Next
भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर...!
BOI
Thursday, June 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:पुण्यातला डॉ. अभिजित सोनवणे हा तरुण डॉक्टर म्हणजे अवलिया आहे. आठवड्यातले सहा दिवस तो विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातो; पण त्याचा देव प्रार्थनास्थळात नसून, तिथे बाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांमध्ये आहे. तो तिथे जातो, ते त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी. समाजानं टाकून दिलेल्या माणसांना आपलंसं करून आत्मसन्मान प्राप्त करून देणं, हेच या तरुण डॉक्टरचं ध्येय आहे... त्याची प्रेरक गोष्ट वाचा ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात... वर्षभरापूर्वी म्हणजेच आठ जून २०१७ रोजी सुरू झालेल्या या सदराचा हा २५वा भाग आहे.

......

जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले।

तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा।।

संत तुकारामांच्या ओळी एखाद्याच्या जगण्याचा भाग कशा बनतात, याचं उदाहरण आपल्याला आज पाहायचंय. त्याआधी तुम्हाला तीन गोष्टी सांगायच्यात. 

गोष्ट पहिली.
एक हमाल होता. आपल्या मुलीला खूप शिकवायचं, मोठं करायचं त्या हमालानं ठरवलं. तिला तो ‘चिमणी’ म्हणायचा. चिमणीला त्यानं शाळेत घातलं. स्वतः कष्टाची ओझी वाहत राहिला; पण तिला काही कमी पडू दिलं नाही. त्याची चिमणी सुंदर होती, देखणी होती आणि हुशारही होती. तिनं बापाच्या कष्टांचं चीज केलं. चिमणी बघता बघता इंजिनीअर झाली. आता सुखाचे दिवस येणार, तोच एक अघटित घडलं. त्या हमालाला कुष्ठरोग झाला. बघता बघता त्याच्या हाताची बोटं झडली, त्याचे डोळे गेले, त्याच्या कानांतून पाणी यायला सुरुवात झाली. अशा वेळी त्या चिमणीनं काय करावं? चिमणीनं तिच्याच सोबत शिकत असलेल्या एका तरुणाबरोबर लग्न केलं आणि ती भुर्रकन उडून गेली, थेट अमेरिकेला! तिनं त्या तरुणाला आपल्याला वडील आहेत हेही सांगितलं नाही. तिला आता त्या कुष्ठरोग्याची लाज वाटत होती. हमाल मात्र आपल्या चिमणीची वाट बघत राहायचा. कोणी भेटलं की म्हणायचा, ‘बाबा रे तुझ्याकडे गाडी आहे का? माझ्याकडे थोडे पैसे आहेत. त्याचं डिझेल आपण तुझ्या गाडीत टाकू आणि तिकडे अमेरिकेत जाऊ. तिथे माझी चिमणी आहे. तिला घेऊन परत येऊ.’ त्या दृष्टी गेलेल्या, अवयव झडलेल्या बापाला कोण सांगणार? ‘अरे, अमेरिकेत डिझेल भरलेली गाडी जात नाही. तिथे विमानानं जावं लागतं.’ पण एकानं धीर करून ते सांगितलं. झालं, त्या दिवसापासून तो हमाल दिसत नसतानाही विमानाचा आवाज आला, की वर मान करून आकाशाकडे पाहू लागला. आनंदात, ‘बघा, माझी चिमणी आली’ असं म्हणत हसू लागला. एके दिवशी आकाशाकडे मान वर करूनच त्यानं आपला श्वास सोडला. त्याची चिमणी परत कधीच आली नाही.

का वागतात अशी माणसं?

गोष्ट दुसरी. 

एका वृद्धाला त्याच्या वृद्धत्वामुळे आणि त्याची दृष्टी गेल्यामुळे बायकोनं आणि मुलांनी घराबाहेर काढलं. तो वृद्ध रस्त्यावरून भीक मागत फिरू लागला. बायको, मुलगा, सून, नातवंडं सगळे असतानाही केवळ वृद्धत्व आलं म्हणून रस्त्यावर यायची वेळ त्याच्यावर आली होती. एके दिवशी रस्त्यावरून जात असताना एका गाडीनं त्याला धडक दिली आणि त्या अपघातात त्याचे दोन्ही पाय गेले. आता तो वृद्ध फूटपाथवर पडून राहायला लागला. चालू शकत नव्हता, बघू शकत नव्हता. कोणाला दया येऊन त्याच्या अंगावर फेकलाच एखादा तुकडा, तर खात होता. आपली भूक शमवत होता. त्याचे पाय गेल्यामुळे त्याला या कुशीवरचं त्या कुशीवरून वळणंदेखील अवघड जायचं. संडास, लघवी... सगळं जागेवरच व्हायचं. तो मग कसाबसा कूस वळवायचा अतोनात प्रयत्न करायचा. कधी कधी त्याच्या हाताला पावाचा तुकडा लागायचा. तो खाल्ल्यावर त्याच्या लक्षात यायचं, की पाव समजून जे काही खाल्लं, ती आपलीच वाळलेली विष्ठा होती.
का वागतात अशी माणसं?

गोष्ट तिसरी.

एका वृद्धाला एका कचराकुंडीत एक बाळ सापडलं. अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं ते बाळ कोणीतरी फेकून दिलेलं होतं. बाळ जिवंत होतं. भुकेनं कळवळून रडत होतं. त्या वृद्धानं त्याला छातीशी लावलं. त्याला प्रेम दिलं. आपलंसं केलं. त्या वृद्धाची नजर क्षीण झालेली होती. एकानं माणुसकीच्या नात्यानं त्या वृद्धाचं डोळ्यांचं ऑपरेशन स्वखर्चानं करवलं. आश्चर्य म्हणजे त्या वृद्धाला स्पष्ट दिसायला लागलं. तो वृद्ध त्या माणसाकडे आला आणि म्हणाला, ‘डॉक्टरसाहेब मला दिसायला लागलं. स्पष्ट दिसायला लागलं.’ त्या माणसालाही खूप आनंद झाला. तो म्हणाला, ‘वा, चांगलं झालं बाबा.’ त्यावर तो म्हणाला, डॉक्टरसाहेब, ‘आता मला माझे दोन्ही डोळे काढून हवे आहेत.’ आता आश्चर्य करण्याची पाळी त्या माणसाची होती. तो म्हणाला, ‘अरे, तुला आता चांगलं दिसतंय ना, मग डोळे कशाला काढायचेत?’ त्यावर तो वृद्ध उत्तरला, ‘मी ज्या पोराचा सांभाळ करतोय ना, तो ठार आंधळा आहे बघा. त्या लेकराला हे डोळे देईन म्हणतो. मला काय करायचेत डोळे? त्या पोराचं सगळं आयुष्य जायचंय अजून.’
काय म्हणावं या प्रेमाला?

या गोष्टी सांगायचं कारण म्हणजे या तिन्ही गोष्टींतल्या व्यक्ती रस्त्यावर आलेल्या, भीक मागणाऱ्या होत्या, आहेत. असे अनेक भिकारी आपण रस्त्यानं जाताना बघतो. आपल्यापैकी अनेकांना त्यांची दया येते. आपण काहीतरी करायला हवं या भावनेतून सहानुभूतीनं ती लोकं पाच-दहा रुपये त्याच्या हातावर टिकवतात आणि पुण्य कमावल्याच्या आनंदात पुढच्या रस्त्याला लागतात. अनेकदा असे भिकारी मुलं-मुली सिग्नलला दिसले, की लोक आपसांत कुजबूज करतात.... ‘हा या मुलांचा हा धंदा आहे. फार मोठं रॅकेट आहे. त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो. ते गुन्हेगार असतात. त्यांना भीक देण्याची काहीएक गरज नाही.’ असं म्हणून ते चालतेही होतात. जेव्हा रस्ता क्रॉस करताना एखादी मळकट कपड्यातली भिकारी मुलगी अंगाला हात लावून भीक मागते, तेव्हा आपण तिच्या अंगावर वस्सकन ओरडतो किंवा तिला पटकन दोन-पाच रुपये देऊन तिथून पळ काढतो. तो मळकट, घाणेरडा स्पर्शही आपल्याला नकोसा होतो. बस्स! संपलं. एवढाच काय तो आपला त्या लोकांशी येणारा संबंध! अशा रस्त्यावरच्या भिकाऱ्यांशी नातं जोडणारा एक तरुण मला पुण्यात भेटला. तुमची आणि त्याचीदेखील ओळख व्हायलाच हवी. त्याचं नाव डॉ. अभिजित सोनवणे. लोक त्याला ‘भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर’ म्हणून ओळखतात. 


अभिजित हा मूळचा सातारा जिल्ह्यातल्या माणदेश तालुक्यातल्या म्हसवडचा. त्याचा जन्म कोल्हापूर इथं झाला. शालेय शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं आणि महाविद्यालयीन शिक्षणही साताऱ्याच्या सायन्स कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून अभिजितनं १९९९ साली आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.

आयुर्वेदातलं शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या अभिजितनं समविचारी तरुणीशी लग्न केलं आणि समोर एक ध्येय ठेवून एका छोट्या गावात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आपल्याला आपल्या आई-वडिलांनी शिकवलं. कर्तव्य पूर्ण केलं; पण आता आपण आपल्या कर्तृत्वावर जगायचं असं अभिजितनं ठरवलं; पण त्या गावात अभिजितची प्रॅक्टिस काही केल्या चालेना. काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी गावचे सरपंच अभिजितला म्हणाले, ‘बाळा, तू अजून तरुण आहेस. कष्ट करण्याची ताकद तुझ्यात आहे. तुझ्याकडे लोक येत नाहीत, तर तू लोकांकडे जा.’ सरपंचाचं म्हणणं ऐकून अभिजितनं रोज गावातल्या लोकांकडे जायला सुरुवात केली. तपासणी फी फक्त पाच रुपये होती. असं असतानाही लोक अभिजितला पैसे तर देणं सोडाच, पण त्याच्याकडून तपासून घ्यायलाही तयार होत नसत. याचं कारण अभिजितचा अवतार गबाळ्यासारखा होता. परिस्थितीमुळे तो सुटाबुटात वावरू शकत नव्हता. त्यामुळे तो डॉक्टर आहे की कोणी भोंदूबाबा, असा प्रश्न गावकऱ्यांना पडायचा. हाही प्रयत्न फसला होता.

काय करावं, या गोष्टीचा विचार करकरून अभिजितला वेड लागायची पाळी आली. तो गावातल्या मंदिराजवळ जाऊन तिथल्याच पायरीवर बसून आकाशाकडे एकटक नजर लावून बसू लागला. मनात सगळे नकारात्मक विचार सुरू झालेले असायचे. पुढे सगळा काळाकुट्ट अंधार दिसायचा. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षं घातली. आता निदान पोटापुरतं तरी मिळावं असं वाटत असताना तेवढंही मिळू नये या विचारानं अभिजित नैराश्याच्या खाईत चालला होता. घरी जायचं तर बायकोला कसं तोंड दाखवायचं, असं त्याला वाटायचं. तासनतास तिथे बसलेल्या अभिजितला त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असायचे. हळूहळू अभिजितशी त्यांची दोस्ती झाली. अभिजितचं दुःख त्यांना न बोलता समजलं. त्या आजी-आजोबांनी अभिजितला अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसं तोंड द्यायचं याचे जणू काही धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी अभिजितच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. ‘आम्ही तुझे आहोत’ हा आधार दिला आणि त्यांना भिक्षेपोटी मिळालेलं चांगलं अन्न ते अभिजितला खायला घालू लागले. स्वतः शिळंपाकं खाऊ लागले. अभिजितच्या बायकोसाठीही ते चांगले पदार्थ वेगळे काढून अभिजितजवळ देऊ लागले. इतकंच नाही, तर लोकांनी समोर टाकलेले पैसेही ते नकळत अभिजितच्या सॅकमध्ये टाकत. त्या पैशांवर अभिजितचे दिवस कसेबसे निघत होते.

असेच दिवस जात असताना अभिजितसमोर एक संधी आली. त्याला आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. त्याला महाराष्ट्रभरातली हॉस्पिटल्स नजरेखालून घालायची होती. कारण तिथे तो महाराष्ट्राचा प्रमुख होता. त्याला आता चार लाख रुपये पगार मिळणार होता. चमत्कार व्हावा तशी सगळी परिस्थिती पालटली होती. अभिजितची रोजची खाण्याची भ्रांत संपली. त्याचं राहणीमान सुधारलं. त्याच्या चेहऱ्यावर तेज आलं. त्याला सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. दोन्ही आयुष्यांतली तफावत अभिजितनं अनुभवली; मात्र हे सगळं सुख उपभोगताना त्याला काहीतरी टोचत होतं. पैसा म्हणजेच आयुष्य का? मला हे हवंय ते हेच होतं का?

अभिजितच्या डोळ्यांसमोर ते वृद्ध आजी-आजोबा यायचे. त्यांचं प्रेम आठवायचं. ‘ते नसते तर...’ या प्रश्नानं त्याचा जीव कासावीस व्हायचा. त्यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची, या प्रश्नानं त्याचं मन कातर व्हायचं. आणि काहीसा निर्धार करून अभिजितनं १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी आपल्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि तो रस्त्यावर आला. पुढे काय करायचं ठाऊक नव्हतं; पण मनात एक मात्र नक्की होतं. ज्या आजी-आजोबांनी आपल्या घासातला घास काढून दिला, त्यांचं ऋण चुकतं करायचं. 

आजचा अभिजित!
आज अभिजित आठवड्यातले सहा दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार दररोज सकाळी आठ ते दोन या वेळेत पुण्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांत, मशिदींत, चर्चमध्ये आणि गुरुद्वारामध्ये जातो. सोमवारी शंकराचं मंदिर, तर मंगळवारी देवीचं, बुधवारी विठ्ठलाचं, तर गुरुवारी गणपती किंवा दत्ताचं, शुक्रवारी अल्लाची मशीद, तर शनिवारी हनुमानाचं मंदिर तो गाठतो. या मंदिरांच्या बाहेर त्याला अनेक भिक्षेकरी भेटतात. तो त्यांना मोफत तपासतो. स्वतःच औषधं-गोळ्याही देतो. त्यांची प्रेमानं विचारपूस करतो. गेली दोन वर्षं अभिजितचं हे काम अव्याहतपणे सुरू आहे. कोणाच्या पायात पू झाल्यानं पाय सुजलेला, तर कोणाला दिसत नाहीये. अनेक विकारांनी त्रस्त असलेले भिक्षेकरी बघितले, की अभिजित त्यांची प्रेमानं चौकशी करतो आणि वेळ पडलीच तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करवतो. 


जसजसं वय वाढत जातं, तसतसं माणसाच्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्याला अशक्तपणा जाणवायला लागतो. किडनी, लिव्हर, हृदय यांच्याशी संबंधित विकार बळावू लागतात. डायबेटिसची शक्यता वाढते. आणि या सगळ्यांकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर मृत्यू ठरलेलाच! अशा वेळी अभिजितचं अशा वर्गासाठीचं काम म्हणजे स्तिमित करणारं आहे. त्यानं पुण्यातल्या ७५० भिकाऱ्यांची नोंद स्वतःजवळ केली आहे. त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी तो पॅथॉलॉजिस्टची यंत्रणाही अनेकदा बरोबर घेऊन फिरतो.

अभिजितला भिकाऱ्यांवर दया करून त्यांचा मसीहा बनायचं नाहीये. त्याला त्यांच्याशी प्रेमाचं नातं निर्माण करून त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त कराचं आहे. आज त्यानं कोणाशी आई-मुलाचं, तर कोणाशी आजी-नातवाचं अशी अनेक नाती निर्माण केली आहेत. एखादा दिवस प्रवासानं किंवा कुठल्या कामानं अभिजित त्या ठरावीक वारी ठरावीक मंदिराजवळ, मशिदीजवळ, चर्चजवळ वा गुरुद्वाराजवळ गेला नाही, तर तिथले भिक्षेकरी अभिजितची वाट बघतात आणि दुसऱ्या दिवशीचा वार कुठला आणि तो कुठे असू शकतो हे ठाऊक झाल्यानं त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात.

आज अभिजितनं प्रेमानं या भिक्षेकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अभिजित त्यांना म्हणतो, ‘मी लोकांना काय सांगू, माझी आई भीक मागतेय?’ तिथल्याच आजीला तो म्हणतो, ‘मी कशी ओळख देऊ तुझी, की माझी आजी भीक मागतेय म्हणून?’ ‘माझ्याशी संबंध तोडूनच टाका. मी येतच नाही उद्यापासून....’ असं म्हटलं, की अभिजितच्या तोंडावर हात ठेवून ती वृद्धा म्हणते, ‘बाळा, सगळी नाती सोडून, तोडून आज आम्ही इथं आहोत. सगळे पाश केव्हाच मागे सुटलेत. आता तुझ्याशी नातं जडलंय, तर आम्हाला सोडून जाऊ नकोस.’ अभिजित या भिक्षेकऱ्यांना छोट्या छोट्या गोष्टींतून उभं करतोय. त्यांना स्वाभिमानानं जगायला शिकवतोय.

एक जण न्हावीकाम चांगलं करायचा, असं समजल्यावर अभिजितनं त्या वृद्धाला चांगला भारी किमतीचा फोम आणि इलेक्ट्रॉनिक रेझर आणून दिला. मजूर काम करतात त्या ठिकाणी नेऊन त्याला बसवलं आणि पाच रुपयांत दाढी करून दे, असं संगितलं. तो महागडा फोम आणि इलेक्ट्रॉनिक रेझर बघून मजूर मंडळी सुखावली आणि फक्त पाचच रुपयांत दाढी करून मिळते म्हटल्यावर त्या न्हावीबाबाकडे रांग लागायला लागली. ज्या मुलांना अजून मिसरूड फुटायची आहे, ते त्या फोमची गंमत अनुभवण्यासाठी न्हावीबाबाजवळ येऊन बसतात. अशा प्रकारे अभिजितनं आजपर्यंत ३३ भिक्षेकऱ्यांना उद्योगाला लावलंय.अभिजितचा परमेश्वर मंदिरात नाही, मशिदीतही नाही, ना कुठल्या चर्चमध्ये, ना कुठल्या गुरुद्वारामध्ये. अभिजित म्हणतो, ‘माझा परमेश्वर या मंदिराच्या, या मशिदीच्या आणि या चर्चच्या बाहेर असलेल्या या पीडित माणसांमध्ये आहे.’ तो तळमळीनं एकच सांगतो, ‘त्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमानं वागा. त्यांना सन्मानानं वागवा. आणि मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.’ ज्या व्यक्तींना समाजानं टाकून दिलंय, त्यांना आपलंसं करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच आता अभिजितचं ध्येय बनलं आहे. ‘डॉक्टर बनायला चांगली डिग्री लागते; पण चांगला माणूस बनायला कुठल्याही डिग्रीची गरज लागत नाही,’ असं अभिजित म्हणतो. भिक्षेकरांची अवस्था पाहून तो अस्वस्थ होतो. अभिजितला त्यांना नागरिकत्व मिळवून द्यायचंय. त्यासाठी त्यांचं आधार कार्ड काढून देण्याचं काम त्यानं हाती घेतलं आहे. तो त्यांचं बचत खातंही काढून देणार आहे.

पत्नी डॉ. मनीषासह डॉ. अभिजित सोनावणेअभिजितनं ‘सोहम ट्रस्ट’ नावाची एक संस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम तो करतोय. या संस्थेला आर्थिक मदत करायची असल्यास Social Health And Medicine Trust (SOHAM TRUST) या नावे चेक काढून अगदी एक रुपयापासून जमेल तेवढी मदत करू शकता. त्याची पत्नी डॉ. मनीषा या ट्रस्टची अध्यक्षा असून, ती त्याला त्याच्या या सगळ्या कामात मदत करते. ‘तिच्याशिवाय या कामाचा मी विचारही करू शकत नाही,’ असं अभिजित म्हणतो.

भिक्षेकऱ्यांचा हा डॉक्टर तुम्हाला पुण्यातच भेटेल, सोमवार ते शनिवार त्या त्या मंदिरात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा गुरुद्वारात! अभिजितमधली मानवता बघून त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. आयुष्य कसं जगावं याचा एक धडा त्यानं दिलाय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं, तर...

आपल्या असण्याची जाणीव एखाद्याला असणं म्हणजे आयुष्य
आणि
आपल्या नसण्याची उणीव भासणं म्हणजे आयुष्य!

संपर्क :
डॉ. अभिजित सोनवणे, सोहम ट्रस्ट, शिवाजीनगर गावठाण, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, पुणे - ५
मोबाइल : ९८२२२ ६७३५७
ई-मेल : abhisoham17@gmail.com, sohamtrust2014@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(डॉ. अभिजित सोनवणे यांचे काही व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search