Next
शेअर बाजारात तेजीचाच कल
BOI
Sunday, September 29, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा, परदेशी गुंतवणूकदारांचा अनुकूल प्रतिसाद आणि पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे ग्रामीण भागातही अर्थव्यवस्था सुधारत असल्याने शेअर बाजारात तेजीचाच कल कायम राहण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, त्याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन... ‘समृद्धीची वाट’ या सदरात... 
...... 
गेल्या आठवड्यात शेअर बाजार अनेक कारणांनी सुधारला होता आणि अनेक शेअर्सचा भाव वधारला होता. शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३८ हजार ८२२ अंकांवर बंद झाला. आठवडाभरात त्याने ३९ हजार २०० अंकांची पातळी ओलांडली होती, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११ हजार ५१२ अंकांवर बंद झाला. त्यानेही आठवडाभरात १२ हजारची पातळी गाठली होती. 

बजाज फायनान्सचा शेअर चार हजार ८४ रुपयांपर्यंत वाढला होता. लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकच्या शेअरचा भाव  एक हजार ५२० रुपयांवर बंद झाला. मॅक्स फायनान्शिअलच्या शेअरची किंमत ७०० रुपयांच्या आसपास होती, तर एपीएल अपोलोच्या शेअरचा भाव एक हजार ३८० रुपयांवर बंद झाला. स्टरलाईट टेक्नोलॉजीजच्या शेअरचा भाव १६४ रुपयांपर्यंत चढला होता. हा शेअर सध्या घेण्यासारखा आहे. वर्षभरात त्याचा भाव ४० टक्के वाढू शकेल.      
  
एचडीएफसी बँकेच्या शेअरचा भाव सध्या एक हजार २४४ रुपये आहे. आयटीसीचा एक शेअर सध्या २५३ रुपयाला उपलब्ध आहे. वर्षभरात या शेअरचा भाव ३५० रुपयांपर्यंत जाईल. रोज सुमारे पावणे दोन कोटी शेअर्सचे व्यवहार होतात. सध्याच्या भावाला किं/अु गुणोत्तर २४ पट दिसते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी निम्मे उत्पन्न सिगरेट विक्रीमधून येत असले, तरी तिची अनेक पंचतारांकीत हॉटेल्सही आहेत. त्यामुळे सध्या हा शेअर खरेदी करून वर्षभर जरूर ठेवावा. पर्यटनाला सध्या जगभरात चालना असल्यामुळे हॉटेल्सचा धंदा उत्तम वाढत आहे.  मँगेनीज ओअर इंडस्ट्रीज लिमिटेड अर्थात ‘एमओआयएल’च्या शेअरबद्दल एचएसबीसीने खरेदीची शिफारस केली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात कॉर्पोरेट कर कमी केला असल्यामुळे बाजाराला उधाण आले आहे. गेल्या आठवड्यात २०१६ नंतर तीन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचा दौरा केला. टेक्सास येथील ह्युस्टन येथे पन्नास हजार अनिवासी भारतीय व अमेरिकन नागरिकांसमोर त्यांनी भारत कशी एक मोठी अर्थसत्ता होत आहे, याचे विवेचन केले. प्रोटोकॉलला फाटा देऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींना भेटण्यासाठी टेक्सासला गेले होते. येथे भारत-अमेरिका व्यापार वाढीसंबंधी बोलणी झाली. मोदींनी न्यूयॉर्कला काही उद्योगपतींचीही भेट घेतली. भारत पाच  ट्रीलीयन डॉलरच्या उंबरठ्यावर उभा आहे,  असे त्यांनी तिथे सांगितले. 

पुढील सहा महिन्यात केंद्र सरकार ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत काही शेअर्सचे निर्निवेशन करेल. काही रक्कम राष्ट्रीकृत बँकांमध्येही घातली जाईल. भारताची सुधारणारी अर्थव्यवस्था बघून परदेशातील गुंतवणूकदारही भारतीय शेअर बाजाराकडे चांगले आकृष्ट व्हायला लागले आहेत. पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थाही सुधारेल. मॉर्गन स्टॅन्लेच्या अंदाजाप्रमाणे मार्च २०२० पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४५ हजारांवर जावा. त्यामुळे शेअर्स विक्रीची घाई करू नये. 

या पार्श्वभूमीवर जे निवडक शेअर्स घ्यायचे आहेत. त्यात बजाज फायनान्स, स्टरलाईट टेक्नॉलॉजीज, पराग मिल्क, आयटीसी यांचा समावेश जरूर हवा. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक शेअर बाजार या विषयातील तज्ज्ञ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)    
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search