Next
पुण्यातील गणपती उत्सवाची रोमहर्षक सव्वाशे वर्षे!
BOI
Saturday, September 02, 2017 | 12:24 PM
15 0 0
Share this article:

१९६७ चा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव

पुण्यात सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२५वे वर्ष आहे. या कालावधीत ही परंपरा जपली तर गेलीच; पण काळानुसार त्यात बदल होऊन ती अधिकाधिक समृद्ध होत गेली. या १२५ वर्षांतील काही टप्प्यांबाबत काही मान्यवरांनी सांगितलेल्या किंवा लिहून ठेवलेल्या आठवणींना उजाळा देणारा ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस यांचा हा लेख...
.................

पुण्यातील गणेशोत्सवाच्या आठवणी अनेक पुणेकरांनी लिहून ठेवल्या आहेत. अनेक मान्यवर व्यक्तींशी वेळोवेळी संवाद साधताना त्यांनीही खूप आठवणी मला सांगितल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे होत असताना त्या आठवणींबद्दल सांगावेसे वाटते.

लोकमान्य टिळकपुण्यातील गणपती उत्सवाचे ७० वर्षे साक्षीदार असलेले (दिवंगत) ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल कर्वे यांनी एकदा सांगितले होते, की १९०० सालातील कर्मठ पुण्यात प्रबोधनासाठी एक चांगले माध्यम म्हणून गणेशोत्सव साजरा करता येईल अशी कल्पना पुढे आली. घरातला गणपती रस्त्यावर आणायच्या या कल्पनेलाही तेव्हा अनेकांनी विरोध केला. पुढचा इतिहास ज्ञात आहे. कृष्णाजीपंत खासगीवाले यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधला सार्वजनिक गणपती पाहिला. तेथील भाविकांची गर्दी पाहून त्यांनी ही कल्पना आल्यावर अनेकांपुढे मांडली. तेव्हा पुण्यात कर्मठ विचारांची माणसे असली, तरी लोकमान्य टिळकांनी स्वखर्चाने मूर्ती, मंडप, सजावट व उत्सव सुरू केला. 

कर्वे यांच्या मते १९२० ते ४५पर्यंत स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. देशास केव्हाही स्वातंत्र्य मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही सर्वांनाच ब्रिटिश सत्तेच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागत होते. दुसरे महायुद्धही याच काळात झाल्याने त्याचा परिणाम सार्वजनिक गणेशोत्सवावर झाला होता. जागतिक मंदी आणि महागाईची झळ याच काळात सर्वाधिक पोहोचली. या काळात केवळ दोन रुपयांमध्ये घरगुती सण साजरे होत! पुणेकरांच्या घरातील गणपतीचे आगमन हा एक आनंद सोहळाच असे. 

पुण्यातील मंडई परिसरातील बाजारकर्वे यांनी आपल्या काही आठवणी लिहूनही ठेवल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, तेव्हा घरात बसवण्याच्या गणपतीच्या मूर्तीही काळ्या मातीच्या कुंभारांनी तयार केलेल्या व पिवळ्या-तांबड्या रंगात रंगवलेल्या असत. याच काळात शनिवारवाड्याजवळील कुंभारवाडा येथे छोट्या व नंतर मोठ्या गणेशमूर्तींचा बाजार भरायला सुरुवात झाली. मूर्तींच्या पूजेचे साहित्य मात्र मंडई व तुळशीबाग येथेच मिळत असे. श्रीगणरायाच्या आगमनासाठी गणेश चतुर्थीला प्रत्येक घरातील वातावरण उत्साही व आनंदाने गजबजलेले असे. सकाळीच गणेशमूर्तीची पूजा, आरती व प्रसाद वाटप होई. सार्वजनिक गणपती मात्र दुपारी बारा किंवा फारतर एकपर्यंत बसवले जात. तिथेही न चुकता दोन वेळची आरती व प्रसाद असे. 

कर्वेंच्या आठवणीनुसार सार्वजनिक गणरायाच्या मूर्ती मात्र शाडूच्या व सुंदर रंगात रंगवलेल्या असत. अशा मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या परंपरा याच काळात वाढीस लागल्या. १९४०-५०च्या दशकात पुण्यात सी. डी. जवारी या नारायण पेठेतील मूर्तिकाराच्या गणेशमूर्तींना खूप मागणी असे. याच काळात सार्वजनिक गणेश मंडळाची पूजेची व मुख्य मूर्ती वेगळी असायची आणि गेल्या वर्षीची मूर्ती पुन्हा नव्याने रंगवून घेतली जात असे. पुण्यातील छोट्या रस्त्यांवर लहान आकाराचे मांडव घालून गणेशमूर्तीपुढे अनेक कलात्मक वस्तूंची आरास करण्यात येई. झुंबरे, काचेच्या हंड्या आणि गॅसच्या बत्त्या वापरून केलेली रात्रीची रोषणाई केवळ लाजबाब असे!  

मोठ्या सार्वजनिक गणपती मंडळांपुढे दिवसा भजन आणि कीर्तने होत. संध्याकाळी सहानंतर रात्री उशिरापर्यंत करमणुकीचे कार्यक्रम असत. त्यात विविध मेळे, पोवाडे, जादूचे प्रयोग, शारीरिक कसरती, नकला, वाद्यवृंद, गायन, समई नृत्य, नाटिका आदी प्रकार सादर होत. त्यातील पुणेरी मेळ्यात ‘साऱ्या जगात झालीया कीर्ती रं, शहर पुण्याची निराळी धरती रं’ हा पारंपरिक पोवाडा लोकप्रिय झाला होता. यातील शाहिरी पोषाखातील तरुण डोक्यावर पागोटे धोतर, खांद्यावर घोंगडी, कानात भिकबाळी आणि हातात घुंगरू बांधलेली घुंगुरकाठी घेऊन नाचतही! तेव्हा पुण्यात जना मावळी मेळा, जनमर्द मावळी मेळा हे मेळेही लोकप्रिय होते. सन्मित्र समाज मेळ्यातील शहरी मुले नेहरू शर्ट आणि पायजमा किंवा सुरवार घालत आणि गळ्यात किंवा खांद्यावर रंगीत उपरणे किंवा मफलर गुंडाळत. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय वातावरणाचाही गणपती उत्सवावर परिणाम झाला. कर्वेंच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधींच्या विचारांनी भारलेल्या या काळात काही देशभक्तीपर गाणी म्हणणारे मेळे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पुणे शहरात आयोजित केले जात. ते मेळे संध्याकाळच्या फेरीत सार्वजनिक गणपती मंडळासमोर थांबत व तिथे ते स्वतंत्र पद्धतीने गाणी व पद्यरचना गात. ही गीते याच हौशी कवींची असत. या रचनांमधील लोकप्रिय गीते तेव्हा छोट्या पुस्तिकांच्या रूपात प्रसिद्ध होत आणि एक आण्याला पुस्तिका विकत मिळत! १९३० ते ५० या दोन दशकांपासून हळूहळू सिनेसंगीतही त्यात येऊ लागले. त्यात आधी ‘प्रभात’ची, मग सैगल व पुढे राज कपूरच्या सिनेमातील गाणी लोकप्रिय होत गेली. गंमत म्हणजे सिनेमातील लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर सामाजिक आशयाची गाणीही गायली जात! गणपतीवर आधारित ‘बाप्पा बाप्पा बाप्पा, गणपती बाप्पा हा आला, शारदादेवी घेऊनी बसला मांडीवर आजला’ हे वीररसातील मावळी मेळ्यातले गाणे त्या काळात विशेष लोकप्रिय झाले होते. 

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेशातील गणपतीनकला करून हसवणाऱ्यांमध्ये या कालखंडातील सख्या हरि संत, आनंद जोशी व भोंडे लोकांच्या लक्षात राहिले. याशिवाय विडंबन पद्धतीची गीते सादर होत. पुण्यात शिक्षण वा नोकरीला आलेल्या ग्रामीण माणसाची होत असणारी फजिती विडंबन गीतातून गायली जायची! याशिवाय शाहीर नानिवडेकर, अभ्यंकर, भोसले हे प्रसिद्ध होते. ते छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, चाफेकर बंधू या क्रांतिकारकांवर पोवाडे गात आणि दाद मिळवीत, अशीही आठवण कर्वे यांनी लिहून ठेवली आहे. 

१९५०नंतर जादूचे प्रयोगही लोकप्रिय झाले. भिकारदास मारुतीपाशी राहणारे जादूगार रघुवीर भोपळे हे गणेशोत्सवातील जादूच्या प्रयोगांमुळे पुण्यात व नंतर जगभरात नावारूपाला आले. गोखले व बोधे हे जादूगारही तेव्हा जादूचे प्रयोग करत. आवडीचे पदार्थ जादूने तयार करून मुलांना खायला देणे हा गणपती उत्सवातील एक हातखंडा प्रयोग असे!

अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीबद्दल एकदा विठ्ठल कर्वेंनी सांगितलं होतं, की विसर्जन सजावट व रोषणाईसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गणपतींमध्ये अखिल मंडई गणपती, बाहुलीच्या हौदाचा गणपती उर्फ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पहिल्यापासूनच आघाडीवर होते. अगदी सुरुवातीला त्यांची विसर्जन मिरवणूक पालखी, चारचाकी हातगाडी, रथ यावरून निघत असे. सायंकाळी सात वाजण्याच्या आत लकडी पुलाखालील नदीच्या खोल पात्रात विसर्जन सोहळा सफळ संपूर्ण होत असे! भाऊ रंगारी, वस्ताद नाईकांचा गणपती, कसबा पेठ, सरदार मुजुमदारांचा गणपती, नगरकर तालीम, तांबडी जोगेश्वधरी मंडळ, ओंकारेश्वणर, ओटा मंडळ, अहिल्यादेवी हायस्कूल चौकातील नामदेव राऊत यांचा गणपती हे विसर्जन मिरवणुकीतील रोषणाई आणि आराशीसाठी तेव्हा प्रसिद्ध होते. 

१९३०च्या दशकातील गणेशोत्सवातील कार्यक्रमांवर मराठीतल्या पहिल्या ज्येष्ठ बंडखोर (दिवंगत) लेखिका मालतीबाई बेडेकर यांनीही भाष्य केले आहे. १९३१-१९३२मधील पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल त्या म्हणतात, की पुण्यातला गणेशोत्सव मोठ्या गांभीर्याने साजरा होत असे. दहा दिवस मेळे, कवितावाचन, व्याख्याने, परिसंवाद यांची मोठी बौद्धिक मेजवानी असे. तसेच गणपती विसर्जनाचा सोहळाही तितक्याच गांभीर्याने पार पाडला जाई.  

मराठी भावगीताचा पाया रचणारे (दिवंगत) गायक गजाननराव वाटवे यांनी १९४० व ५०चं दशक गाजवलं. त्यांनी सांगितलेली गणेशोत्सवातील एक आठवण खूपच बोलकी आहे. ‘पुण्यातल्या सार्वजनिक गणपतीतील माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाला १९४२मध्ये गर्दीचा उच्चांक झाला. लक्ष्मी रोडवरील उंबऱ्या गणपती ते सिटी पोस्टाजवळील गणपती चौक या भागात पुणेकर बसले होते. मंचावरून दोन्ही ठिकाणी असणाऱ्या गर्दीचे शेवटचे टोकही दिसत नव्हते! ‘वारा फोफावला’ हे मी गायलेलं गाणं लोकांनी तेव्हा डोक्यावर घेतलं होतं,’ असे वाटवे यांनी सांगितले होते. 

केशवजी नाईकांचा गणपतीपुढे १९८०-९०च्या दशकात पुण्यात सहायक पोलिस उपअधीक्षक असणारे दिलीप पानसे यांच्याही गणेशोत्सवाबद्दलच्या आठवणी ताज्या आहेत. ते म्हणतात, ‘त्या काळातही शनिवारवाड्याशेजारी असणाऱ्या पेशवेकालीन मुजुमदार वाड्यातील सार्वजनिक गणपती हा नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह सादर होत असे. तिथे अल्लादिया खाँ साहेब, भास्करबुवा बखले, हिराबाई बडोदेकर, सवाई गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, अहमदखान तिरखवाँ, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे गायन होई. पेशवाईतील सरदार रास्ते यांच्या शनिवार पेठेतील मेहुणपुऱ्यातील वाड्यात कमळात बसलेली गणेशाची सुंदर मूर्ती आठवते. तसेच पेशवाईतील सरदार नातू यांच्या कन्याशाळेजवळील वाड्यात एका सुंदर पालखीत गणरायाची मूर्ती वाजतगाजत मिरवणुकीसाठी जात असे! याशिवाय पेशवाईतील सावकर पटवर्धन-दीक्षित यांचा चौसोपी वाडा शनिवारवाड्याशेजारील दक्षिणमुखी मारुतीपाशी आहे. तिथे कुसरीच्या महालात गणेशोत्सव होत असे. त्यात तीन महिरपींचे सुंदर मखर असे. दोन्ही बाजूंना बिलोरी आरसे बसवले जात. त्यावरील काचेवर राजस्थानी शैलीतली सुंदर चित्रे काढलेली असत.’

‘पेशवाईपासून सरदार घराण्यातील अनेक गणपती उत्सवांत पारण्याचे भोजन घातले जाई. त्यात घरंदाज स्त्रिया पंचपक्वान्ने वाढताना नाकात नथ, हातात गोठ, पाटल्या व बिलवर असे दागिने घालत. पेशवेकाळातील विश्रमबागवाड्यातील गणेशोत्सवाची प्रथा पुढे इंग्रजांनी चालू ठेवली,’ असेही पानसे यांनी सांगितले होते.  

भाऊसाहेब रंगारी गणपती मिरवणूकसहा जुलै १९६५ रोजी पुण्यात पोलिस आयुक्तालय स्थापन झाले. तेव्हा महात्मा फुले मंडईत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या काळात या भागात कर्फ्यू लावण्यात आला होता आणि बंदोबस्त वाढवण्यात आला होता, अशी आठवण पुण्याचे पहिले पोलिस आयुक्त ई. सु. मोडक यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहून ठेवली आहे; पण त्यानंतर पुण्यातील वातावरण पूर्ण शांत झाले आणि गणपती उत्सव नेहमीच्या थाटात सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

दगडूशेठ गणपती उत्सवाचे एक अध्वर्यू असणारे (दिवंगत) प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांनी सांगितलेल्या आठवणींवरूनही त्या काळातील उत्सवाची कल्पना येते. ‘पुण्यातील मानाच्या गणपतींवरून होणाऱ्या वादांमध्ये टिळकांनी लक्ष घातले. हा वाद मंडईत आताच्या टिळक पुतळ्यापाशी चालत असे! तेव्हा लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांनी हा वाद सोडवण्यासाठी ब्रह्मगिरी महाराजांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यांनी घालून दिलेले मानाचे क्रमांक आजपर्यंत चालू आहेत! १९४० ते ७८ या काळात गणपती विसर्जन मिरवणुका रात्री संपत असत. मध्यरात्रीनंतर दगडूशेठ आणि मंडईचा विद्युत रोषणाईचा गणपती पाहिल्याशिवाय लोक घरी जात नसत. आताही हे चित्र बदललेले नाही.’ 

सार्वजनिक गणेशोत्सवात भाषण करताना लो. टिळक‘१९४८पर्यंत पुण्यातील सार्वजनिक गणपतींची संख्या ३००पर्यंत गेली होती. त्यामुळे हा उत्सव शांततेत पार पाडला जात असे. ऐशीच्या दशकानंतर गणपती मंडळांची संख्या एकदम वाढली आणि एकमेकांच्या जवळ जवळ असणाऱ्या गणपतींमुळे बऱ्याच वेळा खूप प्रश्नं निर्माण होत गेले. आता नोंदवलेले व न नोंदवलेल्या मंडळांचे गणपती मिळून कित्येक हजारांवर ही संख्या गेली आहे,’ असे विद्यमान अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले. ‘कमीत कमी ध्वनिप्रदूषण व बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची नीट व्यवस्था. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था आम्ही विश्रामबागवाड्याच्या परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने करतो. दर वर्षी या उत्सवाचे नियोजन व सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे. असे असूनही गणपती उत्सव आजही निर्विघ्नपणे पार पडतो ही त्या श्रीगजाननाचीच कृपा आहे,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

१९७२ मधील पुण्यातील एका सार्वजनिक गणपती मंडळाचा देखावा

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search