Next
शेळी म्हणजे आदिवासी महिलांची अर्थलक्ष्मी
डॉ. दिलीप धानके यांचे प्रतिपादन
मिलिंद जाधव
Thursday, October 11, 2018 | 10:57 AM
15 0 0
Share this storyशहापूर :
‘महात्मा गांधीजींनी शेळीला गरीबाची गाय म्हटले होते. कारण शेळी हा एक उपयुक्त प्राणी आहे. आता शेळीच्या मांसविक्रीला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. शेळीपालनातून गावांतच रोजगार उपलब्ध होत आहे. म्हणून शेळी ही आदिवासी महिलांची अर्थलक्ष्मी ठरली आहे,’ असे प्रतिपादन किन्हवली पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ. दिलीप धानके यांनी चांदगावमध्ये आयोजित केलेल्या शेळीपालन प्रशिक्षण शिबिरात केले. 

ईशिन अॅग्रो लाइव्हस्टॉक प्रायव्हेट लिमिटेड (ईगल संस्था) व माझगाव डॉक शिपबिल्डर्स या दोन स्वयंसेवी संस्थांनी पालघरच्या शहापूर तालुक्यातील मौजे चांग्याचा पाडा येथे आदिवासी महिलांसाठी नुकतेच एक दिवसाचे शेळीपालन प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी डॉ. धानके प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. जंगलातील उपयुक्त वनस्पती व जंगली झाडे यांचा शेळीच्या आहारात कसा वापर करता येतो, याची माहिती या शिबिरात त्यांनी आदिवासी महिलांना दिली. ते म्हणाले, ‘खेड्यातील स्त्रियाच अधिक बुद्धिमान असतात. त्यांनी मनापासून ठरवले, तर त्या आपल्या व्यवसायातून जगावर राज्य करतील. आमच्या आदिवासी भगिनी पशुसंवर्धनामधील दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन हाच आपला मुख्य उद्योगधंदा मानतील, तेव्हा त्याच आपल्या कुटुंबाच्या मालकीण होतील.’ 

या प्रशिक्षणात आदिवासी महिलांना डॉ. धानके यांनी प्रेरित करून बोलके केले. शेळ्यांमधील जंतनिर्मूलन ते करडांचे संगोपन, गाभण शेळीची काळजी कशी घ्यावी व गावरान कडधान्ये व नैसर्गिक पालापाचोळा यापासून घरच्या घरी तयार केले जाणारे शेळीचे खाद्य अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेळीपालनाची गुरुकिल्ली आदिवासी महिलांना आपल्या प्रभावी आणि बोलीभाषेतील भाषणातून दिली. 

या शिबिरात डॉ. अविनाश कराटे यांनीसुद्धा संवाद साधला. या वेळी पशुसंवर्धन विभागाच्या, आदिवासी महिलांसाठी असलेल्या परसातील कुक्कुटपालनाच्या स्वयम् योजनेची, तसेच कुक्कुट पक्षी योजना, नावीन्यपूर्ण योजना आणि जिल्हा परिषदेच्या योजनांचीदेखील माहिती डॉ. दिलीप धानके यांनी प्रशिक्षणार्थींना दिली. 

या वेळी ईगल संस्थेचे प्रकल्प समन्वयक मनोज वाहाणे, समुदाय संघटक सुनील डांगळे, कल्पेश मोरे आदी उपस्थित होते. आदिवासी महिलांसाठी ईगल संस्थेचे हे शेळीपालन प्रशिक्षण शिबिर या संस्थेचे मुख्य संचालक डॉ. नीलरतन शेंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link