Next
शंभरीतही सक्रिय असणारे खताळदादा
BOI
Monday, March 26, 2018 | 02:38 PM
15 0 0
Share this article:


पुणे : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या राज्याच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचे साक्षीदार आणि राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ-पाटील (दादा) आज शंभराव्या वर्षात पदार्षण करत आहेत. शंभरीत पदार्पण करणाऱ्या खताळदादांचे आयुष्य परिपूर्ण, अनुभवसमृद्ध आहे... 

महाराष्ट्राचा खराखुरा राजकीय इतिहास लिहीला गेला, त्या प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार, विकासाची दृष्टी, प्रामाणिकपणा, पदाला न्याय देण्याची मनापासून असलेली प्रचंड इच्छाशक्ती असे ठणठणीत व्यक्तिमत्त्व म्हणजे, राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ-पाटील ऊर्फ दादा. 
 
दादांचा जन्म २६ मार्च १९१९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ इथे झाला. गावची पाटीलकी त्यांच्या घराण्याकडे होती, तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण करून, त्यांनी पुढील शिक्षण संगमनेरला पेटिट विद्यालयातून पूर्ण केले. दहावीची परीक्षा पास झाल्यावर त्यांनी बडोद्यातील गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ‘चले जाव’ आंदोलनाने जोर पकडला होता. अत्रे, सरदार पटेल, साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा असलेल्या दादांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी नांदुरखंदरमाळ येथे भूमिगत राहून, गुप्तपणे ब्रिटिशांविरुद्ध जनजागृतीच्या मोहिमाही राबविल्या. चळवळीत काम करता करताच त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. 

निष्णात वकील अशी खताळ-पाटील यांची ख्याती होती. १९४३मध्ये आमदार के. बी. देशमुख यांची कन्या प्रभावती हिच्याशी त्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. १९५२मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून धुळे येथे नियुक्ती झाली; पण काँग्रेस पक्षाचा आदेश आल्याने, त्यांनी ही नोकरी सोडली आणि पक्षकार्यासाठी वाहून घेतले. त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला तेथून सुरुवात झाली. 

खताळ दादांनी २२ वर्षे महाराष्ट्राच्या विधीमंडळात सदस्य म्हणून काम केले. १५ वर्षे मंत्री म्हणून विविध खात्यांचा भार सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले आणि अ. र. अंतुले या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाचे ते साक्षीदार. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोल्हापुरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्यातील चासकमान आदी धरणांची पायाभरणी केली. 

त्या काळी शेतकऱ्यांवर इन्कमटॅक्स लागू करण्याचा केंद्रसरकारचा विचार होता. केंद्राची बैठक फक्त मुख्यमंत्र्यांची होती; पण मुख्यमंत्री नसले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आस्था असल्यामुळे खताळदादांनी या धोरणाला विरोध केला. नुसता विरोध करून ते थांबले नाहीत, तर या धोरणाला त्यांनी पर्याय सुचवला. गावाच्या तलाठ्याकडे पिकांची नोंद करून, त्यानुसार शेतसारा भरण्याचा पर्याय त्यांनी दिला. त्याला सर्वानुमते संमती दिली गेली आणि आजही तीच पद्धत राबविली जात आहे. 

इंदिरा गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध असतानाही, गटबाजीच्या राजकारणापासून ते नेहमीच दूर राहिले. त्यामुळे ते उच्च पदापासून अलिप्त राहिले; पण चांगले काम करण्याची इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी अत्युच्च कामे केली. १९८०मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. 

खताळ-पाटील यांना पाच मुलगे, एक मुलगी आणि बारा नातंवडे आहेत. निवृत्तीनंतरचे आयुष्य ते मुला-नातवंडांसोबत सुखात जगत आहेत. शंभराव्या वर्षीदेखील सक्रिय असलेले आपले वडील, राज्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहेत, याचा सार्थ अभिमान त्यांचा मुलगा संजय खताळ आणि सून अनिता खताळ यांना आहे.  

राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी वाचन, चिंतन आणि लेखन यात लक्ष घातले. ‘अंतरीचे धावे’ हे त्यांचे पहिले पुस्तक याच लेखनावर आधारित आहे. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी सुरू केलेला हा लेखन प्रवास आज वयाच्या शंभराव्या वर्षीही सुरू आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘धिंड लोकशाहीची’, ‘गुलामगिरी’ या पुस्तकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आज गांधीजी असते तर...’ आणि ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ ही त्यांची पुस्तके गेल्या वर्षी प्रकाशित झाली. 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ८०व्या दशकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्राच्या राजकारणातील, समाजकारणातील अनेक स्थित्यंतरे खताळदादांनी अनुभवली आहेत. कृतार्थ आयुष्य जगलेल्या, शंभरीत पदार्पण करणाऱ्या खताळदादांच्या अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम २६ मार्च रोजी पुण्यात होणार आहे. पुण्यातील ‘आदिशक्ती फाउंडेशन’ आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बी. जे. खताळ शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा समिती’ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खताळ दादांचा भव्य सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असणार आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेचार वाजता हा सोहळा होणार आहे.

(खताळदादांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search