Next
ढगाळ हवामानातही जमिनीवर लक्ष ठेवणाऱ्या उपग्रहाचे ‘इस्रो’कडून यशस्वी प्रक्षेपण
सीमेवर, शेजारी राष्ट्रांवर लक्ष ठेवणे शक्य
BOI
Wednesday, May 22, 2019 | 04:36 PM
15 0 0
Share this article:

‘रिसॅट टू बी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने आपली आणखी एक उपग्रह मोहीम फत्ते केली असून, ‘रिसॅट टू बी’ या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. रडार इमेजिंग मालिकेतील हा उपग्रह असून, २२ मे रोजी पहाटे तो प्रक्षेपित करण्यात आला. कोणत्याही प्रकारच्या हवामानात काम करण्याची या उपग्रहाची क्षमता असून, ढगाळ हवामानातही तो कार्यरत राहू शकणार आहे. त्यामुळे सीमेवर, तसेच शेजारी देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. 


या उपग्रहात इस्रायलच्या अंतराळ उद्योगाने विकसित केलेला एक्स बँड सिंथेटिक अॅपर्चर रडार सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ढगाळ हवामानातदेखील जमिनीवरील तीन फूट आकारापर्यंतच्या कोणत्याही वस्तूंचे फोटो घेणे शक्य आहे. हा सिंथेटिक अॅपर्चर रडार दिवसा आणि रात्रीही अतिशय अचूकपणे काम करू शकतो. या उपग्रहात अॅक्टिव्ह सेन्सर्सदेखील बसवण्यात आले आहेत. 


हा उपग्रह पृथ्वीजवळच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) सोडण्यात आला असून, याद्वारे भारताच्या शेजारी देशांवरही लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकसारख्या कारवायांच्या पुराव्यांदाखल फोटोही घेणेही शक्य होणार असून, खराब हवामानातही भारताला देशाच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार आहे. सीमेवर उभारण्यात आलेले बंकर आणि सैन्याच्या चौक्या ओळखण्याचे आणि त्यांची संख्या मोजण्याचे काम या उपग्रहाच्या साह्याने करता येणार आहे. शेती, वनक्षेत्रासह पूर, वादळ अशा आपत्कालीन परिस्थितीतही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान मोजक्याच देशांकडे आहे. 

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रिसॅट-टू बी या उपग्रहाच्या प्रक्षेपणाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मालिकेतील रिसॅट-टू हा उपग्रह २६ एप्रिल २००९ रोजी प्रक्षेपित करण्यात आला होता. त्यात प्रथमच एक्स बँड सिंथेटिक अॅपर्चर रडार सेन्सरचा वापर करण्यात आला होता. २०१२मध्ये ‘इस्रो’ने संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली रडार इमेजिंग यंत्रणा असलेला रिसॅट-वन हा उपग्रह अंतराळात सोडला होता. या सर्व उपग्रहांचे आयुष्य पाच वर्षांचे आहे. 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून २२ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता, पीएसएलव्ही-सी ४६ या प्रक्षेपकाद्वारे ६१५ किलो वजनाच्या रिसॅट-टू बी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही-सी ४६चे हे ४८वे प्रक्षेपण होते.  

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन
‘प्रक्षेपणानंतर १५ मिनिटांच्या कालावधीत हा उपग्रह पृथ्वीच्या ५५५ किलोमीटर अंतरावरील कक्षेत स्थिर करण्यात आला,’ अशी माहिती ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली.  

‘या मोहिमेत भारतातील सेमी कंडक्टर लॅबने तयार केलेला विक्रम प्रोसेसर आणि कमी खर्चात विकसित करण्यात आलेली दिशादर्शक यंत्रणा वापरण्यात आली आहे,’ असेही सिवन यांनी सांगितले. 

‘भविष्यातील सर्व मोहिमांमध्ये विक्रम प्रोसेसरचाच वापर करण्यात येणार आहे,’ असे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी सांगितले. 

या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता अशा प्रकारचे टेहळणीसाठी उपयुक्त असलेले उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search