Next
साताऱ्याचा नीलेश लोखंडे हिंदुगर्जना चषकाचा मानकरी
महिलांमध्ये रेश्मा मानेची बाजी, हृषीकेश सावंत कुमार गटाचा विजेता
BOI
Tuesday, February 19, 2019 | 11:41 AM
15 0 0
Share this article:पुणे : हिंदुगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळ यांच्यातर्फे आयोजित हिंदुगर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साताऱ्याच्या नीलेश लोखंडे याने गुणांच्या जोरावर नाशिकच्या हर्षद सदगीर याचा पराभव करून मानाची चांदीची गदा पटकाविली. या स्पर्धेच्या कुमार गटात हृषीकेश सावंत याने विजेतेपदाची कुस्ती जिंकून चांदीच्या गदेचा मान मिळविला, तर महिलांच्या गटात कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने दौंडच्या मनीषा दिवेकर हिला धूळ चारून मोठ्या दिमाखात विजेतेपद पटकावले.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नगरसेवक धीरज घाटे यांच्या पुढाकारातून १५ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पुण्यातील बाबुराव सणस क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाली. यंदाचे स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. या वर्षी प्रथमच महिला गटाचाही या स्पर्धेत समावेश केला होता. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

मानाच्या या कुस्ती स्पर्धेत साताऱ्याच्या नीलेश लोखंडेने नाशिकच्या हर्षद सदगीचा दोन विरुद्ध एक असा गुणांच्या आधारे पराभव करून बाजी मारली. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते त्याला मानाची चांदीची गदा, बुलेट, दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह दैऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी झी कुस्ती दंगलमधील विजेत्या यशवंत सातारा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम जाधव आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. उपविजेत्या हर्षद सदगीरला एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांकावर राहिलेल्या पुण्याच्या हर्षद कोकाटे याला पन्नास हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात आले.

हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेच्या कुमार गटात हवेलीचा हृषी केश सावंत विजेता ठरला. त्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते चांदीची गदा, पंचवीस हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि उपविजेत्या वेल्ह्याच्या रितेश धरपाळे याला दहा हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित कऱण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या देवांग चिंचवडे याला पाच हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यंदा प्रथमच या स्पर्धेत महिलांचे सामनेही घेण्यात आले. महिलांच्या खुल्या गटात कोल्हापूरच्या रेश्मा माने हिने दौंडच्या मनीषा दिवेकर हिला चीतपट करताना विजेतेपद राखले. मानाची चांदीची गदा, एक लाख रुपयांचा धनादेश, अक्टिव्हा गाडी आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देऊन रेश्माचा सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) नीलम श्रीरंग जाधव, कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी, मनिषा घाटे, सरस्वती शेंडगे आणि स्मिता वस्ते आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. उपविजेत्या मनीषा दिवेकरला ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय स्थानावरील साक्षी शेलार हिला २५ हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातून ५००हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. फेसबुक पेज आणि यू-ट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाइव्ह प्रक्षेपित करण्यात आली. जगभरातील कुस्तीप्रेमींनी त्याचा आनंद लुटला. खासदार अमर साबळे, पुण्यातील आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवक, महापालिकेतील मान्यवर अधिकारी आदी मान्यवरांनी या स्पर्धेला आवर्जून हजेरी लावली.खिलाडूवृत्तीचे दर्शन
अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीमध्ये नाशिकचा हर्षद सदगीर अवघ्या एका गुणाने पराभूत झाला. त्याने चांगली लढत दिली; पण नीलेश लोखंडे याने ताकद आणि दमसास यांच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. नीलेशने सामना जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली, तर हर्षदने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या हर्षद सदगीर याने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवित विजेत्या नीलेश लोखंडे याला खाद्यांवर घेतले आणि आखाड्यामध्ये फेरी मारली. हर्षदच्या या कृतीमुळे प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत हर्षदचे कौतुक केले.

सर्व ‘केसरी’ एकाच व्यासपीठावर
महाराष्ट्रातील आजी-माजी हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी यांनी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली आणि पैलवानांना प्रोत्साहन दिले. विद्यमान महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख याने उद्घाटनाच्या दिवशीच हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेला उपस्थिती लावून सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद, हिंदकेसरी आणि भारत केसरी दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी विनोद चौगुले, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, डबल महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी नामदेवराव मुळे, महाराष्ट्र केसरी शिवाजीराव पाचपुते, महाराष्ट्र केसरी बाप्पू लोखंडे, महाराष्ट्र केसरी रामा माने, महाराष्ट्र केसरी संभाजीराव पाटील, वस्ताद बाबाराजे महाडिक आदी ज्येष्ठ-श्रेष्ठ पैलवानांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थिती लावली. या सर्व हिंद आणि महाराष्ट्र केसरींचा पुण्याचे पालकमंत्री बापट आणि खासदार शिरोळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानाची तलवार देऊन गौरव करण्यात आला.

कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असा :
१४ वर्षांखालील (मुले) : ३२ किलो - ओंकार भोते (मावळ), शिवराज पायगुडे (पुणे), प्रीतेश दसवडकर (वेल्हा). ३५ किलो - धनराज शिर्के (वेल्हा), संकेत चिकणे (मावळ), प्रथमेश कोळपे (बारामती). ३८ किलो - संग्राम दसवडकर (वेल्हा), अमित कुलाळ (शिरुर), आदेश कांबळे (भोर). ४१ किलो - गौरव जावळकर (हवेली), ब्रिजेश यादव (हवेली), सुमीत म्हस्के (पुणे शहर). ४५ किलो - प्रथमेश दसवडकर (वेल्हा), वैष्णव आडकर (मावळ), विनायक शेंडगे (दौंड)

१७ वर्षांखालील (मुले) : ४९ किलो - रितेश मुळीक (पुरंदर), प्रथमेश तावरे (बारामती), विष्णू नगरे (दौंड). ५४ किलो - विपुल थोरात (इंदापूर), श्वेत खोपडे (भोर), प्रतीक येवले (मावळ). ६१ किलो - पार्थ कंधारे (मुळशी), शिवाजी वाकळे (मुळशी), तनिष्क कदम (हवेली).

खुला गट : कुमार गटाचा विजेता  - हृषीकेश सावंत (हवेली), रितेश धरपाळे (वेल्हा), देवांग चिंचवडे. वरिष्ठ गट (पुरुष) : ५७ किलो - किरण शिंदे (बारामती), आदित्य शिळीमकर (भोर), प्रवीण हरणावळ (इंदापूर). ६१ किलो- निखील कदम (दौंड), रावसाहेब घोरपडे (इंदापूर), भालचंद्र कुंभार (हवेली). ६५ किलो - सूरज कोकाटे (पुणे), तुकाराम शितोळे (हवेली), योगेश्वर तापकीर (पिंपरी-चिंचवड). ७० किलो - शुभम थोरात (हवेली), अरुण खेंगले (खेड), आबा शेंडगे (शिरूर). ७४ किलो - बाबू डोंबाळे (इंदापूर), अक्षय चोरघे (पुणे), दिनेश मोकाशी (बारामती).

खुला गट : हिंदुगर्जना चषकाचा मानकरी - नीलेश लोखंडे (सातारा), हर्षद सदगीर (नाशिक), हर्षद कोकाटे (पुणे).

महिला गट : ५३ किलो- शैला धुमाळ (शिरूर), अंकिता नाईक (पुणे), श्वेता भंडारकोटे (पुणे). ५७ किलो - अक्षदा वाळुंज (मावळ), रेश्मा धुमाळ (शिरूर), यशश्री खेडेकर (पुरंदर). ६८ किलो - सोनल सोनावणे (पुणे), अक्सा शेख (पुणे), प्रतीक्षा सुतार (मुळशी). खुला गट - रेश्मा माने (कोल्हापूर), मनीषा दिवेकर (दौंड), साक्षी शेलार (पुणे).
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search