Next
सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांक
निफ्टी ११ हजार ८०० जवळ, तर सेन्सेक्स ३९ हजार २७६वर.
BOI
Tuesday, April 16, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : नऊ सत्रांनंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने दिवसभरात ३९ हजार ३६४चा टप्पा गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ११ हजार ८१० पर्यंत झेप घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स ३७० अंकांनी वधारून ३९ हजार २६४ वर बंद झाला, तर निफ्टी ९७ अंकांनी वधारून ११ हजार ७८७ अंकांवर पोहोचला. 

निफ्टीने दिवसभरात ११ हजार ८०० ची पातळी ओलांडली, मात्र दिवसअखेर तो ही पातळी कायम राखू शकला नाही. आता निफ्टी लवकरच १२ हजारांची पातळी गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, भारताचा निर्यात व्यापारातील विक्रम, मान्सूनचा चांगला अंदाज, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीवर भर, जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेत या सगळ्या अनुकूल बाबींमुळे निर्देशांकांनी उसळी घेतली. 

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी तब्बल ७१३.२२ कोटी शेअर बाजारात गुंतवले होते, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ५८१.३६ कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली. सध्या आयटी कंपन्यांचे आर्थिक निकाल जाहीर होत असून, चांगला लाभांश मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा अंदाज वर्तवताना ९६ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत केले आहे, त्यामुळेही बाजारातील तेजीला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर निर्यातीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे आगामी काळात व्यवसायांच्या प्रगतीची संधी आहे. या सर्व अनुकूल बाबींमुळे शेअर बाजाराने जोरदार उसळी घेतली आणि विक्रमी उच्चांक नोंदवले, असे तज्ञांचे म्हणणे आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search