Next
महाभारतापासून ते सामान्य नागरिकापर्यंतच्या छटा
BOI
Thursday, November 09 | 05:24 PM
15 0 0
Share this story

वेणूनादच्या सादरीकरणानंतर कलाकारांशी संवाद साधताना संयोजक प्रसाद वनारसे.

ज्याप्रमाणे महाभारतातील प्रत्येक पात्राला कृष्ण आपला वाटतो, त्याचप्रमाणे महाभारत वाचणाऱ्या, पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्यालासुद्धा कृष्ण आपलेसे करतो. अशा या बहुआयामी श्रीकृष्णाच्या आयुष्यात आलेल्या स्त्री पात्रांचे चित्रण करणाऱ्या ‘वेणूनाद’ या नाटकाचे सादरीकरण ‘आयपार इंटरनॅशनल फेस्टीव्हल २०१७’च्या सातव्या दिवशी करण्यात आले.  
......................................
महाभारत आणि कृष्ण यांचं अतूट नातं आहे. कृष्ण हा केवळ एक देवता नाही, तर प्रेमिक, मित्र आणि राजकारणी म्हणूनदेखील सर्वांनाच परिचित आहे.  त्याच्या आयुष्यात आलेल्या पात्रांच्या माध्यमातून कृष्ण दर वेळेस नव्याने उलगडत जातो. ज्याप्रमाणे महाभारतातील प्रत्येक पात्राला कृष्ण आपला वाटतो, त्याचप्रमाणे महाभारत वाचणाऱ्या, पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्यालासुद्धा कृष्ण आपलेसे करतो. अशा या बहुआयामी श्रीकृष्णाच्या आयुष्यात आलेल्या स्त्री पात्रांचे चित्रण करणारे सादरीकरण आयपार इंटरनॅशनल फेस्टीव्हलच्या सातव्या दिवशी करण्यात आले.  

'वेणूनाद'मधील एक दृश्यअश्विनी गिरी यांची संकल्पना असलेल्या ‘वेणूनाद’चे दिग्दर्शन चित्तरंजन गिरी यांनी केले होते. हिंदीतून सादर करण्यात आलेल्या या सादरीकरणातील सर्व पात्रे अश्विनी गिरी यांनी साकारली. सादरीकरणाची सुरुवात अर्थातच राधेपासून झाली. चपखल शब्द आणि वैविध्यपूर्ण उपमांनी भरलेल्या संवादांमधून राधेने कृष्णासोबत असलेले तिचे बहुपदरी नाते उलगडून सांगितले. कृष्ण हा तिचा सखा, सवंगडी, प्रेमिक आणि रक्षकदेखील आहे. याचे दाखले राधेने वेगवेगळ्या प्रसंगांमधून दिले. 

त्यानंतर गाण्याच्या माध्यमातून काळ पुढे सरकत गेला व विविध पात्रे रसिकांच्या भेटीस आली. गांधारीने कृष्णास दिलेल्या शापाच्या प्रसंगात चांगलीच धार होती. राधा हीच कृष्णाची शक्ती आहे, या निष्कर्षाप्रत येऊन हा वेणूनाद थबकला. अश्विनी गिरी यांनी अक्षरशः राधाच प्रेक्षकांसमोर उभी केली. तसेच वेगवेगळ्या नात्यांकडे पाहण्याचे नवे दृष्टीकोन ‘वेणूनाद’ने प्रेक्षकांना दिले. 

सातव्या दिवशी ‘इन ट्रान्झिट’ या माईम ॲक्टचेदेखील सादरीकरण करण्यात आले. याची संकल्पना व दिग्दर्शन आयपारच्या आदिती वेंकटेश्वरन यांची होती.  So much of the city is in our bodies!  या ॲन मायकेल्स या कॅनेडियन कवियत्री व लेखिकेच्या वाक्यातून प्रेरणा घेऊन या परफॉर्मन्सची संकल्पना व दिग्दर्शन करण्यात आले होते. लयबद्ध व हेतूपूर्वक हालचालींमधून समकालीन संस्कृतीचे प्रतीकात्मक सादरीकरण ‘इन ट्रान्झिट’ने केले. आपल्या भवतालाचे चित्रण विशिष्ट शारीरिक हालचालींमधून करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग या सादरीकरणातून करण्यात आला. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांमधील रंगभूमींवर सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांबाबत भारतातील रंगकर्मी व रसिकांना माहिती मिळावी किंबहुना ते प्रयोग त्यांना पाहता यावेत, हा आयपार इंटरनॅशनल फेस्टीव्हलचा मुख्य हेतू रविवारच्या सादरीकरणांनी साध्य केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘होल’ (Hole) हे कोरीयन नाटक व ‘इट्स मी एडिथ पियाफ’ (It’s me, Edith Piaf) हे जर्मन भाषेतील सोलो रविवारी सादर करण्यात आले. पॅरिसच्या उपनगरांमधील रस्त्यांवर सुरुवात केलेली व पुढे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेली फ्रेंच गायिका व अभिनेत्री एडिथ पियाफ हिच्या आयुष्याची कथा यातून सांगण्यात आली.
लहानपणापासून सेलिब्रेटीपर्यंतच्या तिचा प्रवास प्रेक्षकांना या माध्यमातून पाहता आला. 

ॲनास्टेसिया विल्मर या अभिनेत्रीने एडिथची ‘La Vie en rose’ (१९४६), ‘Milord’ (१९५९), व ‘Padam ... Padam ...’ (१९५१). ही प्रसिद्ध गाणी गात सोलोमध्ये जिवंतपणा भरला. होल या कोरीयन नाटकाची कथा एका अनपेक्षित जागी निर्माण झालेल्या ‘सिंक होल’भोवती फिरते. तिथे आलेल्या दोन तज्ज्ञांच्या मतभेदांची कथा यातून मांडण्यात आली आहे. हे ‘सिंक होल’ झटकन बुजवून टाकत रिकामे व्हावे असे यातील एकाला वाटत असते, तर त्याचा अभ्यास करुन त्यावर उपाय शोधण्यात दुसऱ्याला रस असतो. हे दोघेही आपापले विचार एकमेकांना पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. एक छोटेसे सिंकहोल केंद्रस्थानी ठेवून वैचारिक मतभेदांचे चित्रण या नाटकात करण्यात आले आहे. नेपथ्याचा एक वेगळा नमुना पाहण्याचा योग यानिमित्ताने प्रेक्षकांना मिळाला. रंगमंचावर प्रत्यक्ष रस्त्यासदृश नेपथ्य उभे करत प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती या नाटकाने दिली. एकूणात रविवार हा आयपार फेस्टीव्हलच्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरला.  

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa इथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link