Next
ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा २४ आणि २५ डिसेंबरला
प्रेस रिलीज
Saturday, December 23, 2017 | 04:51 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘अभिनव वाचक-चळवळ म्हणून ज्ञात असणाऱ्या ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा रसिकांसाठी विविधांगी विचारक्षेत्रांची बौद्धिक मेजवानी घेऊन येत आहे. २४ आणि २५ डिसेंबरला कीर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात आणि तेथील विविध सभागृहात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रेलसेल रसिकांना सुखावणारी आणि संस्मरणीय ठरेल,’ असा विश्वास ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केला.

पहिल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील सुमारे दीडशे व्यक्ती आणि संस्था त्यात सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धांचे समन्वयक म्हणून चंद्रकांत मेहेंदळे, श्रीनिवास नार्वेकर आणि प्रा. दीपा ठाणेकर काम पाहत असून विजेत्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.

संध्याकाळी  चार ते रात्री आठ या वेळेत दोन चित्रपटांच्या विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘उदाहरणार्थ नेमाडे’  (दिग्दर्शक- अक्षय इंडिकर ) आणि ‘पल्याडवासी’ (दिग्दर्शक- प्रगती कोळगे ) हे चित्रपट दाखविले जाणार असून दिग्दर्शकांशी बातचित करण्याची संधीही रसिकांना दिली जाणार आहे. या सत्राचे समन्वयन प्रल्हाद जाधव करणार आहेत.

२५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत ग्रंथपाल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई जिल्हा व उपनगर ग्रंथालय संघ आणि ठाणे व पालघर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणाचे सुमारे  १५० ग्रंथपाल या  सहभागी होत आहेत.

त्यानंतर  सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील  आव्हाने आणि प्रकाशन, लेखक , माध्यमांचा सार्वजनिक ग्रंथालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हे दोन परिसंवाद आयोजन करण्यात आले असून त्यात डॉ. रा. शं. बालेकर, माधव शिरवळकर, नरेंद्र लांजेवार, श्रीकृष्ण साबणे, संजीव लाटकर, आशिष पाटकर असे मान्यवर सहभागी होत आहेत. या सत्राचे समन्वयन चांगदेव काळे करत आहेत.

दुपारी दोन ते चार या वेळेत ‘ब्लॉग- लेखनातील संधी आणि आव्हाने’ या विषयाची सांगोपांग मांडणी करणारी चर्चा आयोजित करण्यात आली असून निळू दामले, रवी आमले, सचिन परब, मुकेश माचकर आणि राम जगताप हे ब्लॉग- लेखन क्षेत्रातील मान्यवर त्यात सहभागी होत आहेत.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार ते पाच या वेळेत अभिवचन आणि वाचनस्पर्धेतील विजेते सादरीकरण करतील, तर ५.३० वाजता, ‘आम्ही काय वाचतो’ या विषयावरील परिसंवाद व पुस्तकाचे प्रकाशन होईल. त्यात सचिन कुंडलकर, चंद्रकांत कुलकर्णी, अरुण शेवते, हेमा अंतरकर, अरविंद जगताप, विनोद शिरसाठ आणि प्रतिमा कुलकर्णी सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन किरण येले करतील. 

समारोपचा ‘श्रेय ज्याचे त्यास घ्यावे’ हा कार्यक्रम बालकवी, बोरकर आणि विंदाच्या कवितांवर आधारित सांगितिक अविष्कार म्हणून सादर करण्यात येईल. विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ख्यातनाम संगीतकार कौशल इनामदार हे हा कार्यक्रमाचे आयोजन करणार असून त्यांना निवेदिका प्रा. अस्मिता पांडे सहाय्य करणार आहेत. 

या वाचक दिनाचे औचित्य  साधून ग्रंथालीची आठ नवी पुस्तके प्रकाशित होत आहेत.  यामध्ये ‘या फुलपाखराचं काय करायचं’ - (राधिका कुंटे), ‘राखुळी ’ - (चांगदेव काळे),‘पावन प्रीतीच्या रक्तिम सावल्या’ - (स्मिता भागवत), ‘ मोराची बायको’- (किरण येले),‘ नोबेलनगरीतील नवल स्वप्ने २०१७’ - (सुधीर थत्ते / नंदिनी थत्ते ), ‘भग्न आस्थेचे तुकडे’ - (चंद्रशेखर सानेकर), ‘पत्रास कारण की’ - (अरविंद जगताप) ‘जागो मैं खुदा हुं ’- (किरण येले ) यांचा समावेश आहे. या आठ पुस्तकांचा संच वाचकांना सवलतीत फक्त ८०० रुपयांमध्ये मिळणार आहे. या संचाची मागणी ‘ग्रंथाली’ अथवा ‘बुकगंगा’कडे करता येणार आहे. त्यासाठीचा टपालखर्च वेगळा असेल. 

वाचक दिनाच्या अनुषंगाने राज्यभरातून प्राप्त झालेल्या कवितांपैकी निवडक कवितांना चित्ररूप देण्यात आले असून त्यांचे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी आयोजित करण्यात आले आहे. ते या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्याचे समन्वयन किरण येले करीत आहेत. 

वाचकदिन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रंथाली शब्द रुचीच्या संपादक डॉ. वीणा सानेकर, उपक्रम संयोजक, संपादक मंडळ आणि सर्वच सदस्य, हितचिंतक मेहनत घेत आहेत. सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, रसिकांनी त्यांच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सुदेश हिंगलासपूरकर व उपक्रम संयोजिका धनश्री धारप यांनी केले आहे.

कार्यक्रम :  ग्रंथाली वाचकदिन सोहळा
ठिकाण :  कीर्ती महाविद्यालय, दादर 
वेळ : रविवार ,दि. २४ व सोमवार , दि. २५
         सकाळी १० वाजल्यापासून  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search