Next
‘नाचू अभंगाचे रंगी’मध्ये कीर्तन-अभंगांचा नृत्यमय जयघोष
प्रेस रिलीज
Saturday, October 13, 2018 | 05:00 PM
15 0 0
Share this storyपुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांचा नृत्य-नाट्य आविष्कार असलेल्या ‘नाचू अभंगाचे रंगी’ कार्यक्रमात कीर्तन-अभंगांचा नादमय जयघोष झाला. यात सृजन नृत्यालयाच्या मीनल कुलकर्णी यांनी ज्ञानदेवांचे अभंग आणि जीवनपट उलगडला.

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ५७ वा कार्यक्रम १२ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी पार पडला. ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. कलापिनी (तळेगाव दाभाडे) निर्मित आणि सृजन नृत्यालय प्रस्तुत हा कार्यक्रम ‘विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात झाला.

या कार्यक्रमात ज्ञानदेवांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतचा काळ, अभंगातील अप्रतिम काव्य व त्यांनी सांगितलेला विचार कीर्तनाच्या माध्यमातून नृत्याद्वारे रसिकांसमोर मांडला गेला. अभंग हे नृत्यातून सादर झाले. यामध्ये ‘देवाचिये द्वारी,’ ‘ॐ नमोजी आद्या’, ‘एकतत्व नाम’, ‘पसायदान’ ‘गोविंदाचे गुणी’, ‘नाम प्रल्हाद’ अशा परिचित आणि काही अपरिचित अभंगांचा समावेश होता. कीर्तनकार कीर्तन करत सर्व रचना उलगडतो, अशी संकल्पना होती.  

ज्ञानदेवांनी आपल्या अभंगातून आणि मुख्यतः पसायदानातून मांडलेली रूपके उलगडण्यासाठी व यातून घडणारे कवी ज्ञानदेवांचे दर्शन अधिकाधिक सुस्पष्ट होण्यासाठी या नृत्य-नाट्यात अनेक समूह रचना, विविध आकृतीबंध यांचा वापर केला होता, ज्यातून त्यांचा विचार दृश्य रूपाने सर्वांसमोर साकार झाला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानदेवांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य होते. ज्ञानदेवांच्या अभंगावरील नृत्यरचना व त्याबरोबरच त्यांचा जीवनपट उलगडणारे नाट्यपूर्ण प्रसंग या नृत्यनाट्याद्वारे मीनल यांनी सादर केले. या नृत्य-नाट्यात ज्ञानदेवांची ‘शब्दकळा’ हे रूपक वापरले होते. ही ‘शब्दकळा’ ज्ञानदेवांचे विचार व प्रामुख्याने भावना आपल्या नृत्याविष्कारातून व्यक्त करते. आकृतीबंध, तसेच नाट्यपूर्ण प्रसंग अधिक खुलविण्यासाठी अनुकूल प्रकाशयोजना व सुयोग्य पार्श्वसंगीताचाही वापर करण्यात आला.

कार्यक्रमाची संकल्पना लेखन, दिग्दर्शन आणि नृत्यरचना मीनल यांची होती. संगीत दिग्दर्शन विनायक लिमये, नेपथ्य आणि प्रकाशयोजना केदार अभ्यंकर यांची होती. या वेळी डॉ. अरविंद परांजपे, श्री. शुक्ल उपस्थित होते.

‘मीनल या सृजन नृत्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी गुरु स्वाती दैठणकर यांच्याकडून शिक्षण घेऊन ‘भरतनाट्यम अलंकार’ पदवी प्राप्त केली आहे. १९९५ मध्ये सृजन नृत्यालय भरतनाट्यम डान्स अॅकॅडमीची सुरुवात झाली. या संस्थेला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत,’ अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sandeep pandav About 127 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link