Next
‘आरंभ’ नव्यानं जगण्याचा...
मानसी मगरे
Tuesday, October 24, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

आरंभ ऑटिझम संस्थेतील मुले स्नेहसंमेलनात नाट्य सादर करताना

‘ऑटिझम’ ही एक जन्मस्थ मानसिक अवस्था आहे. जन्मतः ऑटिस्टिक असलेल्या मुलांचं संगोपन करणं हे पालकांसमोर असलेलं एक आव्हानच आहे. या मुलांना एक स्वच्छंदी आयुष्य जगता यावं, त्यांना स्वतंत्रपणे राहता यावं यासाठी एक स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्याचं काम केलंय औरंगाबाद येथील ‘आरंभ’ या संस्थेनं. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज पाहू ‘आरंभ’चे बाळासाहेब टाकळकर यांनी संस्थेबद्दल दिलेली माहिती..
.......

एकदा एखादं मूल ऑटिस्टिक झालं, तर ते पुन्हा त्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही. त्यानंतर पुन्हा ते कधीही सामान्य आयुष्य जगू शकत नाही हे आपल्याला ठाऊकच आहे. तेव्हा मग अशा मुलांना वाढवणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं, त्यांना समजून घेणं, अशा अवस्थेत ते एक चांगलं आयुष्य जगू शकतील यासाठी प्रयत्न करणं अशी काही आव्हानं त्या मुलांचे पालक आणि डॉक्टर यांच्यासमोर असतात. अशा ऑटिस्टिक मुलांना एक उत्तम आणि स्वच्छंदी जीवन जगता यावं यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद येथील धडपडणाऱ्या काही जिवांनी मिळून ऑटिस्टिक मुलांसाठी काम करण्याचे ठरविले. त्यातूनच जन्म झाला ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन्स’ या संस्थेचा. 

'आरंभ' संस्थेतील पालक कार्यशाळाचार नोव्हेंबर २०११ला औरंगाबाद येथील अंबिका टाकळकर यांनी घरगुती स्तरावर ‘आरंभ’ची स्थापना केली. विशेष म्हणजे ही मराठवाडा भागातील पहिली संस्था आहे, जी ऑटिस्टिक मुलांसाठी काम करते. या ठिकाणी ऑटिस्टिक मुलांवर विशेष शिक्षण आणि विविध प्रकारच्या थेरपीद्वारे उपचार केले जातात. त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात. केवळ मुलांसाठीच नाही, तर त्या मुलांच्या पालकांसाठीही कार्यशाळा घेतल्या जातात. 

व्होकेशनल ट्रेनिंगदरम्यान मुलांनी बनवलेल्या पणत्याऑटिझम आणि स्लो लर्नर मुलांचा विकास करणं हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी सुरुवातीपासूनच या मुलांना विशेष सुविधा पुरवल्या जातात. विविध थेरपीच्या माध्यमातून या मुलांचा विकास साधला जातो. त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्होकेशनल ट्रेनिंगही दिले जाते. सुरुवातीला दोन मुलांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आज ३७ ऑटिस्टिक मुले आहेत. 

विविध प्रकारच्या थेरपी : 
टेक थेरपी : या थेरपीत ऑटिस्टिक आणि अपंग मुलांना उपचार आणि शिक्षण दिले जाते. 
पीईसीएस (PECS) थेरपी : ही पद्धती म्हणजे एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम. या पद्धतीत चित्रांच्या साहाय्याने मुलांना शिकवले जाते. 
म्युझिक थेरपी : या थेरपीमध्ये ऑटिस्टिक मुलांमधील अक्रियाशीलता कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या संगीताच्या आधारे मुलांना उपचार दिले जातात. 
स्पीच थेरपी : या थेरपीत ग्रहण करण्याची भाषा आणि व्यक्त होण्याची भाषा यावर काम केले जाते. 
बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन : या प्रकारच्या थेरपीत फिजिओथेरपीचा समावेश असतो. याशिवाय लाइफ थेरपी नावाचाही एक थेरपी प्रकार असतो. या आणि अशा प्रकारच्या अनेक थेरपीच्या माध्यमातून येथील मुलांवर हसत-खेळत उपचार केले जातात. 

संस्थेसमोर सध्या सर्वात महत्त्वाची आणि मोठी समस्या आहे, ती आहे जागेची. सध्या संस्थेकडे स्वतःची अशी जागा नाही. भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बंगल्यात सध्या संस्था चालवली जाते. संस्थेसाठी कोणी दानशूर व्यक्तीनं जागा उपलब्ध करून दिल्यास या मुलांसाठी भविष्यात निवासी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. साधारणतः २० हजार स्क्वेअर फुटांपासून एक एकरपर्यंत जागा उपलब्ध झाल्यास, त्यावर उत्तम आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी एक शाळा उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. 

संपर्क :
अंबिका टाकळकर, आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन्स, औरंगाबाद
मोबाइल : ८२७५२ ८४१७८
ई-मेल : aarambhautismcenter@gmail.com
वेबसाइट : www.aarambhtrust.com

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search