Next
जिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट
BOI
Thursday, September 13, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

शिवाजी माने

घरच्या अवघड परिस्थितीमुळे शिवाजी माने नावाच्या एका मुलाचं शिक्षण सातवीत सुटतं. त्याला नि त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. अगदी वीटभट्टीवर काम करण्यापासून साफसफाईपर्यंत सगळं काही; पण या खडतर वाटचालीतच त्याला अरविंद गुप्ता नावाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भेटतात आणि बघता बघता तो विज्ञान शिकत जातो, त्या क्षेत्रातला एक सक्रिय कार्यकर्ता होतो, सोप्या प्रयोगांतून विज्ञान शिकवायला लागतो. आज त्याला कित्येक ठिकाणांहून बोलावणी येत असतात. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या जिद्दी मुलाच्या संघर्षाची प्रेरक गोष्ट...
..........
सातवीपर्यंत शिकलेल्या, आर्थिक परिस्थितीशी तोंड देणाऱ्या, आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या एका जिद्दी मुलाची ही गोष्ट! हा मुलगा राहायचा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या जढाळा या सात-आठशे लोकसंख्या असलेल्या गावात! आई-वडील, चौघे भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब! यातलं शेंडेफळ म्हणजे आपल्या गोष्टीतला मुलगा! मुलाचं नाव शिवाजी! शिवाजीचे आई-वडील दोघंही निरक्षर! वडील परंपरागत चर्मकाराचा व्यवसाय करणारे! आपल्या कुटुंबाचं पोट कसंबसं भरणारे.

एके दिवशी शिवाजीच्या प्रकाश नावाच्या मोठ्या भावाला वाटलं, आपण काहीतरी नवीन गोष्ट करायला हवी. त्याला माहिती मिळाली होती, की स्लिपर तयार करण्याचं एक मशीन मिळतं आणि ते मिळालं तर आपण जास्तीत जास्त चपला तयार करू शकू. बाजारात आपला माल विकला, तर पैसेही जास्त मिळतील. आपल्या कुटुंबाला बरे दिवस येतील. आपल्या मनातली गोष्ट प्रकाशनं आई-वडिलांजवळ बोलून दाखवली. आपल्या मुलांना नेहमीच प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं हा आई-वडिलांचा स्वभाव असल्यानं त्यांनी त्याच्या म्हणण्याला लगेच होकार दिला. 

आई-वडील तर हो म्हणाले. आता स्लिपर बनवण्याचं मशीन विकत आणण्यासाठी पैसे गोळा करणं आवश्यक होतं. घरात बचत असण्याचा प्रश्नच नव्हता. रोजचं पोट रोजच्या कमाईवर भरत होतं. अशा वेळी शिवाजीच्या वडिलांना गावात त्यांच्या स्वभावामुळे खूप मान होता. गावातल्या सावकारानं प्रकाशला कर्ज म्हणून व्याजावर मोठी रक्कम दिली. इतर ठिकाणांहूनदेखील पैसे गोळा झाले आणि अखेर एक लाखाची रक्कम उभी करण्यात प्रकाशनं यश मिळवलं. 

प्रकाशनं स्लिपर करण्याचं मशीन आणलं. स्लिपर तयार करण्याची शीट्सदेखील मागवली. घरातल्या सगळ्याच मंडळींनी उत्साहानं कामाला सुरुवात केली. खूप कमी वेळात जास्त माल तयार होऊ लागला. त्या स्लिपरचं सुबक मशीननं तयार झालेलं रूप बघून सगळेच हरखले. प्रकाश आणि शिवाजी बाजारात आपला माल विकण्यासाठी गेले आणि तिथे जाताच त्यांना आपण फसवले गेलो आहोत याची जाणीव झाली. त्यांना स्लिपर बनवण्यासाठी जो माल पुरवण्यात आला होता, त्या शीट्स अतिशय हलक्या दर्जाच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बनवलेल्या स्लिपर्सनाही किंमत मिळणार नव्हती. मातीमोल भावात स्लिपर विकाव्या लागल्या. 

या सगळ्या प्रकारांत कर्ज तर मानगुटीवर भुतासारखं येऊन बसलंच; पण ते फेडण्यासाठी मशीनही विकावं लागलं. तरीही कर्जाची अगदी अल्प रक्कम चुकती करता आली होती. आता करायचं काय? अशा वेळी त्यांच्या शेजाऱ्यांनी केरळमध्ये मिठाई बनवण्यासाठी आणि विकण्यासाठी काही मुलांची आवश्यकता असल्याचं त्यांना सांगितलं. ‘एका मुलाला वर्षाचे पाच हजार रुपये मिळतील,’ असं सांगताच प्रकाश आणि शिवाजी केरळला जायला तयार झाले. आपल्या आई-वडिलांच्या हातात दहा हजार रुपये पडणार याचा आनंद दोघांना जास्त होता. शिवाजी आणि प्रकाश केरळला पोहोचले. मिठाई कशी बनवायची हे शिकले. तयार झालेली मिठाई कशी विकायची याचं कसबही त्यांनी आत्मसात केलं. इतकंच नाही, तर तिथल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मल्याळम भाषाही शिकून घेतली. दोघंही ठरल्याप्रमाणे वर्षभर तिथे राहिले. परतल्यावर लक्षात आलं, की घरच्या स्थितीत काहीही सुधारणा झालेली नव्हती. घर विकण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता आणि तरीही कर्ज पूर्णपणे फिटलं नसतंच. आपण पुण्यात राहत असलेल्या आपल्या मामाकडे जावं का, असाही विचार सगळ्यांनी केला; पण अशा अवस्थेत जाणं नको वाटत होतं. शिवाजीची आत्या हैदराबादला राहत असल्यानं सगळ्यांनी हैदराबादला जायचं ठरवलं. तिथे वणवण फिरूनही काम मिळालंच नाही. अखेर एका ट्रकवाल्याची विनवणी करून त्याच्या गच्च भरलेल्या मालावर बसून पुण्यापर्यंत सोडायला तो तयार झाला. ट्रकमधल्या मालावर कसंबसं बसून सगळ्यांनी प्रवास केला. ट्रकवाल्यानं सगळ्यांना देहू रोडला उतरवलं. इतका लांबचा प्रवास, तोही उपाशीपोटी झालेला. पोटात अन्नाचा कण नाही. आपल्या गावातला कोणी एक कोंढव्याला राहतो, असं ठाऊक असल्यानं सगळेच उपाशीपोटी कोंढव्याचा रस्ता विचारत निघाले; मात्र त्या गाववाल्याचा ठावठिकाणा सापडला नाही. तिथेच असलेल्या वीटभट्टीवर कामाची चौकशी करताच वीटभट्टीवर काम मिळालं. गावात राहत असताना कधी शेतात कष्टाची कामं केली नव्हती; पण इथं मात्र चिखल तयार करण्यापासून विटा डोक्यावरून नेण्यापर्यंतची सगळीच कामं करावी लागत होती. दिवसभर कष्ट करायचे आणि मिळालेल्या तुटपुंज्या पैशात जेवढं मिळेल तेवढं आणून चुलीवर शिजवून पोटात ढकलायचं, असे दिवस जात होते. एके दिवशी शिवाजी आणि त्याचे वडील पिंपळे गुरवला राहत असलेल्या त्याच्या मामाकडे पोहोचले. मामानं त्यांची अवस्था बघितली आणि वीटभट्टीच्या कामापेक्षा तुम्ही वॉचमन म्हणून किंवा घरकाम वगैरे अशी अनेक तऱ्हेची कामं करू शकता, असं सांगून एक वेगळी वाट दाखवली. शिवाजीची शाळा या सगळ्या प्रवासात केव्हाच सुटली होती. सातवीनंतर त्याचा सगळा संघर्ष पोटासाठी सुरू होता. 

सतरा-अठरा वर्षांच्या शिवाजीनं सकाळी सांगवी भागातल्या धनश्री नावाच्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून आणि औंध भागात सायंकाळी वॉचमन म्हणून काम करायला सुरुवात केली. या कामांमधून जे पैसे मिळाले, त्यातून उर्वरित कर्जही फेडलं. कर्ज फेडल्यावर घरातल्या सगळ्यांच्याच जीवात जीव आला. कर्ज फेडल्यानंतर घरात चर्चा सुरू झाली. पुन्हा आपल्या गावी जायचं का, असे विचार मनात यायला लागले; मात्र गावात जाऊन कुठलं काम करणार या विचारानं सगळ्यांनी पुण्यातच राहायचा निर्णय घेतला. इथेच दोन पैसे जास्त कमावू, या विचारानं याच काळात शिवाजी आचाऱ्याचं काम शिकला. खडकीला दारूगोळा (बारूद) बनवण्याच्या एका फॅक्टरीत स्वयंपाकी (कुक) म्हणून तो कामाला लागला. कुठलंही काम हलकं आणि भारी नसतं हे परिस्थितीनं शिवाजीला शिकवलं होतं. फॅक्टरीत चुलीवर लाकडं पेटवून स्वयंपाक करावा लागायचा. काही काळानंतर शिवाजीला त्या धुराचा त्रास सुरू झाला. प्रकृती वारंवार बिघडू लागली आणि त्यामुळे ते काम सोडावं लागलं. 

अरविंद गुप्ता यांच्यासोबत

परत एकदा प्रश्न समोर उभा होताच, आता काय करायचं? ओळखीच्या एकानं सांगितलं, की विद्यापीठात साफसफाईचं (हाउसकीपिंग) काम मिळू शकतं, प्रयत्न कर. शिवाजीनं प्रयत्न करताच त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साफसफाईचं काम करण्याची संधी मिळाली. एके दिवशी सायन्स सेंटरमध्ये (आयुका) काम करत असताना उंचेपुरे, लक्ष वेधून घेणारे वैज्ञानिक अरविंद गुप्ता तिथे आले (अरविंद गुप्ता यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ मालिकेतलं अरविंद गुप्ता हे पुस्तक वाचावं.) शिवाजी त्यांच्याकडे बघतच राहिला. त्यांना त्यानं अनेकदा टीव्हीवर बघितलं होतं. टीव्हीमध्ये दिसणारी माणसं एका वेगळ्याच जगातली असतात, असंच तोपर्यंत शिवाजीला वाटायचं; पण इथं तर गुप्ताजी समोर उभे होते. हिंदी भाषेतून ते शिवाजीची अतिशय प्रेमानं विचारपूस करत होते. त्या दिवशी शिवाजी आनंदाच्या लहरींवर तरंगतच घरी आला. ‘आयुका’मध्ये काम करत असताना तिथली साफसफाई झाली, की शिवाजी विज्ञान विषय समजवणाऱ्या त्या शेकडो गोष्टी बघून थक्क व्हायचा. एके दिवशी त्यानंही हवेत तरंगणारी पेन्सिल बनवली. शिवाजीचं मन लावून ते खेळणं बनवणं गुप्ताजींनी बघितलं. त्यांनी त्याला ‘घेऊन जा तू घरी’ असं सांगताच शिवाजीला अत्यानंद झाला. घरी येताच त्यानं आपण विज्ञानातला नियम समजवणारी एक वस्तू बनवलीय, असं सांगत ती हवेत उडणारी पेन्सिल सगळ्यांना दाखवली. घरच्यांना त्यातलं काहीच कळलं नाही; पण आपला मुलगा त्याच्या कामात खूश आहे एवढंच त्यांना समजलं. आता शिवाजीला ‘आयुका’त कधी एकदा जातो असं व्हायचं. आपलं काम पूर्ण करून तो तिथं असलेल्या सगळ्यांबरोबर वैज्ञानिक खेळणी स्वतःही बनवून बघायचा. दिवसाचे चोवीस तासही आपल्याला इथं थांबावं लागलं तरी चालेल, इतका तो त्यात रमून गेला होता. शिवाजीचं तिथे एक वर्ष काम करून झालं होतं. कामाचं काँट्रॅक्ट संपत आलं होतं. आता पुन्हा प्रश्न - पुढे करायचं काय?दुसऱ्या दिवशी गुप्ताजी त्याच्या जवळ आले आणि म्हणाले, तू आमच्याबरोबर हे काम खूप चांगलं आणि मन लावून करतोस. तुला पूर्ण वेळ आमच्याबरोबर काम करायला आवडेल का? शिवाजीनं लगेचच होकार दिला. गुप्ताजी म्हणाले, ‘तुला आतापर्यंत त्या तात्पुरत्या कामाचे महिन्याला तीन हजार रुपये मिळायचे. आता आमच्याबरोबर काम करताना तुला सात हजार रुपये मिळतील.’ त्यांच्यासारखाच कम्प्युटर हाताळायला मिळणार, आवडत्या वस्तू करायला मिळणार आणि या सगळ्या आवडत्या कामाचे सात हजार रुपये मिळणार हे सगळं ऐकून शिवाजीचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ‘हे स्वप्न तर नाही ना,’ या विचारानं तो वारंवार स्वतःला चिमटे काढून बघत होता. गुप्ताजींची प्रेमळ नजर त्याला जाणवत होती. त्याचे डोळे भरून आले. तो बाथरूममध्ये गेला आणि मनसोक्त रडून घेतलं. आतापर्यंतच्या कष्टाचं चीज झालं होतं आणि आता एक वेगळा प्रवास सुरू होणार होता आणि हे सगळं घडलं होतं ते अरविंद गुप्ता नावाच्या सहृदय माणसामुळे!त्या दिवशी पहिल्यांदा शिवाजीला कधी एकदा घरी जातो आणि सगळ्यांना ही बातमी सांगतो, असं झालं होतं. घरी गेल्यावर त्यानं आपल्या या कामाची बातमी सांगताच, अर्थातच सगळे खूश झाले. त्यानंतरची १० वर्षं शिवाजी अरविंद गुप्ता यांच्याबरोबर काम करत राहिला. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता, ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले आणि लेखिका दीपा देशमुख यांच्यासह

अरविंद गुप्ता या विज्ञानवेड्या, विज्ञानाला वाहून घेतलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहायला मिळणं किती मोठी गोष्ट आहे, याचा अनुभव रोजच शिवाजी घेत होता. कधी अरविंद गुप्ता सगळ्यांना नवं पुस्तक दाखवत. त्या पुस्तकाविषयी सगळी माहिती सांगत. त्यांच्या टीममधले सगळेच जण शिवाजीला समजून घेत, शिवाजीला काही अडलं तर सोप्या भाषेत त्याचा अर्थ सांगत. कधी अरविंद गुप्ता एखादी फिल्म आणून दाखवत. त्या फिल्मचाही अर्थ ते सांगत. यामुळे पुस्तकं असोत, वा फिल्म्स, शिवाजीला त्याचीही गोडी लागली. या सगळ्या गोष्टींमधून तो कसा तयार होत गेला, त्यानं कौशल्यं कशी आत्मसात केली, हे त्यालाही कळलं नाही. शिक्षण इतकं आनंददायी असू शकतं, इतक्या सहजपणे शिकता येतं, हे तो अनुभवत होता. त्यानंतर अरविंद गुप्ता निवृत्त झाले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांची टीमही इतरत्र काम करायला लागली. शिवाजीला बारामतीच्या ‘अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेंटर’मध्ये बोलावलं गेलं. तिथं राहून त्यानं २८४ अंगणवाड्या आणि शाळांचं काम बघितलं. याच दरम्यान शिवाजीच्या वडिलांना पित्ताशयाचा कर्करोग झाला. आपल्या वडिलांकडे लक्ष देण्यासाठी शिवाजीनं बारामतीहून पुण्यात परतण्याचा निर्णय घेतला. सूस-पाषाण रोडवरच्या डीएलआरसी या शाळेत आता शिवाजी काम करतो आहे. अरविंद गुप्ता यांनी शिवाजीला जन्मभर पुरेल अशी शिदोरी बरोबर दिली आहे. मुलांमध्ये/लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी तयार केलं आहे आणि ते काम शिवाजी मनोभावे करतो आहे. अरविंद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विज्ञानातले एक हजार प्रयोग शिकलाय. त्यातले ५०-६० तर नेहमीच त्याच्या बॅगेत असतात. अनेक शाळा, कॉलेजेस आणि स्वयंसेवी संस्था त्याला बोलावत असतात. अनेक ठिकाणी त्याच्या कार्यशाळा होतात. खरं तर, शाळेत पाठ्यपुस्तकातलं विज्ञान वाचावं लागतं. शिवाजी मात्र समोर प्रयोग करतो, करायला लावतो आणि त्यातून मुलं विज्ञान शिकतात. या कार्यशाळेत कधी साउंड वेव्ह मॉडेल दाखवलं जातं. न्यूटनचा तिसरा नियम - क्रिया-प्रतिक्रिया - मुलं समोर प्रात्यक्षिकांमधून शिकतात. फुग्यात हवा भरून सोडलेली असो किंवा उंच उडालेलं रॉकेट असो, एखाद्या साध्या वाटणाऱ्या खेळातही न्यूटनचा हा नियम कसा काम करतो, हे कळताच त्यांना आनंद होतो. ध्वनिविषयी प्रयोग करताना साध्याशा स्ट्रॉला हातात घेताच पिपाणी कशी तयार करता येते आणि त्यातून ‘सारेगमपधनी’ हे संगीताचे सात स्वर कसे काढता येतात, हे मुलं प्रयोग करून बघतात. यावरून मुलांना प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगळा कसा, स्त्रीचा आणि पुरुषाचा आवाज वेगळा कसा, हे समजतं. चुंबक कसं काम करतं, एसी करंट (अल्टरनेट करंट) म्हणजे काय, डीसी करंट (डायरेक्ट करंट) म्हणजे काय, त्यांचे फायदे तोटे, कोयना प्रकल्पात वीज कशी तयार होते अशा अनेक गोष्टी मुलं सहजपणे शिवाजीच्या कार्यशाळेत शिकतात. जगताना पावलोपावली विज्ञान कसं भेटतं, हे त्यांना समजतं. भूमिती शिकवताना, त्यातले त्रिकोण, आयत, चौकोन, षटकोन वगैरे शिकवताना शिवाजी नऊ ते १० प्रकारच्या टोप्या करून दाखवतो. मुलांसाठी तर ही एक आनंदाची पर्वणीच असते. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या सहजपणे करणं आणि आपल्या डोक्यावर चढवणं याचा आनंद मुलं भूमिती शिकता शिकता घेतात. आज शिवाजीनं महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांमधूनही अडीच हजारांहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. शिवाजीचा विज्ञानावरचा अभ्यास बघून शाळा-कॉलेजमधले शिक्षक-प्राध्यापकच नव्हे, तर डॉक्टरेट करणारी मंडळीही चकित होतात. सातवीपर्यंत शिकलेला एक मुलगा असं काम करू शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. शिक्षणानं, त्यातल्या ज्ञानानं अंगी आत्मविश्वास येतो हे शिवाजीकडे बघताच लक्षात येतं. तो मात्र या सगळ्याचं श्रेय संशोधक असलेल्या पद्मश्री अरविंद गुप्ता यांना देतो. शिवाजीचा हा प्रवास अतिशय खडतर होता; मात्र जे काम करावं लागलं, ते त्यानं मन लावून केलं. स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात त्यानं विज्ञान रुजवून जगणं अर्थपूर्ण केलं आणि करतो आहे. अशा मृदू मनाच्या, नम्र, विनयशील असलेल्या शिवाजी मानेला जरूर भेटा.

संपर्क : शिवाजी माने 
ई-मेल : shivajigmane@gmail.com
मोबाइल : ९९२२६ ८८०३९ 

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत. विज्ञानप्रसारासाठी झटणाऱ्या जयदीप पाटीलची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा आणि विज्ञान केंद्र सुरू करणाऱ्या संजय पुजारींची गोष्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rohidas Ekad About 289 Days ago
अतिशय खडतर प्रवास आहे आपला शिवाजी सर
0
0
Jayshri abhay patil About 334 Days ago
जिसकी जितना ज्यादा परिक्षा ली जाती है ,उसको उतने ज्यादा वरदान मिलता है ।
0
0
Abhay patil About 334 Days ago
Mane sir salam tumchay kashtala sir khas tumchaysadhi उपर वाला उसीकी परीक्षा लेता है, जिसको वो कुछ देना चाहता है
1
0
jayshri abhay jadhav About 334 Days ago
He sir amchaych gavakadche ahet, tayna mi sluat karate. Try try but don't cry, ase taynche preytan hote
1
0
Yogesh Apte About 335 Days ago
Real guide for the life to move on!
1
0
Hanamant Nangare About 341 Days ago
Your hard work and brilliance . Congratulations . You are doing for children and teachers .
1
0
G l pathan About 342 Days ago
Jabardast
1
1
Agawane keshav shankar About 342 Days ago
श्री.माने सर सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टाला.
1
0

Select Language
Share Link
 
Search