
ठाणे : सण-उत्सवांच्या काळात विविध मंदिरांच्या बाहेर कमळाची फुले विक्रीला आलेली दिसतात; मात्र कमळाची फुले म्हणून आपण विकत घेत असलेली ही फुले प्रत्यक्षात कमळासारख्या दिसणाऱ्या वॉटर लिलीची अर्थात निम्फियाची असतात.
कमळाचे फूल वॉटर लिलीच्या फुलापेक्षा मोठे असून, त्याच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा फुगीर भाग असतो आणि त्याच्या देठाचा रंग लालसर नारिंगी असतो. यावरून कमळाचे फूल ओळखता येते. वॉटर लिलीच्या फुलांचा देठ हिरव्या रंगाचा असतो.

भारत आणि व्हिएतनाम या देशांचे राष्ट्रीय फूल म्हणून ओळख असणाऱ्या कमळाचे भारतीय संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. विशेष करून नवरात्रौत्सवात देवीच्या पूजेला कमलपुष्पे वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे मंदिरात देवीच्या दर्शनाला जाता कमळाची फुले भाविकांकडून घेतली जातात; मात्र देवीच्या देवळांबाहेर जी फुले कमळाची म्हणून विकली जातात, ती बहुतांश ठिकाणी कमळाची नव्हे, तर वॉटर लिलीची असतात, असे ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी सांगितले.
वॉटर लिली आणि कमळ या दोन्ही वनस्पती पाणथळ भागात, चिखलात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. वॉटर लिलीची पाने पाण्याच्या पृष्ठभागाला चिकटलेली असतात, तर कमळाची पाने पाण्याच्या वरच्या बाजूने पसरलेली असल्याने त्यांचा देठ दिसतो. वॉटर लिलीच्या फुलापेक्षा कमलपुष्पाच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असतात. मध्यभागी पिवळसर भाग असतो. आयुर्वेदानुसार कमळ औषधासाठी बहुगुणी आहे. होमहवनासाठी कमळाच्या बियांचा वापर केला जातो, तर कंद खाण्यासाठी वापरतात. कमळाचे शास्त्रीय नाव Nelumbo nucifera (नेलुम्बो न्यूसिफेरा) असे आहे, तर वॉटर लिलीचे शास्त्रीय नाव Nymphea species असे आहे.
वॉटर लिलीच्या फुलांचा देठ हिरव्या रंगाचा असून, कमळाचा देठ लालसर नारिंगी रंगाचा दिसतो. सूर्य जसा माथ्यावर येतो, तसे कमळाचे फूल उमलत जाते, तर वॉटर लिलीचे फूल एकदा उमलले की पाण्यात दोन आठवड्यांपर्यंतटिकते. कमळाचे फूल अवघे चार ते पाच दिवस पाण्यात राहते. कमळाचे सर्वाधिक परागसिंचन भुंग्याच्या माध्यमातून होत असल्याचे डॉ. टेकाळे म्हणाले.

भारतात लाल कमळ आणि उपल्या कमळ या कमळाच्या दोन प्रमुख जाती आहेत. उष्ण भागातील गोड्या, उथळ पाण्यात लाल कमळांची वाढ होते. लाल कमळाची पाने गुळगुळीत देठाची असतात. लाल रंगाची फुले सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पाने वर्तुळाकार असून, पानाच्या खालच्या बाजूला ठिपके असतात. या जातीतील फुले जांभळी, फिकट निळी, पांढरी, गुलाबी रंगाची असून मंद सुवासाची असतात. वॉटर लिली अनेक रंगांत उपलब्ध असते. मुंबई, ठाण्यात नवी मुंबई आणि गुजरातमधून कमळाची फुले विक्रीसाठी येतात.