डॉ. गंगाधर पानतावणे फाउंडेशन नावाने ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना करून दिवंगत पानतावणे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये शासनाने जमीन द्यावी यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवलेंनी दिले.

या वेळी विचारमंचावर पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, डॉ. ऋषिकेश कांबळे; डॉ. रोहिदास वाघमारे, सुहास सोनवणे, डॉ. पानतावणे यांच्या कन्या नंदिता अवसरमल, आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, भुपेश थुलकर, काकासाहेब खंबाळकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड, डॉ. प्रीतिष जळगावकर, बी. के. बर्वे, आशा लांडगे, फुलाबाई सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.

‘डॉ. पानतावणे यांच्या मार्गदर्शनानुसार परिवर्तन साहित्य महामंडळ चालत होते. ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यांचे वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभले. त्यांच्याशी चर्चा करूनच शिवशक्ती भीमशक्ती युतीचा निर्णय घेतला. अनेक साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, संपादक, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून शिवशक्ती भीमशक्ती युतीचा निर्णय घेतला. डॉ. पानतावणे यांनी अस्मितादर्श नियतकालिकातून आंबेडकरी विचारांचा प्रचार केला आंबेडकरी विचारांचे साहित्यिक घडविले. मला ही त्यांचा आशीर्वाद मिळाला होता,’ असेही आठवले यांनी सांगितले.

‘समाजहितासाठी राजकारणात कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पद्धत मंजूर करून घेतली; मात्र त्याविरुद्ध येरवडा जेलमध्ये महात्मा गांधींनी आमरण उपोषण केल्यानंतर स्वतंत्र मतदार संघऐवजी दलितांसाठी आरक्षण देणारे पुना पॅक्ट डॉ. आंबेडकरांना करावा लागला. डॉ. आंबेडकरांनी काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीयमंत्री पद स्वीकारले तेव्हा सांगितले होते की, काँग्रेसच्या प्रवाहात ढेकळे मुरूम विरघळून जातील; मात्र टणक दगड विरघळणार नाही. तसे आम्हीही काँग्रेस सोबत होतो; मात्र त्यात विरघळलो नाही. आता भाजप सोबत युतीमध्ये आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी आहे, मात्र आमचे निळ्या झेंड्याचे, आंबेडकरी तत्वज्ञानाचे, रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र आहे,’ असे आठवले म्हणाले.  

‘रामदास आठवले हे सच्चे आंबेडकरवादी’
‘काँग्रेस आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांचे विरोधक होते; मात्र तरीही काँग्रेसने केंद्रीय मंत्रीपद स्वीकारण्याची केलेली विनंती त्यांनी मान्य केली होती. प्रधानमंत्री नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय कायदा मंत्री होते. त्यामुळे विरोधक असले, तरी समाजहितासाठी विरोधकांशी संवादाचा प्रवाह कायम ठेवला पाहिजे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

‘डॉ. पानतावणे हे समरसता मंचावर गेले होते; पण त्या मंचावर त्यांनी शुद्ध आंबेडकरी विचारच मांडला. या संवादाच्या प्रक्रियेचे आपण स्वागतच केले पाहिजे. डॉ. पानतावणे यांच्या प्रत्येक श्वासात आंबेडकरी विचार होता. माझ्यासाठी पितृतुल्य असलेल्या डॉ. पानतावणे यांना आदरांजली अर्पण करतो’ असे सबनीस म्हणाले.

‘डॉ. पानतावणे यांच्याप्रमाणेच रामदास आठवले सुद्धा सच्चे आंबेडकरवादी आहेत. पानतावणे सरांशी आठवलेंचे गुरुशिष्याचे नाते होते. दोघांनीही समाजात विसंवादाऐवजी  संवादाची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. आठवलेंनी केलेल्या प्रयोगाचे मी स्वागत केले आहे. अश्या संवादाच्या प्रक्रियेचे समाजाने स्वागत केले पाहिजे. आठवले हे संवादाची जागा भरून काढत आहेत. त्यांनी राजकारणात शिवशक्ती भीमशक्ती भाजपशी युती करून संवादाचे नवीन पर्व सुरू केल्याबद्दल त्यांचे समाजाने स्वागत केले पाहिजे’ असेही सबनीस यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link