Next
हसू नका, ही केवळ सुरुवात आहे!
BOI
Monday, January 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:‘गुगल मॅप’वर मुंबई, तसेच अन्य ठिकाणच्या इंग्रजी नावांचे सरसकट मराठीकरण करण्यात आले आहे. त्यातील बरेचसे भाषांतर हास्यास्पद आहे आणि त्यात दुरुस्ती करून सरकारने गुगलला ही नावे नीट करण्यास सांगावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे; पण त्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते, ते अधिकाधिक वापर झाल्यावर सुधारत जाणारे आहे. त्यामुळे या अचूकतेसाठी मराठी भाषकांनी स्वतःच सक्रियपणे सहभाग घेणे गरजेचे आहे.
............
गेले काही दिवस व्हॉट्सअॅपवर काही संदेश फिरत आहेत. वर्तमानपत्रांतही बातम्या आल्या आहेत. ‘गुगल मॅप’वर मुंबई, तसेच अन्य ठिकाणच्या इंग्रजी नावांचे सरसकट मराठीकरण करण्यात आले आहे. अनेक इंग्रजी शब्दही मराठी करण्यात आले असून, त्यामुळे हास्यास्पद परिस्थिती निर्माण झाल्याचे या बातम्यांत म्हटले आहे.

‘आयसीआयसीआय बँके’चे ‘ईचीची बँक’, ‘बांद्रा रेक्लमेशन’चे ‘वांद्रे दावा’, ‘बांद्रा सी व्ह्यू’चे ‘वांद्रे समुद्र पाहा’, ‘सिल्व्हर पाम लॉन्स’चे ‘चांदी तळवे लॉन’ अशा अनुवादांची अनेक उदाहरणे यासाठी दाखविण्यात येत आहेत. आता त्यात दुरुस्ती करून सरकारने गुगलला ही नावे नीट करण्यास सांगावे, अशी अपेक्षाही नेहमीप्रमाणे ‘मराठीप्रेमीं’नी व्यक्त केली आहे. 

आता ही नावे पाहिली तर ती हास्यास्पद आहेत, यात वाद नाहीच. प्रथमदर्शनी ती निर्बुद्धच आहेत. प्रश्न हा आहे, की गुगलने असे नावांचे भाषांतर करावे का आणि केले तर त्याकडे लक्ष देण्याचीही जबाबदारी सरकारचीच आहे का? मराठी भाषक म्हणून आपला यात काहीच सहभाग नाही का? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल, तर गुगल हे नेमके कसे करते याचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल.

आजच्या घडीला जगात एक अब्जपेक्षा जास्त लोक ‘गुगल मॅप’ वापरत आहेत. परंतु गुगलची भूकच मोठी. त्यामुळे समाधान नावाची गोष्टच त्याला माहीत नाही. या नकाशांचा वापर अधिकाधिक लोकांनी करावा, यासाठी गुगल त्यांना अधिक स्थानिक बनवित आहे. भारतामध्ये तीन-चार वर्षांपूर्वी गुगलने हिंदीत स्थान दाखवायला सुरुवात केली होती. त्यासाठी गुगल मॅपचे ‘गुगल मानचित्र’ असे नामकरणही झाले. त्यानंतर ‘गुगल मॅप’वरील नकाशा भारतीय भाषांमध्ये असावा, अशी मागणी त्या-त्या भाषक समाजांकडून अनेक वर्षांपासून होत होती. अगदी अलीकडे निवडक शहरांत गुगलने मुळातच द्विभाषक स्थान दाखविणे सुरू केले. 

आता स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्या हातात जे नकाशे आणि त्यांची थट्टा उडविणारे संदेश आले आहेत, त्याच्या मागे ही मागणी होती. अलीकडच्या काळात गुगल मॅप ही नवलाई राहिली नसून, आबालवृद्धांची गरज बनली आहे.  पादचाऱ्यांना रस्ता दाखवणे असो किंवा वाहनांना ‘जीपीएस’मार्फत दिशा दाखवणे असो, गुगल मॅपने आज अक्षरशः सर्वत्र ठाण मांडले आहे. इंटरनेट वापरणारी (म्हणजेच गुगल वापरणारी!) कोणतीही व्यक्ती त्यावर आपले दुकान, घर, इतकेच काय आपण उभे असलेली जागाही निर्देशित करू शकते. अन् मागे याच सदरात म्हटल्याप्रमाणे, भारतातील बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर स्थानिक भाषांचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही, हे गुगलसारख्या ‘स्मार्ट’ कंपनीला कळणारच. 

अस्खलित इंग्रजी न येणाऱ्या भारतातील ८० टक्के इंटरनेट उपयोगकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी ‘गुगल इंडिया’ने वेगवेगळ्या सोयी अनेक वर्षांपासून सादर केल्या आहेत. गुगल भाषांतर आणि गुगल मॅप या दोन सेवा त्यांचाच एक भाग आहेत. अन् कंपनीने काही शहरांमध्ये याच दोन सेवांची सांगड घातली आहे. नवी दिल्ली व मुंबईसारख्या काही शहरांमध्ये ‘गुगल मॅप’च्या अॅपमध्ये सर्व नावे दोन भाषांत दिसण्याची सोय गुगलने केली आहे. खरे तर या सुविधेचे भरभरून स्वागत केले पाहिजे. कारण केवळ जागांच्या नावांचेच नाही, तर या जागांचे जे रिव्ह्यू (समीक्षा) असतील, त्यांचेही भाषांतर करण्याची सोय गुगलने केली आहे. म्हणजे कल्पना करा, की आपण तमिळनाडूत गेलो आहोत आणि तेथील सरवना भवन हे हॉटेल आपल्याला नकाशावर दिसत आहे. केवळ या हॉटेलचे स्थानच नव्हे, तर त्या हॉटेलबद्दल वापरकर्त्यांनी व्यक्त केलेली मतमतांतरेही आपल्याला त्यावर दिसतील. त्यामुळे तेथे जेवावे की नाही, याचा निर्णय घेणे आपल्याला सोपे जाणार आहे. 

आता हे भाषांतर कसे होते? तर यासाठी न्यूट्रल मशीन ट्रान्स्लेशन टेक्नॉलॉजी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर गुगल करते. पूर्वी गुगल वाक्यांश-आधारित प्रणालीवर काम करायचे. न्यूट्रल मशीन ट्रान्लेुगशन टेक्नॉलॉजीत तुकडे करण्याऐवजी एका वेळी पूर्ण वाक्याचे भाषांतर करण्यात येते. या यंत्रणेची खुबी अशी, की जसजसा वापर वाढेल तसतसे तिचे ‘ज्ञान’ वाढते. म्हणजे चुका सुधारतात, योग्य शब्द ती लक्षात ठेवू लागते आणि भाषांतरात अचूकता येते. स्वतः गुगल ट्रान्स्लेट या सुविधेत दिलेले भाषांतर योग्य आहे का नाही, याची खात्री करून देण्याचीही सोय गुगलने केली आहे. एखादा शब्द किंवा वाक्य चुकीचे भाषांतरित झाले असेल, तर तो शब्द किंवा वाक्य दुरुस्त करण्याची सोय आपल्याकडे आहे. त्यासाठी कुठलीही विशिष्ट प्रक्रिया नाही, जागच्या जागी आपण ते सुधारू शकतो. अन् हा सुधारलेला शब्द गुगलची यंत्रणा पुढच्या वापरकर्त्याला दाखवते. (नंतर तो वापरकर्ताही स्वतःच्या संदर्भानुसार तो शब्द योग्य/अयोग्य असल्याचे सांगू शकतो.) 

याचाच अर्थ अधिकाधिक वापर हीच या सेवेतील अचूकतेची गुरुकिल्ली आहे. या चुका घालवायच्या असतील, तर या सेवेचा वापर आपण जास्तीत जास्त करणे आणि या चुका त्वरित दूर करायला लावणे, हाच सर्वांत सोपा उपाय आहे. त्यासाठी सरकार किंवा कोणत्याही त्रयस्थ संस्थेची गरज नाही. हे काम आपल्यालाच करायचे आहे. आपणच गुगल मॅप अधिकाधिक वापरून तेथील चुका दाखवायला पाहिजेत. त्यांची यंत्रणा त्या सूचनांची नोंद घेऊन आपल्या अचूकता आणेलच. तेव्हा यावर इतक्यातच हसण्याची गरज नाही. ही केवळ सुरुवात आहे. भविष्यात आणखी खूप मजल गाठायची आहे. या निर्बुद्ध तंत्रज्ञानाला शहाणे करून सोडण्याची जबाबदारी आपणा सर्व जणांची आहे. 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search