Next
इयान बँक्स
BOI
Friday, February 16, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

एकीकडे अंगावर शहारे आणणाऱ्या भयप्रद वर्णनांनी भरलेल्या कथा लिहीत असताना, अत्यंत रसिकतेने खास सिंगल माल्ट व्हिस्कीच्या शोधात संपूर्ण स्कॉटलंड पालथं घालून त्यावर पुस्तक लिहिणारा ब्रिटिश लेखक इयान बँक्स याचा १६ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा परिचय...
.......
१६ फेब्रुवारी १९५४ रोजी स्कॉटलंडमध्ये जन्मलेला इयान बँक्स हा प्रसिद्ध विज्ञानकथाकार. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच त्याने लेखनाला सुरुवात केली होती. लंडनच्या प्रसिद्ध ‘दी टाइम्स’ या मासिकाने त्याला १९४५ पासूनच्या पन्नास सुप्रसिद्ध ब्रिटिश कथाकारांच्या यादीत स्थान दिलं होतं. त्याला ब्रिटिश सायन्स फिक्शन असोसिएशनचे अनेक पुरस्कार, हॉर्टन पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले होते. मजा म्हणजे त्याने विज्ञानकथा आणि भयकथांव्यतिरिक्त व्हिस्कीवरसुद्धा एक पुस्तक लिहिलंय.

‘रॉ स्पिरीट’ हे त्याचं व्हिस्कीच्या दुनियेवरचं पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे. स्कॉटलंडभर भ्रमंती करून उत्तमोत्तम डिस्टिलरीजना भेटी देऊन, त्याने तिथल्या व्हिस्कींची महती सांगणारं आणि नयनरम्य स्कॉटलंडचं वर्णन करणारं पुस्तक लिहिलंय. माल्ट व्हिस्कीचं अनोखेपण, माल्टची व्यामिश्रता याचं वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. व्हिस्कीचं उगमस्थान, कुठल्या पाण्यापासून बनते, माल्टिंग प्रोसेसमध्ये किती उष्णता, अशी व्हिस्कीची वैशिष्ट्यं वाचकांना कळतात. (का कुणास ठाऊक, पण या पुस्तकातले इराक युद्धासंबंधीचे आणि वेगवेगळ्या कार्ससंबंधीचे उल्लेख किंचित रसभंग करतात.)
   
त्याची ‘दी कल्चर’ ही कथामाला प्रचंड गाजली होती. आपल्या आकाशगंगेत वेगवेगळ्या ग्रहांवर पसरलेल्या आणि ह्युमनॉइड्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि परग्रहवासीयांच्या एका काल्पनिक संस्कृतीत घडणाऱ्या त्या कथा लोकप्रिय झाल्या होत्या. कन्सीडर फ्लेबस, दी प्लेयर ऑफ गेम्स, युज ऑफ वेपन, दी स्टेट ऑफ दी आर्ट, एक्सेशन, इन्व्हर्जंस, सरफेस डिटेल, दी हायड्रोजन सोनाटा अशी त्या मालिकेतली पुस्तकं लोकांना आवडून गेली होती. 

‘दी वास्प फॅक्टरी’ ही कादंबरी त्यातल्या काही आक्षेपार्ह विकृत लेखनामुळे चर्चेत आली होती. 

त्याच्या कित्येक कथा अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या भयप्रद वर्णनांनी भरलेल्या असत. त्याच्या अनेक कथांवर रेडिओ आणि टीव्हीवर कार्यक्रम सादर झाले होते. 

नऊ जून २०१३ रोजी स्कॉटलंडमध्येच त्याचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link