Next
सब कुछ लुटा के होश में आए....
BOI
Sunday, February 11, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुरेख आणि सुंदर स्वप्न म्हणजे मधुबाला! जिचे सौंदर्य आणि अभिनय एक आख्यायिका बनून राहिले आहे, अशा मधुबालाचा जन्मदिन १४ फेब्रुवारीला, तर स्मृतिदिन २३ फेब्रुवारीला असतो. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तिच्यावर चित्रित झालेल्या ‘सब कुछ लुटा के होश में आए...’ या गाण्याचा...
.........
जानेवारी महिना हा जसा संगीतकार सी. रामचंद्र यांच्या जन्म व मृत्यू दिनांकाचा महिना, तसाच फेब्रुवारी हा महिना सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाच्या जन्म आणि मृत्यूच्या दिवसांचा महिना! १४ फेब्रुवारी १९३३ रोजी मधुबालाचा जन्म झाला होता आणि २३ फेब्रुवारी १९६९ रोजी ती हे जग सोडून निघून गेली. मधुबाला कोण होती, हा प्रश्न सहसा कोणाला पडणार नाही. तशा हिंदी चित्रपटसृष्टीत सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अभिनेत्री प्रत्येक पिढीगणिक रसिकांपुढे येतच राहिल्या आहेत; पण तरीही मधुबाला म्हटले, की चित्रपटप्रेमी जरा जास्तच कान टवकारतात.

मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुरेख आणि सुंदर स्वप्न होतं! चंद्रासारख्या दिसणाऱ्या मधुबालेची कांती गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षा सरस होती. काही वर्षांपूर्वी ‘सिनेगोअर’ने घेतलेल्या जनमत चाचणीत शतकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचा सन्मान तिलाच मिळाला होता. मधुबाला म्हणजे स्त्री सौंदर्याचा आणि अभिनयाचा रूपेरी पडद्यावरील एक अलौकिक आविष्कार होता.

मधुबालाचे बालपण हलाखीत गेले. घरातील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमुळे ती अवघी नऊ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला सिनेमात कामे करायला लावून तिला कुटुंबातील लोकांचे पोट भरण्याचे साधन बनवले. ‘वसंत’, ‘मुमताज महल,’ ‘धन्ना भगत’, ‘फुलवारी’, ‘पुजारी’ अशा काही चित्रपटांत छोटी मधुबाला ‘बेबी मुमताज’ या नावाने पडद्यावर दिसली होती. नंतर १९४७मध्ये नायिका मधुबालाचा ‘नीलकमल’ हा चित्रपट पडद्यावर झळकला. ‘बेबी मुमताजची ती मधुबाला झाली. त्या चित्रपटात राज कपूर तिचा नायक होता.

१९४७मध्ये मधुबालाचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या काळात एकाच अभिनेत्रीचे एकाच वर्षात एवढे चित्रपट प्रदर्शित होत नसत; पण मधुबालाच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला. या सगळ्या कालावधीत मधुबाला चौदा वर्षांची होती. खेळणे-बागडणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे हे या वयातील मुलामुलींचे जीवन असते; पण मधुबालाच्या नशिबी हे जीवन नव्हते आणि त्यामुळेच आपले वडील सांगतील त्या चित्रपटात ती काम करत राहिली. चित्रपटनिवडीचे निर्णय ती घेत नसे. त्यामुळेच १९४७मध्ये पाच चित्रपटांचा विक्रम करणाऱ्या मधुबालाने १९४९मध्ये हा स्वत:चाच विक्रम मोडला. १९४९ या वर्षात तिचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले होते. हा विक्रम मात्र आजपर्यंत कोणताही कलावंत मोडू शकलेला नाही. 

१९४९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महल’ने तिचे नशीब उजळले. ‘महल’ चित्रपटाची ती नायिका होती. हा चित्रपट सेटवर गेला, तेव्हा ती पंधरा वर्षांची होती. या चित्रपटापूर्वी तिला अनेक चित्रपटांचे अनुभव होते; पण पंधरा वर्षांच्या मुलीला अभिनयाची किती जाण असणार, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. परंतु मधुबालाचे सौंदर्य ही जशी दैवी देणगी होती, त्याप्रमाणेच तिची अभिनयाची जाणही दैवी देणगीच होती. ‘महल’ चित्रपटाच्या कथानकातील गूढतेचे वातावरण, त्यात परीसमान दिसणारी मधुबाला आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजातील ‘आएगा आनेवाला’ या गीताचे शब्द व संगीत! अशा या ‘महल’ने चित्रपटप्रेमींना झपाटून टाकले आणि मधुबालाची लोकप्रियता उंच शिखरावर गेली. अप्रतिम लावण्य मिळालेल्या या सौंदर्यसम्राज्ञीचे आयुष्य मात्र फक्त ३६ वर्षांचेच होते. त्या आयुष्यात तिने नायिका म्हणून चित्रपटसृष्टीतील अशोककुमार, दिलीपकुमार, देव आनंद, गुरुदत्त, राजकपूर अशा मान्यवरांबरोबर कामे केली आणि प्रेमनाथ, नासीर खान, सुरेख, भारतभूषण, किशोरकुमार हेही तिचे नायक होते.

तिचे चाहते फक्त भारतातच नाहीत, तर जगभरात आहेत. तिला ‘व्हीनस ऑफ दी स्क्रीन’ अशी उपाधी देण्यात आली होती. १९५०मध्ये ती भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांत चर्चेचा विषय होतीच; पण तिच्या सौंदर्याने हॉलीवूडही प्रभावित झाले होते. १९५२मध्ये अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी तिची पानभर मोठी छायाचित्रे व तिच्यावरचे लेख प्रसिद्ध केले होते. ‘फ्रँक काप्रा’ हा त्या काळातील अमेरिकेतील एक आघाडीचा चित्रपटनिर्माता केवळ मधुबालासाठी भारतात आला व त्याने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. परंतु मधुबालाच्या वडिलांनी ती ऑफर नाकारली आणि मधुबालाचे हॉलीवूडमध्ये चमकणे राहून गेले.

पी. एन. अरोरा या चित्रपटात निर्मात्याबरोबर भागीदारी करून मधुबालाने १९४९ ते १९५६ या चार वर्षांत ‘पारस’, ‘परदेस’, ‘नाझनीन’ आणि ‘रेल का डिब्बा’ हे चित्रपट काढले. १९५५च्या सुमारास ‘नाता’ नावाचा चित्रपट तिच्या वडिलांनी निर्माता बनून काढला. पैसे अर्थात मधुबालाचे! पण तो चित्रपट चालला नाही. १९७१मध्ये प्रदर्शित झालेला ‘ज्वाला’ हा मधुबालाचा अखेरचा चित्रपट! या चित्रपटाचे चित्रीकरण १९५७मध्येच सुरू झाले होते. परंतु मधुबालाच्या आजारपणामुळे तो चित्रपट रखडला होता. आणि तिच्या मृत्यूनंतर तो प्रदर्शित झाला. हृदयाच्या विकारामुळे ती हे जग सोडून कमी वयात निघून गेली. तिचे सौंदर्य, तिचे दिसणे या गोष्टी आख्यायिका बनून राहिल्या आहेत. (तशाच तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांच्या कहाण्याही!)

मधुबालावर चित्रित केलेली गीते अनेक आहेत. प्रत्येक गाण्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गीत ‘सुनहरे’च आहे; पण या गीतांपैकी एक गीत मधुबालाच्या जीवनाशी मिळतेजुळते वाटते. ती सुंदर होती. या सौंदर्यावर भाळणारे अनेक जण होते; पण तिच्यावर निष्ठेने प्रेम करणारे??? वयाच्या छत्तिसाव्या वर्षी ती हे जग सोडून गेली. तिचे कोणावर प्रेम होते? तिच्यावर कोण प्रेम करत होते? तो एक स्वतंत्र विषय आहे. येथे आपण फक्त एका प्रेमिकेची मनोव्यथा व्यक्त करणारे गीत बघणार आहोत. मधुबालाची मनाची स्थितीही (कदाचित) तशीच असेल त्या काळात!

एखाद्यावर जिवापाड प्रेम करावे, त्याला आपले मानून त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा आणि ज्याच्यासाठी आपण हे करतो तो (अगर ती) मात्र आपल्याशी प्रेमाचे नाटक करत आहे, फक्त स्वार्थ साधत आहे, हे कळल्यानंतर अंतकरणाला होणाऱ्या वेदना या इतरांना सांगून कळत नाहीत. ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ असे म्हणतात. अशाच जळणाऱ्या हृदयाची ही आर्त हाक - त्यातून उमटणारे हे शब्द -

न पूछो प्यार की हमने जो हकीकत देखी 
वफा के नाम पे बिकते हुए उल्फत देखी 
किसी ने लूट लिया और हमें खबर ना हुई 
खुली जो आँख तो बरबाद मुहब्बत देखी

या ओळींनी गीताची सुरुवात होते. (प्रेम या भावनेबद्दल काय काय म्हणून आमच्या कल्पना होत्या; पण त्याबद्दलची) प्रेमाबद्दलची कोणती वस्तुस्थिती (हकीकत) आमच्या निदर्शनास आली हे तुम्ही विचारू नका! निष्ठेच्या नावावर विकले जाणारे प्रेम (आज आम्ही) पाहिले. (आम्ही पाहिलेले हे प्रेम हे निष्ठेचा बुरखा घातलेले खोटे प्रेम होते.) त्या बुरख्याआड लपून आम्हाला) कोणी लुटलं (आणि हाय रे दुर्दैव, की) आम्हाला त्याचा पत्ताही लागला नाही. (आमचे) डोळे उघडले (पण केव्हा, तर आमची) प्रीती बरबाद झाल्यावर... 

या चार ओळींतून लतादीदी गीत सुरू करतात. पडद्यावर पियानो वाजवत मधुबाला गात असते. प्रेमधवन हा गीतकार हे दुख मांडताना पुढे म्हणतो- 

सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया 
दिन में अगर चिराग जलाए तो क्या किया
 
(आमचे) सर्वस्व लुटले गेल्यावर त्याची जाणीव आम्हाला झाली; पण आता त्याचा काय उपयोग? (एखाद्याने) दिवसा सूर्यप्रकाशात दिवा लावला तर त्याचा उपयोग काय असतो. (तसेच आता घडून गेलेल्या गोष्टीवर/घटनांवर पश्चाताप करून त्याचा काय उपयोग होणार?)

मैं वो कली हूँ जो न बहारों में खिल सकी 
वो दिल हूँ जिस को प्यार की मंझील न मिल सकी 
पत्थर पे हमने फूल चढाए तो क्या किया

जिच्या जीवनात वसंत ऋतू येऊनही, ती उमलू शकली नाही अशी कळी मी आहे. माझ्या हृदयाला, माझ्या मनाला प्रेमाचे ध्येय, शिखर गाठता आले नाही (प्रीतीच्या राज्यात मी पराभूत झाले.)(आज मला उमगले, की) मी माझ्या प्रीतीची फुले एका दगडावर वाहिली होती. (एका पाषाणहृदयी व्यक्तीवर मी प्रेम केले; पण आता हे कळून काय उपयोग?)

आणि अशा या दुःखद विचाराने हताश झालेला हा जीव अखेर मृत्यूची याचना करणार नाही तर काय? म्हणूनच अखेरच्या कडव्यात कवी म्हणतो -

जो न मिल सका प्यार गम की श्याम तो मिले 
इक बेवफा से प्यार का अंजाम तो मिले, 
दो दिन खुशी के देख न पाए तो क्या किया

(ज्याच्यावर मी प्रेम केले, तो आता तरी माझ्यावर प्रेम करणार आहे का? आणि म्हणूनच त्याचे) प्रेम मला मिळाले नाही; पण दुःखाने भरलेली ही सायंकाळ तरी मला लाभली (वा! काय नशीब आहे माझे?) प्रेमाची प्रतारणा करणाऱ्यावर मी प्रेम केले, त्याचे परिणाम मला भोगायलाच पाहिजेत, नाही का? (म्हणूनच आता) हे मृत्यू, तू लवकर ये (म्हणजे माझ्या या दु:खी मनाला) जरा आराम तरी मिळेल. (खरेच की हो, केवढी ही आमच्या जीवनाची शोकांतिका) आम्ही सौख्याचे दोन दिवसही पाहू शकलो नाही. (आणि म्हणूनच असे वाटते, की आम्ही जगून तरी काय केले? काय सुख अनुभवले?)

१९५७च्या ‘एक साल’ चित्रपटातील हे गीत संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केले होते. ‘दो पहेलू’ या प्रकारातील हे गीत आपल्याला तलत महमूद यांच्याही आवाजात ऐकायला मिळते; (त्या गीताबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) पण दोन्ही गीतांचे ध्रुवपद आणि कडवी यांमधील शब्द रचना वेगळी आहे. या चित्रपटाचा नायक अशोककुमार होता आणि नायिका अर्थात मधुबाला! तिच्या जीवनाशी साधर्म्य असलेले हे ‘सुनहरे गीत’ खास तिच्या स्मृतीसाठी!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search