Next
नंदुरबारमध्ये आदिवासी अकादमीचा शुभारंभ
शशिकांत घासकडबी
Monday, July 22, 2019 | 06:29 PM
15 0 0
Share this article:नंदुरबार :
नंदुरबारमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सिलेज प्रकल्पामध्ये शासनाकडून आदिवासी अकादमी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी १४ कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान प्रथमच विद्यापीठाला केवळ नंदुरबार केंद्रासाठी प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाकडून या प्रकल्पासाठी २५ एकर जागा प्राप्त झाली असून, या जागेत विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे. त्या प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. 

जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. अजित पाटणकर यांचे मार्गदर्शन या प्रकल्पाला लाभणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच अकादमीच्या नवीन जागेत वृक्षारोपण करण्यात आले. 

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी व आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी उपयोगी विज्ञान, समुचित तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, कार्यक्षेत्रातील आदिवासी व अन्य समूहांमध्ये परस्पर सहकार्य, सहयोग व समन्वय प्रस्थापित करण्यासाठी साह्य करणे, यासाठी अकादमीअंतर्गत सिलेज आधारित प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबरमंच विद्यापीठातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापन करण्यात आला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र (मुंबई), बाएफ (पुणे), कृषी विज्ञान केंद्र (नंदुरबार) आणि एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन या संस्थादेखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास मदत करणार असल्याचे या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

पी. के. अण्णा पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे राज्यपालनियुक्त अधिसभा सदस्य दिलीपदादा पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर, हिरालालकाका चौधरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी, आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए. बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच. एल. तिडके, प्रा. दिनेश खरात, प्रा. जी. वाय. पाटील आदी उपस्थित होते. आदिवासी अकादमीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सध्या पी. के. पाटील महाविद्यालयाच्या इमारतीत हे कामकाज सुरू राहणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search