Next
‘सोमनाथ शिबिरामुळे झाले श्रमाचे आणि विचारांचे संस्कार’
प्रेस रिलीज
Monday, May 29, 2017 | 06:29 PM
15 0 0
Share this article:

ठाणे :  युवा पिढीच्या शक्तीला नवनिर्मितीच्या वाटा उपलब्ध करून देण्यासाठी बाबा आमटे यानी १९६४मध्ये ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ ही संकल्पना समाजात सादर केली. १९६७मध्ये मे महिन्यात पहिल्या श्रमसंस्कार छावणीची सुरुवात बाबांनी ‘सोमनाथ’मध्ये केली. त्याला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. या छावणीत देशभरातील ५०० युवकांचा सहभाग होता. त्यात ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळातर्फे (व्हीएसएम) २३ विद्यार्थी सहभागी झाले  होते. यंदाही ‘व्हीएसएम’च्या माध्यमातून अनेक युवक सोमनाथ शिबिरात सहभागी झाले होते. १५ मे २२ मे या कालावधीत हे शिबिर झाले. या शिबिरात कविता पडवळ यांनी सर्व मुलींची जबाबदारी सांभाळली.

संस्थेतर्फे या शिबिराबद्दल माहिती देण्यात आली. १५ मे रोजी डॉ. विकास आमटेंनी ध्वजारोहण करून शिबिराचे उद्घाटन केले. ‘इतक्या उन्हात आपली कामे, सहलीला जाणे टाळून ५०० जण इथे आलात. त्यामुळे तुम्ही ‘स्पेशल’ आहात. ही छावणी तुम्हाला समाजजीवनाची वाट शिकवेल,’ असा विश्वास डॉ. आमटे यांनी व्यक्त केला. रोज सकाळी चार वाजता उठून पाच वाजता स्फूर्तिगीताच्या गजरात हे शिबिरार्थी श्रमदानासाठी बाहेर पडत. सकाळी साडेनऊपर्यंत रणरणत्या उन्हात शेताच्या बांधावर मातीकाम, खोदकाम करताना एका श्रमिकाला मातीत उतरून किती कष्ट पडतात याच प्रत्यक्ष अनुभव शिबिरार्थींनी घेतला. धरणावर जाण्यासाठी बांधलेला टायरचा बंधारा बांधण्यासाठी विकास आमटे व आनंदवन कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आणि कौतुकही केले.

दुपारी तापमान ४७ अंश असले तरी दुपारी अडीच ते सहा वाजण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या वक्त्यांची प्रभावी भाषणे झाली. आनंदवनचा विकास करणारे विकास आमटे व कौस्तुभ आमटेंनी पहिल्या दिवशी ‘आनंदवन’चा प्रवास रेखाटला. प्रत्येक दिवसाचे सत्र शिबिरार्थींना नवनवीन प्रेरणा देऊन जात होते. एकीकडे शारीरिक श्रमाचा आनंद आणि दुसरीकडे मानसिक ज्ञानाचा आनंद त्यांना मिळत होता. शिबिरार्थींनी रक्तदानही केले. वीस मे रोजी स्वरानंदवन या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला. सर्व शिबिरार्थी त्या अंध आणि मूकबधिर कलाकारांच्या तालावर सुरात नाचू-गाऊ लागली होती. वृक्षदिंडीने २२ मे रोजी शिबिराचा समारोप झाला.

‘या श्रमदानातील विविध सत्रांनी, अनुभवांनी श्रमाबरोबर वैचारिक संस्कारही व्हायचे. समाजकार्याचा ज्ञानसागर असलेले  आनंदवन अन् भरभरून अमृतरूपी ज्ञान देणारे डॉ.  विकास आमटे यांचे बहुमोल मार्गदर्शन छावणीत समाजसेवेचे धडे गिरवण्यास कारण ठरले. श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांचे अलौकिक कार्य, आनंदवनाचा प्रवास व त्यागाच्या भूमीतील हे शिबिर तरुणाईसाठी समाजभान जागवणारे ठरले,’ अशी भावना टीमलीडर आणि ‘व्हीएसएम’चा माजी विद्यार्थी किशोर प्रकाश याने व्यक्त केली.

‘या आठ दिवसांत आनंदवन कार्यकर्त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा उलगडा झाला. माणूस म्हणून जगण्याची प्रचंड प्रेरणा मिळाली आणि ‘स्वरानंदवन’च्या विशेष मुलांकडे पाहून नव्याने जगण्याची   प्रेरणा मिळाली,’ असेही त्याने सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kishor About
Special thanks to vsm
0
0
ANIL HAROLIKAR About
Thanks for this excellent press release bringing out essences of Somnath and the participation of VSM Thane students.
0
0

Select Language
Share Link
 
Search