Next
‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटक हे माध्यम महत्त्वाचं’
BOI
Tuesday, March 20, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this story

विभावरी देशपांडे‘मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटक हे माध्यम खूप महत्त्वाचं आहे; पण आपल्याकडे बालरंगभूमी दुर्लक्षित आहे. मुलांसाठी लिहिणं हा इतर सामान्य लेखनापेक्षाही अवघड प्रकार आहे. याची जाणीव होईल, तेव्हा बालरंगभूमी हा विषय आपल्याकडे गांभीर्याने घेतला जाईल,’ असं बालरंगभूमी क्षेत्रात सुमारे २० वर्षं अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध भूमिका निभावत असलेल्या विभावरी देशपांडे यांना वाटतं. आजच्या (२० मार्च) जागतिक बालरंगभूमी दिनानिमित्त मानसी मगरे यांनी घेतलेली त्यांची ही विशेष मुलाखत...
..................
- बालरंगभूमी हा विषय कोणत्या दृष्टिकोनातून तुम्हाला औत्सुक्याचा वाटला?
- नाटक हा विषय लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात होता. माझ्या सुदैवाने मी वयाच्या सातव्या वर्षी ‘ग्रिप्स’चं ‘छान छोटे वाईट मोठे’ हे नाटक बघितलं. मग ‘परीची गोष्ट’, ‘भुताची गोष्ट’पासून ते ‘दुर्गा झाली गौरी’पर्यंतची सर्व स्तरांवरची बालनाट्यं मला पाहायला मिळाली. परंतु जेव्हा मी ‘छान छोटे वाईट मोठे’ पाहिलं, तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्यातल्या छोट्या मुलाला एक सकस आणि उत्तम मनोरंजन मिळालं. ‘ग्रिप्स’ची नाटकं बघत बघतच मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे लहान मुलांसाठी उत्तम आणि कसदार मनोरंजन ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, याबद्दलचा माझ्या मनातला विश्वास दृढ होत गेला. 
ग्रिप्स थिएटर
दुर्दैवाने आपल्याकडे ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेबद्दल खूपच वैचारिक अस्पष्टता आहे. म्हणजे ‘थिएटर फॉर चिल्ड्रन’ आणि ‘थिएटर विथ चिल्ड्रन’ या दोन्हीत गोंधळ आहेच. लहान मुलांनी नाटकात काम करणं म्हणजे बालरंगभूमी नाही. अर्थात रंगभूमीवर लहान मुलांनी काम केल्याने त्यांच्यातला आत्मविश्वास वाढेल, कलागुणांना वाव मिळेल हे सगळं मान्य. परंतु बऱ्याचदा अशी मुलं सहभागी असलेली नाटकंही मोठ्यांचे विषय घेऊन केलेली असतात. भूत, पऱ्या, कार्टून्स यांवर आधारित ‘फॅन्टसी’वजा नाटकं असतात, ती मुलांचं मनोरंजन करतात, परंतु ती त्यांच्या जगण्याशी निगडित नसतात. लहान मुलांना घेऊन केलेलं म्हणजे बालनाट्य असाच समज आपल्याकडे आहे; पण ते ‘थिएटर विथ चिल्ड्रन’ आहे. ‘थिएटर फॉर चिल्ड्रन’ हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ‘थिएटर’ हे खूप मोठं माध्यम आहे, मुलांच्या मनोरंजनाचं आणि काही नीतिमूल्यं त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचंही. थोडक्यात, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाटक हे माध्यम खूप महत्त्वाचं आहे. असं असलं, तरी आपल्याकडे तेवढ्या सजगतेने किंवा सतर्कतेने बालरंगभूमीचा विचार केला जात नाही. त्यात एक खूप मोठा अनुशेष आहे. हे थोड्या फार प्रमाणात कळायला लागल्यानंतर साधारण १७-१८ वर्षांची असल्यापासून ‘ग्रिप्स’च्या नाटकांत काम करण्याकडे माझा ओढा होता. नाटकांमधून कामं करत करत मग पुढे लेखन-दिग्दर्शन यामध्येही मी उतरले आणि आजही ते काम सुरू आहे. 

श्रीरंग गोडबोले- मुंबईत रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर यांच्यासारख्यांनी बालरंगभूमी क्षेत्रात काम केलेलं आहे. पुण्यात तुम्ही आणि श्रीरंग गोडबोले हे काम गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहात. पुण्यातील प्रतिसाद कसा आहे? 
- पुण्यात गेल्या २० वर्षांपासून फारच अप्रतिम पद्धतीने ही चळवळ सुरू आहे, हे आपण पाहतच आहोत. जवळजवळ २० नाटकं आम्ही केली आहेत. आमचं हे काम पूर्णपणे प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. त्यातून कोणताही आर्थिक मोबदला अपेक्षित नाही. एक पॅशन, निर्मितीतला आनंद आणि याहीपेक्षा मुलांना यातून मिळणारं जे काही आहे ते, हाच आनंद केवळ अपेक्षित असतो याच प्रेरणेतून इतकी वर्षं आम्ही हे काम करत आहोत. दुर्दैवानं आपल्याकडे बालरंगभूमीकडे दुय्यम दर्जाने पाहिलं जातं. म्हणजे मी जवळजवळ १० नाटकं लिहिली, तरीही मला विचारलं जात होतं, की तू गांभीर्याने (सीरियस) नाटक कधी लिहिणारेस. अनेक स्पर्धांमध्ये ‘ग्रिप्स’चं नाटक गृहीतच धरलं जात नाही किंवा मग ‘लक्षवेधी नाटक’ म्हणून एक वेगळा पुरस्कार दिला जातो इतकंच. आजवर आम्ही अनेक आशय-विषय असणारी नाटकं प्रायोगिक तत्त्वावर करत आलो आहोत. काळानुसार मुलांचे विषय, संदर्भ, बदलती सामाजिक स्थिती असे सगळे बदल केले आहेत, करत आहोत. प्रेक्षक, मुलं आणि पालक हे अत्यंत आनंदाने स्वीकारत आले आहेत. परंतु तरीही बालरंगभूमी दुर्लक्षितच राहिली आहे. 

मुलांसाठी नाटक लिहिणं, हे खूप सोपं आहे, असाही एक मोठा गैरसमज आपल्याकडे आहे. खरं पाहता ते अगदीच उलट आहे. मुलांसाठी लिहिणं हा इतर सामान्य लेखनापेक्षाही अवघड प्रकार आहे. ते एक खूप जबाबदारीचं काम असतं. मुलं हा एक उत्तम प्रेक्षकवर्ग असतो. कारण त्यांना जर ते आवडलं, तर ती अगदी भरभरून दाद देतात. परदेशात इतर कोणत्या महाविद्यालयीन प्राध्यापकापेक्षा लहान मुलांच्या शिक्षकांना जास्त पगार असतो. कारण ते लोक जाणतात, की हे खूप अवघड काम आहे. हीच जाणीव, जागरूकता मुलांच्या मनोरंजनाच्या बाबतीतही ते ठेवतात. ती जेव्हा आपल्याकडे येईल, तेव्हा बालरंगभूमी हा विषय आपल्याकडे गांभीर्याने घेतला जाईल, असं वाटतं. असं होईल तेव्हाच अनेक कलाकारांना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांना या क्षेत्राकडे वळण्याची इच्छा होईल. 

- मोठ्यांसाठीच्या नाटकांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची निर्मात्यांची जी मानसिकता आहे, ती बालनाट्याच्या बाबतीत दिसत नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? 
- प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक हे दोन्हीही वेगळे गट आहेत. व्यावसायिक नाटकांचा फोकस व्यावसायिक असतो. प्रायोगिक नाटकांत वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर असतो. सुदैवाने ‘डिस्ने’सारखी संस्था यासाठी चांगल्या प्रकारे पुढाकार घेत आहे. विविध प्रकारच्या कथा, विषय त्यांच्याकडून स्थानिक पातळीवर त्या त्या भाषांमध्ये हाताळले जात आहेत. मराठीत काही संस्था असे काही उपक्रम राबवत आहेत, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. 

- बालनाट्य लिहिताना कोणते विषय विशेष हाताळले गेले आणि कोणत्या विषयांना चांगला प्रतिसाद मिळाला असं वाटतं? 
- विषय तसे सगळेच हाताळले आणि सर्वच नाटकांना खूप प्रतिसाद मिळाला. विशेषतः तुम्ही जेव्हा मुलांच्या रोजच्या जगण्यातले विषय घेऊन नाटक करता, तेव्हा ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ते मूल त्या भूमिकेत स्वतःला ठेवून पाहतं. लहान मूल हेदेखील या समाजाचा एक भाग आहे. अगदी कोणत्याही पातळीवरचे विषय स्वतःच्या पातळीवर आणून ते त्यांचा विचार करतच असतं. त्यामुळे त्याला काय कळतंय किंवा हा त्याचा विषय नाही, असं म्हणून आपण त्याला टाळतो, हे योग्य नाही. आजचं मूल प्रत्येक गोष्टीशी जोडलेलं आहे, त्यामुळे त्याच्या भावविश्वात येणारे सर्वच विषय आम्ही हाताळतो. लहान मुलांच्या बाबतीतली आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यातला प्रत्येक जण कधीतरी लहान असतोच. त्यामुळे ते अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेले असतात. असे विषय हाताळणं यामुळे आणखी सोपं होतं. 

- तुमच्या आई लेखिका आणि तुमच्या आजी तर नाट्यलेखिका होत्या. त्यांच्याकडून तुम्हाला मिळालेल्या वारशाबद्दल काय सांगाल?
- हे सगळंच त्यांच्याकडूनच मिळालेलं आहे. माझ्या आजीला खरं तर मी भेटले नाही. तिचा सहवास मिळाला नाही. परंतु अर्थात तिचे ते जीन्स माझ्यात असणारच. आईला लिहिताना मी नेहमीच पाहत आले. एक आई म्हणून मुलीला काहीतरी मार्गदर्शन करण्यापलीकडे जाऊनही माझ्यात काय आहे, हे आईने लहानपणीच हेरलं होतं आणि त्यानुसार ती मला घडवत होती. प्रत्येक बाबतीत मला तिचा नेहमीच पाठिंबा आणि आधार होता. 

(विभावरी देशपांडे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link