Next
अवकाशातील महासत्ता बनण्याच्या भारताच्या स्वप्नाला ‘शक्ति’पंख
उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; अशी क्षमता असलेला भारत हा चौथा देश
BOI
Wednesday, March 27, 2019 | 01:12 PM
15 1 0
Share this article:

प्रातिनिधिक चित्र (स्रोत : विकिपीडिया)

नवी दिल्ली :
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने आता ‘स्पेस सुपरपॉवर’ (अवकाशातील महासत्ता) बनण्याचा मान मिळवला आहे. भारताने विकसित केलेल्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे. अशी क्षमता असलेला अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत हा जगातील केवळ चौथा देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला दुपारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामगिरीची माहिती दिली आणि त्यांचे कौतुक केले.
 
पृथ्वीजवळच्या कमी उंचीच्या कक्षेतील (लो अर्थ ऑर्बिट) उपग्रहाचे लक्ष्य भेदण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘मिशन शक्ती’ असे या पूर्वनियोजित चाचणीचे नाव होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात ‘डीआरडीओ’तील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ए-सॅट (अँटी-सॅटेलाइट) या क्षेपणास्त्राने ही कामगिरी केवळ तीन मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. 

ते म्हणाले, ‘या क्षमतेमुळे भारत आता स्पेस सुपरपॉवर (अवकाशातील महासत्ता) बनला असून, अधिक सुरक्षित राष्ट्र म्हणून उदयाला येण्यास यामुळे मदत होणार आहे. देशाची सुरक्षा आणि तांत्रिक प्रगती या दृष्टीने ही कामगिरी म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे. ही चाचणी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा देशाच्या विरोधात घेतलेली नव्हती. तसेच, ही चाचणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघनही करत नाही. राष्ट्र म्हणून आपल्या स्वप्नांच्या पूर्तीच्या दृष्टीने ‘मिशन शक्ती’ हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.’

‘दोन पावले पुढचा विचार करणाऱ्या भारताचे स्वप्न मी पाहतो. त्या दृष्टीने ही महत्त्वाची कामगिरी आहे. मी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक करतो आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो,’ असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. 

अमेरिकेने या तंत्रज्ञानाची चाचणी १९५८मध्ये घेतली होती, तर रशियाने १९६४मध्ये आणि चीनने २००७मध्ये अशा प्रकारची चाचणी घेतली होती. उपग्रह नष्ट करण्यासाठी किंवा निकामी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

‘मिशन शक्ती’बद्दल अधिक माहिती : 
२७ मार्च २०१९ रोजी डीआरडीओतर्फे ही चाचणी घेण्यात आली. ओडिशातील बालासोर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरील प्रक्षेपण तळावरून ११ वाजून १६ मिनिटांनी क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्यात बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स इंटरसेप्टरचा वापर करण्यात आला. लक्ष्य करण्यात आलेला उपग्रह भारताचाच होता. त्याचे कार्य संपल्यानंतर त्याला सेवेतून निवृत्त करण्यात आले होते. तो उपग्रह पृथ्वीपासून ३०० किलोमीटरच्या कक्षेत फिरत होता. क्षेपणास्त्र डागल्यानंतर लक्ष्यभेद होईपर्यंत लागलेला कालावधी केवळ तीन मिनिटांचा होता. या चाचणीवेळी ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी बालासोरमध्ये उपस्थित होते. 

लो अर्थ ऑर्बिट अर्थात पृथ्वीपासून कमी उंचीवरील उपग्रह नष्ट करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. कमी उंचीवरील उपग्रह हे सर्वसाधारणपणे दळणवळणासाठी (टेलिकम्युनिकेशन आणि डेटा कम्युनिकेशन) कार्यरत असतात आणि पृथ्वीपासून जास्तीत जास्त दोन हजार किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत फिरत असतात. दुर्गम भागात सेवा देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हे उपग्रह हेरगिरीसाठीही वापरले जातात. हे उपग्रह अत्यंत वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतात आणि पृथ्वीच्या तुलनेत विचार करता एका जागी स्थिर नसतात. त्यामुळे त्यांचा भेद करण्यासाठी अत्यंत अचूक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते.

अवकाशातील कचरा कमी करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.

(पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pravin p.shah About 144 Days ago
I am very much proud that i am indian...going ahed with self confidence
0
0
विद्याधर खांडेकर About 144 Days ago
सर्व शास्रज्ञांचे ,संबधीत ईतर कर्मचारी वर्गाचे मनापासुन अभिनंदन.देशवासियांना आनंद देणारी,अभिमान वाटणारी घटना आहे .जय भारतमाता.
0
0

Select Language
Share Link
 
Search