Next
रत्नागिरीला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा लवकरात लवकर मिळावा
पर्यटन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी
BOI
Tuesday, September 24, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्हादेखील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. तसेच, महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आली असताना मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने, हा निर्णय तातडीने घेण्यात यावा,’ अशी मागणी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कोकण पर्यटन विकास समितीचे (पर्यटन संचालनालय) उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रमोद जठार यांनी दिली.रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे. ‘रत्नागिरी हा पर्यटनासाठी अत्यंत समृद्ध जिल्हा आहे. गणपतीपुळे, वेळणेश्वर, गुहागर, हर्णै, जयगड यांसारखे सुंदर समुद्रकिनारे येथे आहेत. पावस, मार्लेश्वर, राजापूरची गंगा, परशुराम देवस्थान यांसारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. जयगड, मंडणगड, गोपाळगड, भगवतीगड, यशवंतगड यांसारखे अनेक किल्ले जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांची कर्मभूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, बी. जी. खेर, बाळासाहेब सांवत यांची जन्मभूमीदेखील याच जिल्ह्यात आहे,’ असे जठार यांनी पत्रात म्हटले आहे.प्रमोद जठार‘दापोली कोकण कृषी विद्यापीठासह ब्रह्मदेशच्या थिबा राजाचा पॅलेस व माचाळ (ता. लांजा) हे थंड हवेचे ठिकाणही रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व पश्चिम महाराष्ट्रातून जोडलेल्या रस्त्यांमुळे पर्यटकांसाठी दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. नजीकच्या काळात रत्नागिरी येथील विमानतळ उडान योजनेअंतर्गत सुरू होणार आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध असून, त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. राजापूर बंदर हे ब्रिटिशांची वखार म्हणून ओळखले जात होते. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांत पुरातन काळातील कातळशिल्पे आढळतात. त्यामुळे रत्नागिरीला पर्यटन जिल्हा म्हणून तातडीने मंजुरी मिळावी,’ अशी मागणी जठार यांनी केली आहे. 

(रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘करू या देशाटन’ या आमच्या सदरात विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांविषयीची माहिती नियमितपणे प्रसिद्ध होते. भ्रमंती या सेक्शनमध्ये हे सदर वाचता येईल.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search